गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. छत्रपती शिवाजी महाराज
  3. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास
Written By
Last Modified: मंगळवार, 27 ऑगस्ट 2024 (13:04 IST)

शिवभारत अध्याय एकतिसावा

कवींद्र म्हणाला :-
मग राजापुराहून त्वरित परत आलेल्या शिवाजी राजास मालुसरे सैन्यासह सामोरा जाऊन भेटला. ॥१॥
ज्यानें मोठ्या पराक्रमानें शत्रूचें सैन्य पराभूत केलें असा तो तानाजी आल्याचें नीळकंठराजाच्या पुत्रानें जवळ जाऊन कळविलें असतां वंदन करणार्‍या त्या मानधन तानाजीस पाहून राजानें त्याचा सैन्यासह मोठ्या कृपेनें सन्मान केला. ॥२॥३॥
नंतर सूर्यराजानें केलेला तो उद्धटपणा ऐकून पराक्रमी ( बलाढ्य ) शिवाजी राजा अतिशय रागावला असतांहि त्यानें आपला राग आवरला. ॥४॥
आणि शिवाजीनें त्वरित पाठविलेल्या दूतानें प्रभावळीच्या राजाकडे येऊन आदरणीय भाषण केलें. ॥५॥
दूत म्हणाला :-
ज्या अर्थी आदिलशहाच्या मदतीस जाऊन तूं शिवाजी राजाचे पुष्कळ अपराध केलेस आणि संगमेश्वरी असलेल्या शिवाजीच्या सैन्यावर रात्री तूं सैन्यासह निर्भयपणें छापा घातलास, त्या अर्थी तो तुझा मोठा अपराध, हे प्रभावलीच्या राजा, विश्वजेत्या शिवाजीनें कसा सहज करावा हें तूंच सांग. ॥६॥७॥८॥
म्हणून तो अतिशय रागावला असतांहि सुदैवानें तुझ्यावर दयाळू होऊन त्यानें आज तुला जी आज्ञा केली आहे ती सांगतों ऐक. ॥९॥
शिवाजी राजा म्हणाला :-
हे महाबाहो, रानांतील हत्तीप्रमाणें उन्मत्त असा जो बलवान् ( महाबाहु ) राजा मला भिऊन पळून तुझ्याकडे आला, त्या प्रतिकूल, अपराधी पालीच्या राजाचा देश ताबडतोब घेण्यास मी सज्ज झालों आहे. ॥१०॥११॥
तेव्हां आम्हास भिऊं नकोस आणि तिकडे पालीस बिनचूक ये म्हणजे तेथें तुला मी अभयदान देईन. ॥१२॥
जर घमेंडीमुळें तूं तेथें आला नाहींस, तर त्याची अवस्था तुला प्राप्त होईल. माझ्या क्रोधापासून तुझें रक्षण करण्यास आज कोणीहि नाहीं. ॥१३॥
तेव्हां याप्रमाणें दूताकडून शिवाजीचें म्हणणें ऐकून “ तूं जा, मी जातो ( येतों ) ” असें शृंगापूरचा राजा त्यास म्हणाला. ॥१४॥
मग पालीजवळ जाऊन त्यानें ( दूतानें ) शिवाजी राजास सूर्यराजाचें बोलणें एकांतांत सांगितलें. ॥१५॥
नंतर शिवाजीनें पाली नांवाचा तो प्रांत पादाक्रांत, करून अनुग्रह करण्यास योग्य असलेल्यांवर अनुग्रह व निग्रह करण्यास ओग्य असलेल्यांचा निग्रहहि केला. ॥१६॥
ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, कांसार, सोनार, लोहार, तांबट, सुतार, गवंडी, न्हावी, तमासगीर, माळी, कुंभार, कारागीर, भाट, कोष्टी, शिंपी, रंगारी, तांबोळी, तेली, परीट, कलाल, धनगर, गवळी, गुरव, कुणबी ( शेतकरी ), गंधी, हलवाई, कोमटी, पलवाणी ( मृदंग्ये ), पांवेकरी, टाळकरी, वीणेकरी वजवय्ये, पारधी, शिकलगार, सावकार, बाण करणारे, गारुडी, चांभार, भिल्ल, कोळी, मांग ( चांडाळ ) असे घाबरून गेलेले लोक पुनः लगेच त्याच प्रांतीं येऊन दिवसेंदिवस भरभराट पावून अनेक प्रकारें आनंद पावले. ॥१७॥१८॥१९॥२०॥२१॥२२॥२३॥
तेव्हां, त्या देशाच्या रक्षणार्थ अतिशय समर्थ असा ‘ चिरदुर्ग ’ या नांवानें प्रख्यात गड पाहून त्या उत्साही शिवाजीनें त्याच्या माथ्यावर कारागिरांकडून सभोवतीं उंच तट बांधविला. ॥२४॥२५॥
आणि ‘ हा त्या प्रांताचें मंडणच ( भूषणच ) आहे ’ असें सुचविण्यासाठीं ह्या गडा ‘ मंडनगड ’ असें नांव दिलें. ॥२६॥
त्या गडांच्या स्वामीनें त्या अत्यंत दुर्गम गडावर रक्षणाच्या कामीं दक्ष असा अजिंक्य गडकरी नेमून व सर्वगुणसंपन्न असें कांहीं सैन्य ठेवून तो दक्ष राजा शृंगापूरच्या राजास जिंकण्याच्या इच्छेनें निघाला. ॥२७॥२८॥
पंडित म्हणाले :-
प्रभावलीच्या राजाचा एका क्षणांत पराभव करण्यास समर्थ असा शिवाजी पूर्वीच शृंगारपुरास कसा गेला नाहीं ? आणि वैर धरणार्‍या त्या गर्विष्ठ राजास ‘ तुला अभय देतों ’ असें म्हणून त्याच्याकडे दूत कसा पाठविला ? ॥२९॥३०॥
कवींद्र म्हणाला :-
जावळीच्या जयापासून केलेल्या पराक्रमानें प्रख्यातीस आलेल्या, इंद्राप्रमाणें पराक्रमी अशा शिवाजीस पूर्वीं मानलें नसतांहि सूर्यराजानें प्रभावलीचें समृद्ध राज्य स्वतः राखण्याच्या इच्छेनें ‘ तुझा मी क्रीतपुत्र ( विकत घेतलेला पुत्र ) आहें ’ असा निरोप पाठवून विनंती केली. ॥३१॥३२॥
त्या वेळेपासून त्या शरणेच्छु राजाचें रक्षण शरणागतांचें रक्षण करणार्‍या शिवाजी राजानें पुष्कळ काळपर्यंत केलें. ॥३३॥
जेव्हां जेव्हां शिवाजी राजानें शत्रूंशीं युद्ध केलें, तेव्हां तेव्हां सूर्यराजानें त्यास साह्य केलें. ॥३४॥
नंतर दुर्दैवानें बुद्धि नष्ट झालेल्या, भीति टाकलेल्या, निबिड अरण्यांत राहणार्‍या, गर्विष्ठ, कपटि सूर्यराजानें शिवराजाचे वैरी जे अविंध त्यांस गुप्तपणें व उघडपणेंहि अनेक प्रकारें मोठें साह्य केलें. ॥३५॥३६॥
त्यानें पुनः पुनः अपराध केले असतांहि व तो निग्रह करण्यास योग्य असतांहि दृढव्रत शिवाजीनें त्याचा निग्रह करण्याचें मनांत कसें आणलें नाहीं ? ॥३७॥
