सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. करिअर मार्गदर्शन
Written By
Last Modified: मंगळवार, 7 सप्टेंबर 2021 (13:44 IST)

NEET Exam: 'या' तारखेला होणार नीट परीक्षा, नियमावली जाहीर

12 सप्टेंबर रोजी होणारी वैद्यकीय प्रवेश परीक्षा म्हणजेच नीट (NEET- National eligibility and entrance test) पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
 
नीट (NEET) परीक्षेची तारीख आणि इतर काही परीक्षा या एकाच दिवशी आयोजित करण्यात आल्याने नीट (NEET) परीक्षा पुढे ढकला अशी मागणी काही विद्यार्थ्यांनी केली होती. केंद्रीय शिक्षण विभागाकडे सुरुवातीला ही मागणी करण्यात आली पण याबाबत निर्णय न झाल्याने विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली.
 
परंतु नीट परीक्षा निर्धारित वेळापत्रकानुसारच घेतली जाईल असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. देशभरातून 16 लाखाहून अधिक विद्यार्थी नीट परीक्षा देत असतात. त्यामुळे केवळ काही विद्यार्थ्यांसाठी सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा पुढे ढकलता येऊ शकत नाही असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.
 
"आम्ही यावर सुनावणी घेणार नाही. आम्हाला अनिश्चितता नको आहे. परीक्षा होऊ द्या." असंही न्यायालयाने सांगितलं.
 
नीट परीक्षेच्या माध्यमातून देशभरातल वैद्यकीय आणि डेंटल महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया पार पडते. परंतु सीबीएसई कंम्पार्टमेंटसारख्या परीक्षा 12 तारखेलाच असल्याने दोन्ही परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांसमोर अडचण निर्माण झाली आहे.
 
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मात्र या गोंधळासाठी केंद्र सरकार जबाबदार असल्याची टीका केली आहे. ते म्हणाले, "केंद्र सरकार आंधळं आहे का? नीट परीक्षा पुढे ढकला. विद्यार्थ्यांना संधी द्या."
 
देशात कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचीही शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची सुरक्षित परीक्षा घेण्याचं आव्हान प्रशासनासमोर आहे.
 
बारावीचा निकाल जाहीर झाल्याने यंदाचे वैद्यकीय महाविद्यालयीन प्रवेश वेळेत होणं सुद्धा गरजेचं आहे.
 
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे नियम
नीट परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडे प्रवेशपत्र (अॅडमिट कार्ड) असणं गरजेचं आहे. neet.nta.nic.in या वेबसाईटवरुन विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहे.
अॅडमिट कार्डची कलर प्रिंटआऊट असावी. त्यावर पासपोर्ट साईज फोटो असावा.
अॅडमिट कार्डवर तुमची सही असेल याची खात्री करुन घ्या.
विद्यार्थ्यांना सकाळी 11.30 वाजल्यापासून परीक्षागृहात प्रवेश मिळण्यास सुरुवात होईल.
परीक्षागृहात प्रवेश करण्याची अखेरची वेळ दुपारी 1.30 वाजता असेल.
यानंतर परीक्षेसंदर्भातील घोषणा होतील आणि विद्यार्थ्यांना टेस्ट बुकलेट दिल्या जातील.
दुपारी 2 पासून परीक्षेला सुरुवात होईल आणि संध्याकाळी 5 वाजता परीक्षा संपेल.
180 प्रश्नांची प्रश्नपत्रिका असेल आणि 720 गुणांची परीक्षा असेल.
फिजिक्सचे 45 प्रश्न असतील, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे प्रत्येकी 90 प्रश्न असतील.
बरोबर असलेल्या प्रत्येक उत्तरासाठी +4 गुण असतील आणि चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण कमी होईल. (-1)