सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 21 डिसेंबर 2022 (15:33 IST)

चीनमध्ये कोरोनाचा कहर, 80 कोटी लोकांना होऊ शकतो संसर्ग, भारताला किती धोका?

चीनमध्ये आतापर्यंत कोव्हिड-19 ची सर्वांत मोठी लाट आली आहे. तिथे कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे.
चीनच्या अधिकाऱ्यांच्या मते येत्या काही महिन्यात देशामध्ये 19 ते 80 कोटी लोकांना कोव्हिडचा संसर्ग होऊ शकतो. चीनमध्ये कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या 5 लाख असू शकते, असं एनपीआरचा अहवाल सांगतो. मात्र, चीनने प्रसिद्ध केलेला अधिकृत आकडा यापेक्षा खूप कमी आहे.

चीनमधील अधिकृत आकडेवारीनुसार मंगळवारी (20 डिसेंबर) कोव्हिडच्या संसर्गामुळे पाच मृत्यू झाले आणि सोमवारी (19 डिसेंबर) दोन मृत्यू झाले. चीन ज्या तऱ्हेने मृत्यूंची गणना करत आहे, ती पद्धत जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांमध्ये न बसणारी आहे.

केवळ श्वसनाच्या संसर्गामुळे झालेले मृत्यूच चीन कोरोनामुळे झालेले मृत्यू असल्याचं मानत आहे.
चीनसोबतच दक्षिण कोरिया, जपानमध्येही कोरोना संसर्गाची प्रकरणं वेगाने वाढत आहेत.
चीनमधील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचं गांभीर्य लक्षात घेऊन आरोग्य मंत्रालयाने एक अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.
 
या अधिसूचनेमध्ये आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी म्हटलं आहे की, “भारत आपल्या कोव्हिडसंबंधीच्या पाच टप्प्यांच्या उपाययोजनेच्या माध्यमातून संसर्ग रोखण्यासाठी सक्षम आहे. टेस्ट, ट्रॅक, ट्रीट, लसीकरण आणि कोव्हिडसंबंधीच्या नियमांचं पालन करून हा संसर्ग आटोक्यात ठेवता येऊ शकतो.
 
चीन, जपान, ब्राझील, दक्षिण कोरिया आणि अमेरिकेमध्ये कोरोनाची प्रकरणं वेगाने वाढताना दिसत आहे. त्यामुळे आपण सर्व पॉझिटिव्ह केसेसचं जीनोम सिक्वेन्सिंग करायला हवं, जेणेकरून व्हेरियंट कोणते आहेत हे ट्रॅक करता येईल. मी सर्व राज्यांना आवाहन करतो की, त्यांनी कोरोनाशी संबंधित नमुने हे जीनोम सिक्वेन्सिंगसाठी प्रयोगशाळेत पाठवावेत.”

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी (20 डिसेंबर) भारतात कोरोनाचे 112 रुग्ण आढळले. देशात कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 3490 आहे.
 
चीनवर प्रवास बंदी घालण्याची मागणी
सोशल मीडियावर चीनमधील वाढत्या संसर्गाशी संबंधित व्हीडिओ शेअर केले जात आहेत. हे व्हीडिओ शेअर करतानाच लोक भारत सरकारकडे चीनवर पूर्णपणे प्रवास बंदी घालण्याची मागणीही करत आहेत.
 
चित्रपट निर्माता तनुज गर्ग याने एक व्हीडिओ ट्वीट केला आहे. त्याने सोबत म्हटलं आहे, “माझी अस्वस्थता वाढत आहे. आपण हातावर हात ठेवून बसलो आहोत. चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आहे आणि अजून एका नवीन व्हेरिएंटचा धोका आहे. जर आपण आपल्या देशात कोरोनासंबंधीचे नियम कडक नाही केले, तर देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन लावला जाऊ शकतो.”
करण वर्मा नावाच्या एका युजरने लिहिलं आहे, “चीनवर तातडीने प्रवास बंदी लावण्यात आली पाहिजे. कोरोनाशी लढण्यासाठी आपण तयार असायला हवं. काहीही झालं तरी देशात 2021 सारखी परिस्थिती पुन्हा निर्माण होता कामा नये.”
भारतात कोव्हिड ट्रॅक करणाऱ्या प्रोफेसर शमिका रवी यांनीही यासंबंधी ट्वीट केलं आहे, “चीन कोरोना संसर्ग ज्यापद्धतीने हाताळत आहे, ते म्हणजे कोव्हिडची परिस्थिती कशी हाताळू नये याचंच उदाहरण आहे. ते ज्या कठोर ‘झीरो कोव्हिड’ धोरणाबद्दल बोलत आहेत, त्यातल्या त्रुटी समोर आल्या आहेत. आता चीन या आरोग्य संकटासोबतच व्यापारविषयक संकटाला सामोर जात आहे.”
 
चीनमध्ये नेमकं काय सुरू आहे?
चीनच्या सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, येत्या काही महिन्यांमध्ये कोरोनामुळे 80 कोटी लोक संक्रमित होऊ शकतात आणि मृतांचा आकडा पाच लाख असू शकतो.
 
रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार चीनमधील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन अधिकारी शू वेंबो यांनी पत्रकारांशी बोलताना व्हायरसचा नवीन व्हेरिएंट वेगाने म्युटंट होणारा असल्याचं सांगितलं. मात्र, तो फार धोकादायक नसल्याचंही त्यांनी म्हटलं.
 
अमेरिकेतील संस्था एनपीआरमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, कोरोनाच्या या लाटेत देशातील जवळपास 60 टक्के लोकसंख्येला संसर्ग होऊ शकतो, असं येल विद्यापीठात सार्वजनिक आरोग्यावर संशोधन करणाऱ्या आणि चिनी आरोग्य व्यवस्थेतील तज्ज्ञ शी चेन यांनी म्हटलं. चीनमधील आरोग्य अधिकारी डॉक्टर शाओफेंग लिएंग यांचा हवाला शी चेन यांनी दिला.
 
अहवालामध्ये म्हटलं आहे, “याचा अर्थ येणाऱ्या 90 दिवसात पृथ्वीवरची 10 टक्के लोकसंख्येला कोरोनाची लागण होऊ शकते.”
या महिन्याच्या सुरूवातीला चीनने आपलं झीरो कोव्हिड धोरण काहीसं शिथील केलं. त्यानंतर इथे कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.
 
चीनमधील अधिकृत आकडेवारीनुसार मंगळवारी (20 डिसेंबर) कोव्हिडच्या संसर्गामुळे पाच मृत्यू झाले आणि सोमवारी (19 डिसेंबर) दोन मृत्यू झाले. चीन ज्या तऱ्हेने मृत्यूंची गणना करत आहे, ती पद्धत जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांमध्ये न बसणारी आहे.
 
चीन केवळ न्यूमोनियासारख्या श्वसनाशी संबंधित आजारामुळे झालेले मृत्यूच कोव्हिडमुळे झाल्याचं गृहीत धरत आहे. हीच पद्धत जागतिक आरोग्य संघटनेच्या पद्धतीच्या बरोबर उलट आहे.
 
देश आपापली मानकं निश्चित करून कोव्हिडमुळे होणाऱ्या मृत्यूंची आकडेवारी सादर करत आहे. अशावेळी देशांमध्ये तुलना करणंही अवघड होतं, असं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे.
 
थेट कोरोनामुळे मृत्यू झाला नाही, मात्र कोरोनाशी संबंधित कारणांमुळे झाला असला तरी त्याचा समावेश कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंमध्येच करावा ,असं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे.
 
Published By- Priya Dixit