जवळ बोलाविला असतांहि जेव्हां तो गर्वानें जवळ आला नाहीं, तेव्हां शिवाजी राजा भोसला सूर्यराजावर रागावला. ॥३८॥
नंतर तो राजा पंधरा हजार वेगवान पदाति बरोबर घेऊन स्वारीवर निघण्यास सिद्ध झाला. ॥३९॥
तो महाबली शिवाजी पालखींत बसून त्वरेनें जात असतां त्यास समोर सारवर दिसलें. ॥४०॥
तेव्हां क्रोधाविष्ट झालेला शिवाजी समीप आलेला ऐकून प्रभावलीचा राजा खिन्न होऊन आपल्या लोकांस म्हणाला. ॥४१॥
सूर्यराज म्हणाला :-
सुरासुरांनीं स्तविलेला, कपट युद्ध करणारा, कर्तृत्ववान व बलवान् शिवाजी पुष्कळ सैनिक बरोबर घेऊन आमच्यापासून शृंगारपूर घेण्यास उद्युक्त होऊन अगदीं गुप्तपणें जवळ आला आहे अशी लोकवार्ता आहे. ॥४२॥४३॥
त्या समर्थाशीं होणार्‍या या युद्धांतून अपार समुद्राप्रमाणें आम्ही कसें पार पडूं ? ॥४४॥
असें बोलून व तेथें आपल्या लोकांचें अनुमोदन घेऊन त्यानें आत्मरक्षण करण्याच्या इच्छेनें पळून जाण्याचा विचार केला. ॥४५॥
पंडित म्हणाले :-
जो अत्यंत दुर्गम अरण्यांत वास करीत असे, ज्याची प्रायः प्रतिदिवशीं लढण्याची, इच्छा असे, ज्या अजिंक्य राजाची सत्ता सह्याद्रि मान्य करीत होता, ज्यानें इतरांस दुर्लभ असें पूर्वींच्या राजांचें सिंहासन प्राप्त केलें होतें, ज्या गर्विष्ठ राजाशीं, तो अपराधी असतांहि, आपल्या राजाचें रक्षण करूं इच्छिणार्‍या आदिलशहानें ज्याच्याशीं तह करून आपली दुर्दशा टाळली, ज्यानें हवशांच्या ताब्यांतील लोकांना आपल्या ताब्यांत आणलें, ज्यानें समुद्रहि आपला आज्ञांकित केला, ज्याच्यायोगें परंपरागत सेना अधिक आनंदित झाली, ज्यास श्रेष्ठ पराक्रमानें कोणीहि मागें टाकलें नाहीं, अशा त्या प्रभावलीच्या राजानेंहि आपणास अपकार करूं इच्छिणार्‍या शिवाजीशीं कसें युद्ध केलें नाहीं ? ॥४६॥४७॥४८॥४९॥५०॥५१॥
कवींद्र म्हणाला :-
पूर्वी प्रळयाग्नीप्रमाणें प्रतापी शिवाजी संगमेश्वराहून पालीकडे निघून गेल्याचें ऐकून त्या मूर्ख सूर्य्राजानें आपणास कोणी शत्रु उरला नाहीं असें समजून व युद्धाचा प्रसंग नाहीं असें पाहून सिंहाप्रमाणें पराक्रमी, जगद्वंद्य अशा गोळा झालेल्या निरनिराळ्या सेनानायकांस आपआपल्या घरीं जाण्यास अनुज्ञा दिली. ॥५२॥५३॥५४॥
मग पालीहून जेव्हां शिवाजी त्वरित परतला, तेव्हां सूर्यराजास आपलें सैन्य जमवितां आलें नाहीं. ॥५५॥
या कारणामुळें खरोखर खिन्न होऊन, हे पंडितांनो, त्या प्रभावलीच्या राजानें युद्ध करण्याची इच्छा केली नाहीं. ॥५६॥
