गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

संत गोरा कुंभार हे वारकरी संप्रदायातील महाराष्ट्रातील संत होते. हे विठ्ठलाचे मोठे भक्त असून यांनी अनेक अभंग लिहिले आहे. यांचा जन्म शके 1189 इ.स.1267 साली तेरढोकी पंढरपूर जवळ या ठिकाणी झाला असे मानले जाते. त्यांच्या वडिलांचे  नाव माधवबुवा आणि आईचे नाव रखुमाई होते.  त्यांना सर्व जण गोरोबा काका म्हणून हाक द्यायचे. तेर नगरीत गोरोबा यांचे कुटुंब धार्मिक वृत्तीचे होते. यांचे कुटुंबीय 'काळेश्वर' या ग्राम देवतांचे उपासक होते. त्यांचे आई वडील कुंभारकाम करून आपला उदरनिर्वाह करायचे. त्यांचे वडील गावात संत माधव बुवा म्हणून ओळखले जायचे. त्यांना आठ अपत्ये झाली पण दुर्देवाने ते फार काळ जगली नाही.आपल्या आठही मुलांना त्याने दारुण हृदयाने पुरले. पण ईश्वराची किमयाच वेगळी पांडुरंग साक्षात माधवबुवांच्या घरी ब्राह्मणाचे वेष घेऊन आले

आणि त्यांना दुखी होण्याचं कारण विचारले. त्यावर माझ्या मुलांना मी माझ्या हाताने पुरले आहे आणि माझे आठही मुलं देवाने नेले. असे सांगितल्यावर पांडुरंगाने माधवबुवांना ज्या जागी मुलांचे मृतदेह पुरले आहे तेदाखवण्यास सांगितले आणि प्रेत बाहेर काढण्यास सांगितली. पांडुरंगाने सांगितल्या प्रमाणे त्यांनी प्रेत काढले आणि पांडुरंगाने त्या सात ही मुलांना जिवंत केले आणि स्वर्गात पाठवणी केली. नंतर त्यांनी आठव्या मुलाला देखील जिवंत केला आणि तो देखील स्वर्गाकडे जायला निघाला तेवढ्यात पांडुरंगाने त्यांना थांबविले आणि माधवबुवा आणि रखुमाईच्या हातात दिले आणि म्हणाले गोरीतून काढल्यामुळे ह्याचे नाव गोरोबा असेल.अशी आख्यायिका आहे.   
 
गोरोबा पेशाने कुंभार होते.संतश्रेष्ठ नामदेव व ज्ञानेश्वरांचे ते समकालीन होते,संत गोराबा हे ज्ञानेश्वर, निवृतीनाथ,मुक्ताबाई,सोपान आदि संत मंडळींमध्ये वयाने सर्वांहून वडीलधारी होते.
 
त्यामुळे सर्व जण त्यांना गोरोबाकाका म्हणत असत.संत गोरोबांनी ज्ञानेश्वरांच्या सांगण्यावरून निवृत्तीनाथ,सोपानदेव, मुक्ताबाई,संत नामदेव,चोखामेळा,विसोबा खेचर आदि संताची,‘कोणाचे मडके(डोके)किती पक्के’अशी प्रत्येकाच्या डोक्यावर मारून परीक्षा घेतली.तेव्हा संत नामदेवांना या गोष्टीचा राग आला होता,त्यावेळी ज्ञानेश्वरांनी त्यांना गुरूपदेश घ्यावयास सांगितले.तेव्हा संत नामदेवांनी विठोबा खेचरांना आपले गुरू केले.

संत गोरा कुंभार यांचा विवाह संतीशी झाला.त्यांना एक गोंडस बाळ झालं.नंतर त्यांनी रामी यांच्याशी लग्न केले.   
संत गोरोबा सतत श्री विठ्ठलाचे स्मरण करत,भक्तिरसात ते देहभान विसरून हरवून जात.त्यांची पत्नी गोरोबांना त्यांच्या लहानग्या बाळाकडे लक्ष ठेवयास सांगून पाणी आणवयास गेली असता,श्री विठ्ठलाचे स्मरण करता करता त्यांना,लहानग्या बाळास मडकी घडविण्यासाठी लागणारी माती तुडविण्यासाठी चिखलात रांगणारे लहानगे बाळ जवळ आले आणि मातीत त्यांच्याच पायाखाली  गाडले गेल्याचे समजले नाही.त्यांची पत्नी पाणी घेऊन येईपर्यत लहानगे बाळ गतप्राण झाले होते.तिच्या हंबरड्याने गोरोबांना जाग आली व ते पश्चाताप करु लागले.नंतर विठ्ठलाच्या कृपेने त्यांचे मुल जिवंत झाले.(अशी अख्यायिका सांगितली जाते.)

संत गोरोबांनी शके 1239 मध्ये 20 एप्रिल 1317 रोजी समाधी घेतली. संत गोरोबा कुंभारांची समाधी उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरढोकी गावात आहे. या समाधी जवळ एक मंदिर आहे. 
 
संत गोरोबांची उपलब्ध असलेली काव्यरचना थोडी आहे.त्यांचे सुमारे 20 अभंग सकलसंत गाथेत समाविष्ट केले आहेत.त्यांची उपलब्ध असलेली काव्यरचना अत्यंत गोड अशी आहे.
 
संत गोरोबांचे अभंग-
संत गोरोबांचे अभंग म्हणजे रसाळ वाणीचा झरा,सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत त्यांचे अभंग आहेत.निर्गुणाचा संग धरल्यावर काय अवस्था होते हे त्यांनी पुढील अभंगात सांगितले आहे.
 
निर्गुणाचा संग धरिला जो आवडी ।
तेणें केलें देशोधडी आपणियाशी ॥१॥
 
अनेकत्व नेलें अनेकत्व नेलें ।
एकलें सांडिलें निरंजनीं, मायबापा ॥२॥
 
एकत्व पाहतां अवघें लटिकें ।
जें पाहें तितुकें रूप तुझें, मायबापा ॥३॥
 
म्हणे गोरा कुंभार सखया पांडुरंगा
तुम्हा आम्हा ठावा कैसे काय, मायबापा ॥४॥
 
निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे
 
निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे ।
तंव झालों प्रसंगी गुणातीत ॥१॥
 
मज रूप नाहीं नांव सांगू काई ।
झाला बाई काई बोलूं नये ॥२॥
 
बोलतां आपली जिव्हा पैं खादली ।
खेचरी लागली पाहतां पाहतां ॥३॥
 
म्हणे गोरा कुंभार नाम्या तुझी भेटी ।
सुखासुखीं मिठी पडली कैसी ॥४॥
 
संत गोरा कुंभार-
 
Edited By - Priya Dixit