CBI मध्ये इंटर्नशिपची संधी; तुम्ही आहात का पात्र? जाणून घ्या संपूर्ण माहिती
मुंबई: देशातील गुन्हे तपास संस्थांमध्ये काम करण्याची इच्छा असेल, तर उमेदवारांना तशी संधी उपलब्ध झाली आहे. अर्थात ही संधी नोकरीची नसून, इंटर्नशीपसाठीची आहे. कायदा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागात इंटर्नशीप करता येऊ शकते. त्यासाठीच्या 30 जागांची भरती करणार असल्याचं विभागानं जाहीर केलं आहे. इंटर्नशीपचा कार्यकाळ 3 ते 6 महिन्यांचा असेल. 30 मे 2023 ही अर्जासाठीही अंतिम तारीख आहे. याबाबतची माहिती एका एका वृत्त संस्थेने दिली आहे.
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयमध्ये कायदा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना इंटर्नशीप करण्याची संधी आहे. त्यासाठीच्या 30 जागा उपलब्ध असल्याचं सीबीआयनं अधिकृत परिपत्रकाद्वारे जाहीर केलंय. संस्थेच्या दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, लखनऊ आणि बेंगळुरू इथल्या कार्यालयांमध्ये निवड केलेल्या उमेदवारांची भरती केली जाईल.
इच्छुक उमेदवारांनी सीबीआयच्या अधिकृत परिपत्रकावरून त्यांचा अर्ज तयार करून त्यासोबत सीबीआयमध्ये भरती होण्याचं कारण 150 शब्दांमध्ये लिहून ते स्पीड पोस्टनं पाठवावं. पोलीस अधीक्षक, सीबीआय अॅकॅडमी, हापूर रोड, कमला नेहरू नगर, गाझियाबाद, उत्तर प्रदेश-201002 या पत्त्यावर उमेदवारांनी अर्ज पाठवावा.
सीबीआयच्या अधिकृत परिपत्रकानुसार, निवड झालेल्या उमेदवारांना इंटर्नशीपच्या कालावधीत कोणताही आर्थिक मोबदला मिळणार नाही. तसंच उमेदवारांना स्वतःच त्यांच्या राहण्याची व प्रवासाची सोय करावी लागेल. या उमेदवारांच्या पात्रतेबाबतही सीबीआयनं निकष दिलेले आहेत. त्यानुसार, हे उमेदवार कायद्याचे विद्यार्थी असावेत. त्या संबंधीचं इंग्रजी माध्यमाच्या पदवीचं शिक्षण त्याच्याकडे असावं. तसंच मान्यताप्राप्त व नामांकित विद्यापीठातील त्यांचं शिक्षण असावं. जे विद्यार्थी 5 वर्षांचा इंटिग्रेटेड एलएलबी कोर्स करत आहेत, त्यांनी अभ्यासक्रमातील 8 वं सेमिस्टर पूर्ण केलेलं असावं किंवा 8 वं सेमिस्टर सुरू असावं. जे विद्यार्थी 3 वर्षांचा एलएलबी कोर्स करत आहेत, त्यांचं चौथं सेमिस्टर सुरू असावं किंवा पूर्ण झालेलं असावं.
इच्छुक उमेदवारांना 3 ते 6 महिन्यांची इंटर्नशीप करता येईल. अधिकृत माहितीनुसार उमेदवार अर्ज डाउनलोड करून तो भरून सही करून दिलेल्या पत्त्यावर पाठवू शकतात. त्यासोबत उमेदवारांनी सीबीआयमध्ये इंटर्नशीप का करायची आहे, याबाबत 150 शब्दांची माहिती लिहून पाठवणं गरजेचं आहे. हे अर्ज स्पीड पोस्टनं पाठवावेत असं सूचनेमध्ये म्हटलंय. इतर कोणत्याही मार्गानं अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. 30 मे 2023 पर्यंत हे अर्ज दिलेल्या पत्त्यावर पोहोचले पाहिजेत. अपूर्ण व अंतिम दिनांकानंतर आलेले अर्ज नाकारण्यात येतील असं सीबीआयनं म्हटलं आहे.
Edited By - Ratnadeep ranshoor