शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 27 एप्रिल 2020 (22:09 IST)

'ही' पण आहेत कोरोनाची लक्षणे

याआधी कोरडा खोकला, ताप आणि श्वास घेण्यास अडचण येणे अशी कोरोना व्हायरसची लक्षणे असल्याचे सांगितले जात होते. मात्र अमेरिकेच्या सीडीसी (सेंटर्स फॉर डिसीज अँड प्रिव्हेंशन) या संस्थेने सहा नवीन लक्षणे समोर आणली आहेत. यामुळे आता कोरोना संसर्गाच्या नऊ लक्षणांचा शोध लागल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. अमेरिकेत कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत.
 
सीडीसीने आपल्या संशोधनात म्हटले आहे की, आतापर्यंत कोरोनाच्या इतर लक्षणांवर दुर्लक्ष केले गेले. सीडीसीच्या संशोधकांनी जी नवीन लक्षणे समोर आणली आहेत, ती रुग्णांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर २ ते १४ दिवसांच्या दरम्यान दिसून येतात. ही लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत.
 
१. कोरोनाचा शरीरात संसर्ग झाल्यानंतर शरिराला थंडी जाणवू लागते, हुडहुडी भरते. जसे इतर व्हायरल इन्फेक्शनमध्ये सर्दी होते तशी.
 
२. कोरोना पॉझिटिव्ह झालेल्या व्यक्तीचे शरीर थंडीने कापू लागते.
 
३. रुग्णाचे स्नायू दुखायला लागतात.
 
४. सीडीसीने चौथे लक्षण सांगितले आहे डोकेदुखीचे. अमेरिका आणि चीनमध्ये अनेक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये जोरात डोकेदुखी होण्याचे लक्षण दिसून आले आहे.
 
५. आतापर्यंत कोरोना व्हायरस हा गळ्यात राहिल्यामुळे गळ्याला सूज येण्याचे लक्षण दिसून येत होते. मात्र आता गळ्यात खवखवत असेल तर ते देखील लक्षण असल्याचे सांगण्यात आले आहे.
 
६. सीडीसीने जे सहावे लक्षण सांगितले आहे, त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तिला पदार्थाची चव लक्षात येत नाही. अनेक देशात कोरोनाबाधितांचा सर्वे केल्यानंतर ही गोष्ट लक्षात आली आहे. कोरोना झालेला रुग्ण पदार्थाची चव ओळखण्यात असमर्थ ठरत आहे.
 
अमेरिकेच्या सीडीसीने संशोधन केलेल्या या सहा लक्षणामुळे आता रुग्णांचा शोध घेणे आणखी सोपे होऊ शकते. जगभरात सध्या ३० लाख लोक कोरोना व्हायरसने बाधित झाले आहेत. तर २ लाखांहून अधिक लोकांचा यामुळे बळी गेला आहे.