आता उरले केवळ 7 तास
सरकार राहणार की जाणार?
निकाल आता अवघा काही तासांवर आला आहे. सरकार राहणार की जाणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. आता केवळ तासांत हे निश्चित होणार आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनाचा दुसरा दिवस सुरू झाला आहे. सभापती सोमनाथ चॅटर्जी आपल्या आसनावर स्थानापन्न झाले असून आता विश्वासमत ठरावावर पुन्हा चर्चा सुरू होईल. नंतर पंतप्रधान सरकारची बाजू मांडतील. सायंकाळी 6 वाजेला ठरावावर मतदान होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने संपूर्ण तयारी झाली असून सभागृह सदस्यांनी खचाखच भरले आहे. पंतप्रधान मनमोहन सिंगांसह कॉंग्रेसच्या सर्वच प्रमुख नेत्यांनी स्पष्ट बहुमताचा दावा केला असला तरीही आतापर्यंत सरकार 271 पर्यंतच पोचू शकली आहे. सभागृहात काही खासदार अनुपस्थित राहिले तर 272 चा आकडा कमी होउ शकतो याकडेही सरकारचे लक्ष लागून आहे.सोमवारी सभागृहात जोरदार चर्चा रंगली. बराच वेळ गोंधळही झाल्याने सभागृह सकाळी 11 वाजेपर्यंत तहकुब करण्यात आले होते. आजही हीच स्थिती निर्माण झाली आहे. कॉंग्रेसच्या बाजूने आज सोनिया गांधी आणि राहुल गांधी किंवा पी.चिदंबरम यांच्यासह काही वरिष्ठ नेते सरकारची बाजू मांडण्याची शक्यता आहे. तर डाव्या पक्षांकडून वासुदेव आचार्य सरकारवर आरोपांच्या फैरी झाडतील. केवळ एका खासदाराची सरकारला अपेक्षा असताना देवगौड़ा किंवा अजीत सिंह काही चमत्कार करतात काय याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.