शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 4 सप्टेंबर 2021 (08:45 IST)

राज्यात शुक्रवारी ४ हजार ३१३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद

राज्यात नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढताना पाहायला मिळत आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी ४ हजार ३६० रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९७.०४ टक्क्यांवर गेला आहे.  
 
मिळालेल्या आकडेवारीनुसार, राज्यात शुक्रवारी ४ हजार ३१३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, याच कालावधीत ९२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.तसेच ४ हजार ३६० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ६२ लाख ८६ हजार ३४५ रुग्ण बरे झाले आहेत. आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के इतका आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण ५० हजार ४६६ इतकी आहे. 
 
गेल्या सलग अनेक दिवसांपासून राज्यातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या १० हजारांच्या खाली राहिल्याचे सांगितले जात आहे. तसेच मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वेगाने घसरताना दिसत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत केवळ ४२२ नवीन करोनाबाधितांची भर पडली आहे. तर याच कालावधीत ३०३ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. दिवसभरात मुंबईत ३ रुग्णांचा मृत्यू झाला.त्यामुळे मृतांचा एकूण आकडा १५ हजार ९८७ इतका झाला आहे. मुंबईत कोरोनाचे ३ हजार ४१८ उपचाराधीन रुग्ण आहेत.मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के असून, रुग्णवाढीचा दर ०.०५ टक्के इतका आहे. रुग्णदुपटीचा कालावधी १४१६ दिवसांवर गेला आहे. 
 
दरम्यान, आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ४४ लाख ८७ हजार ९५० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख ७७ हजार ९८७ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच राज्यात २ लाख ९८ हजार ०९८ जण गृह विलगीकरणात आहेत. तर, १ हजार ९५४ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त उपचाराधीन रुग्ण असून, राज्यातील एकूण १७ जिल्ह्यात उपचाराधीन रुग्णांची संख्या १०० च्या खाली आहे.