रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. संवाद
  4. »
  5. मुलाखत
Written By वेबदुनिया|

भारताने पाकवर हल्ला करावा - रामदेवबाबा

मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत योगाचार्य रामदेवबाबा यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ‘भारताने आता वेळकाढूपणा न करता पाकिस्तानवर आक्रमण करून दहशतवाद्यांची प्रशिक्षण शिबीरे उध्वस्त करावीत’ असे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. सरकार सध्या वेळकाढूपणा करत असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. योगशिबीराच्या निमित्ताने रामदेवबाबा सांगलीत आले आहेत. त्यांच्याशी आमचे प्रतिनिधी किरण जोशी यांनी केलेल्या चर्चेचा हा सारांश...

मुंबईत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याबाबत आपली प्रतिक्रिया काय आहे?
''मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांत अनेक निष्पापांचा बळी गेला पण, एखाद्या राजकारण्याचा बळी गेला असता तर एव्हाना पाकिस्तानवर हल्लाही झाला असता. यावरून सरकारचा सामान्यांप्रती निष्काळजीपणा स्पष्ट होतो. पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांची शिबिरे आहेत याचे पुरावे आपण देत आहोत. पण, याची काही गरज आहे का? दहशतवादाला पाकिस्तानकडूनच खतपाणी घातले जाते, हे सा-या जगाला माहित आहे. पण, आपण अमेरिकेशी चर्चा करत वेळकाढूपणा करत आहोत. याचा परीणाम सामान्य जनतेला भोगावा लागणार आहे.''

दहशतवादाला चोख प्रतिउत्तर देण्याबाबत सरकार अपयशी ठरले आहे, असे वाटते का?
'पंतप्रधान मनमोहन सिंह यांची चांगली प्रतिमा आहे. पण, आता त्यांनी आक्रमक भूमिका घेतली नाही तर त्यांनाही जनता माफ करणार नाही. दहशतवाद्यांकडून सातत्याने हल्ले केले जात आहेत आणि त्यांना प्रोत्साहन देणा-या पाकिस्तानकडून आपण सहकार्याची अपेक्षा करत आहोत हे मुर्खपणाचे आहे. दहशतवादी कारवाया वाढत आहेत, बांगलादेश आणि पाकिस्तानातून घुसखोरी वाढत आहे. या घुसखोरांकडून कधीही अंतर्गत युध्दाला प्रारंभ होऊ शकतो म्हणून त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायचे असेल तर युद्ध करून पाकिस्तान बेचिराख करावाच लागेल. नाहीतर काळ आपल्याला कधीच माफ करणार नाही.

प्रत्येकवेळी अमेरिकेचा सल्ला घेणे कितपत योग्य वाटते?
अमेरिकेचा सल्ला घेऊन कारवाईची दिशा ठरविण्याची भारताची वृती चुकीची आहे. अमेरिकेच्या ओंजळीने पाणी पिणे हा देखील दहशतवादाइतकाच धोका म्हणावा लागेल. (मुंबई हल्ल्यातील शहिदांच्या हौतात्म्यावर केंद्रीय मंत्री ए. आर अंतुले यांच्यावर त्यांचे ना न घेता टीका करताना रामदेवबाबांनी त्यांची संभावना द्रेशद्रोही म्हणून केली.)

आपणास राजकारणात येण्याची संधी मिळाली तर?
आपण राजकारणात येणार नाही पण, राजकारण टाकाऊ असे न म्हणता राजकारणात चांगले लोक यावेत, यासाठी मी निश्चित प्रयत्न करेन.