वायसीएममध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांतर्गत चार नवीन अभ्यासक्रम सुरू होणार
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांतर्गत श्वसनरोग चिकित्साशास्त्र, कम्युनिटी मेडिसीन, त्वचारोग मेडिसीन आणि नेत्र चिकित्साशास्त्र हे चार नवीन अभ्यासक्रम करण्यात येणार आहेत. या चार विषयांसाठी विद्यापीठ संलग्नीकरण संमतीपत्राला मुदतवाढ देण्याकरिता आठ लाख रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात नऊ विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत त्यास परवानगी मिळाली आहे.
शैक्षणिक वर्ष 2020-21 करिता विद्यार्थ्यांना प्रवेशक्षमता मंजुरीही मिळाली आहे. राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषधीद्रव्ये विभागाच्या पत्रानुसार, वायसीएम रुग्णालय पदव्युत्तर संस्थेत श्वसनरोग चिकित्साशास्त्र, कम्युनिटी मेडिसीन,त्वचारोग मेडिसीन आणि नेत्र चिकित्साशास्त्र हे चार नवीन अभ्यासक्रम प्रतिविषय सहा विद्यार्थी प्रवेशक्षमतेसह 2020-21 पासून सुरू करण्याच्या अनुषंगाने सरकारकडे शिफारस केली होती.
हा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने 9 मार्च 2021 रोजी चार विषयांसाठी विद्यापीठ संलग्नीकरण संमतीपत्राला मुदतवाढ देण्यासाठी शुल्क भरावे लागणार आहे.