शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. विश्वास-अविश्वास
Written By वेबदुनिया|

खासदाराने लोकसभेत आणली नोटांची बंडले

संसदेच्या इतिहासात धक्कादायक अशी घटना आज घडली.सरकारकडून मतदान करण्यासाठी आपल्‍याला २५ कोटीची लाच देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप भाजपचे मुरैना (मध्य प्रदेश) येथील खासदार अशोक अर्गल यांनी केला आणि आरोपाच्या पुष्ट्यर्थ त्यांनी नोटांची बंडलेच लोकसभेत आणली.

अर्गल यांच्या कृतीने लोकसभेत जोरदार गोंधळ सुरू झाला. भाजपसह विरोधी पक्षाने सरकारला धारेवर धरले. या गोंधळातच सभापती सोमनाथ चटर्जी यांनी संसदेचे कामकाज स्थगित केले. दरम्यान, डाव्या पक्षाचे नेते ए. बी. बर्धन यांनी खासदारांना विकत घेण्यासाठी २५ कोटी रूपयांचे आमीष दाखविण्यात येत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर अर्गल यांनी थेट पैशांचे पुडकेच लोकसभेत आणून या आरोपांची पुष्टी केली. आपल्याला ४ फिरोजशहा रोड येथे पैसे देण्यात आल्याचे अर्गल यांचे म्हणणे आहे.

झारखंड मुक्ती मोर्चाच्या खासदारांना पी. व्ही. नरसिंहराव यांच्या काळात खरेदी करण्यात आले होते, तसेच हे प्रकरण असून त्याची सखोल चौकशी व्हायला हवी, अशी मागणी भाजप नेते लालकृष्ण अडवानी यांनी केली. खासदारांचा घोडेबाजार होतो आहे, हे आम्ही म्हणत होतोच, त्याला आता पुष्टी मिळाली आहे, असेही ते म्हणाले.मध्य प्रदेशातील आणखी एका खासदारासह भाजपच्या एकूण तीन खासदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगून त्यात एका टिव्ही चॅनेलच्या बातमीदाराची मदत घेण्यात आल्याचेही अडवानी यांनी सांगितले.

दुसरीकडे लालूप्रसाद यादव यांनी हा अडवानी यांनी रचलेला कट आहे, असे सांगितले. सकाळी खासदार पप्पू यादव याने आपल्याला खरेदी करण्यासाठी पैशांचे आमिष दाखविल्याचा आरोप केल्यानंतर अडवानी संसदेतून गायब झाले होते. या काळात त्यांनी हा कट रचल्याचा आरोप त्यांनी केला. संबंधित खासदाराची नार्को टेस्ट करावी अशी मागणीही त्यांनी केली.