विष्णूचा अवतार, अनेक सैनिकांचा अधिपति, गर्विष्ठ आदिलशहाचा स्वबाहुबलाविषयींचा गर्व हरण करणारा, दिल्लीपतीच्या सैन्याचा चुराडा करणारा, व्रज्रासारखा देह असलेला, अत्यंत गुप्त मसलत कराणारा, स्वतंत्र, सामर्थ्यवान, शत्रूंचे अजिंक्य दुर्ग जिंकणारा, हट्टी, चंद्रराव मोर्‍याचा भुजच्छेद करणारा, अफजलखानास ठार मारणारा अशा शिवाजीशीं मोठें वैर मांडून सूर्य्राजानें पळून जाण्याचा विचार केला यांत मला कांहीं आश्चर्यकारक वाटत नाहीं. ॥५७॥५८॥५९॥६०॥
जींत शेंकडों उंचसखल घोंडींची गर्दी होती, जिच्यांतील झाडांच्या ढोलींमध्यें बसलेली घुबडें घूत्कार करीत होती, जी मोठमोठ्या नागांच्या अनेक कातींनीं चकाकत होती, जींतील असंख्य वृक्षांच्या खांद्यांनीं आकाश व्यापून टाकलें होतें, जी कडेस नाचणांर्‍याअनेक मोरांच्यायोगें मनोहर दिसत होती, जिच्यामधील घरट्यांतून पोपट उडत होते, जींत तास ( पक्षी ) ओरडत होते, जिनें गडाच्या तटास वेष्टिलें होतें, जी मेघसमूहाप्रमाणें दिसत होती, जिच्यांतील वृक्षांचे पल्लव क्षणोक्षणीं उड्या मारणार्‍या वानरांच्यायोगें हल्त होते, जींत रानडुकर घरघर घोष करीत होते, जीमध्यें लांडगे व मत्त हत्तीसारखे गवे होते, जीमधील दाट वेळूच्या बेटांमध्यें मोठमोठे वाघ निजले होते, जीमध्यें अनेक निर्भय कोल्हे वारुळें उकरीत होते, जी भयंकर असूनहि उंच उंच झोंपड्यांनी ( घरांनीं ) गजबजलेली होती अशा त्या शृंगारपूरच्या झाडींत शिरणारा, निरनिराळ्या प्रकारें हल्ले करूं इच्छिणारा, उत्तम योध्द्यांस ललामभूत असा तो शिवाजी सूर्यराज पळून गेला हें ऐकून सैन्यासह खिन्नसा झाला. ॥६१॥६२॥६३॥६४॥६५॥६६॥६७॥६८॥
शरणागतांना अभय देणारा, गर्विष्ठांचा गर्व नाहींसा करणारा बाणच, बाहुबलाचा अभिमान बाळगणारा असा शिवाजी शृंगारपुराजवळ येऊन तें त्यानें पाहिलें. ॥६९॥
आपल्या सैनिकांनीं तत्काळ व्यापलेल्या त्या शृंगारपुरांत पालखींत बसूनच त्वरेनें प्रवेश करून तें पाहात असतांना आपणहि शत्रूंस अजिंक्य आहों असें त्यास वाटलें. ॥७०॥
शत्रूंस अजिंक्य अशी ज्याची ख्याति होती, त्या शत्रुराजांच्या सिंहासनास त्यानें आपल्या पायानें लाथ मारली त्यावेळीं तो लोकांस महागर्विष्ठ वाटला. ॥७१॥
त्याच्यापासून पक्कें अभयदान घेऊन जमलेल्या पौरजनांनीं शृंगारपुरांत पुनः प्रवेश करून, समर्थ ( समृद्द ) होऊन त्यास पुष्कळ शृंगाराचें स्थान केलें. ॥७२॥
नंतर कांहीं थोड्या सैनिकांसह शीघ्र दिगंतास पळून गेलेल्या शत्रुराजांस मारण्याची, ज्याचा प्रताप त्रिभुवनांतील लोकांस जिंकणारा आहे अशा शिवाजीस, लाज वाटली. ॥७३॥