सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 5 मे 2021 (18:17 IST)

महाराष्ट्र कोरोना : 12 जिल्ह्यांमध्ये दिलासा आणि 18 जिल्ह्यांमध्ये चिंता

मयुरेश कोण्णूर
महाराष्ट्राची कोरोनाची परिस्थिती म्हणजे एका डोळ्यात आनंद आहे तर दुसऱ्या डोळ्यात चिंता अशी आहे. कारण महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाबत दिलासादायक स्थिती असताना, 18 जिल्ह्यात मात्र चिंताजनक स्थिती आहे.
 
दुसऱ्या लाटेची सुरुवात झाल्यापासून राज्यातल्या ज्या जिल्ह्यांमध्ये सातत्यानं रुग्णवाढ होत होती त्यातल्या 12 जिल्ह्यांमध्ये आता मोठा काळ रुग्णसंख्या स्थिर राहून कमी होते आहे, असं निरिक्षण केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं नोंदवलं आहे.
 
सोमवारी (3 मे) त्याबद्दल जाहीररित्या त्यांनी महाराष्ट्राचं कौतुकही केलं. पण दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्रातल्या 16 जिल्ह्यांमध्ये रुग्णवाढ आणि ऑक्सिजनची आवश्यकता वाढते असं म्हणत महाराष्ट्रात केंद्राकडे अधिक ऑक्सिजन पुरवठ्याची मागणी केली आहे.
 
महाराष्ट्र्रातल्या आकड्यांमध्ये स्थिरता येते आहे, हे निरिक्षण आरोग्य मंत्रालयानंही नोंदवलं आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये काही आठवड्यांपूर्वी वैद्यकीय व्यवस्थेची परिस्थिती गंभीर बनली होती, तिथं आकडे बऱ्याच काळासाठी स्थिर होत मग कमी होतांना दिसत आहेत. पण त्यासोबत काही जिल्ह्यांमध्ये आकडे वाढत चालले आहे.
या जिल्ह्यांमधला जोर ओसरला
"महाराष्ट्रात 12 जिल्हे असे आहेत की जिथं रुग्णसंख्या कमी होते आहे असं आम्हाला दिसतं आहे," असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी काल म्हटलं. त्यात त्यांनी या जिल्ह्यांची नावंही घेतली.
 
त्यांनी घोषित करतांना मात्र 11 जिल्ह्यांची नावं सांगितली, पण राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही मंगळवारच्या त्यांच्या पत्रकार परिषदेत या जिल्ह्यांच्या कमी झालेल्या रुग्णसंख्येचा उल्लेख करतांना नाशिकचाही उल्लेख केला.
 
आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार गेल्या 15 दिवसांपासून ही रुग्णसंख्या थोडी थोडी कमी होत गेली. त्यामुळे या जिल्ह्यांची 15 दिवसांपूर्वीची संख्या काय होती आणि आता काय आहे याचा आलेख पाहणे महत्वाचे ठरेल.
या आकड्यांकडे नजर टाकली तर कमी झालेल्या आकड्यांचा अंदाज येतो. अर्थात कमी झालेला फरक खूप मोठा नाही आहे हेही स्पष्ट आहे, पण तरीही बराच काळ ते आकडे स्थिर राहिल्यानंतर थोडे कमी झाले आहेत. जोर ओसरण्याचा हा प्राथमिक संकेत आहे असे यासाठीच आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. पण त्यावरुन अंतिम निष्कर्ष काढता येणार नाही.
 
उदाहरणार्थ वाशिम जिल्ह्याचं उदाहरण घेता येईल. आकडे स्थिर राहिले पण तीन मे रोजी ते पंधरा दिवसांपूर्वी होते त्याच्या दुप्पटीपेक्षा अधिक झाले. मंगळवारी 4 मे रोजी ते पुन्हा कमी होऊन 410 इतके झाले. होणा-या चाचण्या, त्यांची परिणामकारकता यांवरही ब-याच गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे इथे लाट ओसरली असं म्हणता येत नाही. पण या 12 जिल्ह्यांमधून महाराष्ट्राला सध्याच्या परिस्थितीत थोडा दिलासा मिळावा असं चित्र आहे.
 
पण आकडे लोकांना येणारे अनुभव सांगू शकत नाहीत. आकड्यांमध्ये स्थिरता आली किंवा ते कमी झाले म्हणून या जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय उपचार मिळवण्यासाठी नागरिकांची होणारी ससेहोलपट कमी झाली का? आम्ही तिथल्या काही स्थानिक पत्रकारांशी बोललो तेव्हा समजलं की परिस्थिती अद्यापही बिकट आहे.
"आठवड्याभरापूर्वी बेड मिळतच नव्हते किंवा काही दिवस लागत होते तशी आता स्थिती नाही आहे. पण तरीही लगेचच तुम्हाला बेड मिळेलच असं नाही. तीन चार ठिकाणी फिरल्यानंतर बेड मिळतो," असं नाशिकहून प्रविण ठाकरे सांगतात. "सरकारी हॉस्पिटल्स तर सगळी भरलेली आहेत. ब-याचदा लांबच्या खाजगी हॉस्पिटलकडे जावं लागतं आहे.
 
ऑक्सिजन चा पुरवठा आता सुरळीत आहे. काही दिवसांपूर्वी जसे हॉस्पिटल्सनं ऑक्सिजन नाही म्हणून रुग्ण घेणार नाही असे बोर्ड्स लावले होते, ते आता नाहीत. पण रेमेडेसिविरसाठी अजूनही लोकांची पळापळ होते आहे," असं प्रविण नाशिकबद्दल सांगतात.
 
मराठवाड्यात औरंगाबादमध्येही आता बेड मिळणारच नाही अशी स्थिती नाही असं तिथले 'लोकसत्ता'चे वरिष्ठ वार्ताहर सुहास सरदेशमुख सांगतात. "पण जिथं हवं तिथंच उपचार मिळतील असं नाही.
 
दूरच्या हॉस्पिटल्समध्ये जावं लागतं. ग्रामीण भागात परिस्थिती बिकट आहे. टेस्टिंग होतच नाही, त्यामुळे नेमका संसर्ग समजत नाही. माझ्या माहितीत अशी काही उदाहरणं आहेत की व्यक्ती गेल्यावर समजलं की ती पॉझिटिव्ह होती. त्यामुळं परिस्थिती सुधारली आहे, पण अत्यल्प," असं सरदेशमुख म्हणतात.
 
16 जिल्ह्यांची परिस्थिती गंभीर, ऑक्सिजनची गरज
एकीकडे महाराष्ट्राची एकंदरीत रुग्णसंख्या कमी होते आहे आणि काही जिल्ह्यांत जोर ओसरतो आहे असं असलं तरीही 16 जिल्हे असे आहेत जिथली स्थिती अधिक गंभीर होऊ शकते.
 
महाराष्ट्र सरकारनं हे जाहीररित्या सांगितलं आहे. राज्यात ऑक्सिजनची उपलब्धता त्यामुळे कमी होऊ शकते. म्हणून मंगळवारी (4 मे) राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी केंद्रीय कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांना पत्र लिहून महाराष्ट्राची ऑक्सिजन ची वाढीव मागणी नोंदवली.
आपल्या पत्रात कुंटे यांनी लिहिलं आहे की, 'पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नंदुरबार, बीड, परभणी, हिंगोली, अमरावती, बुलढाणा, वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपूर या 16 जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या सातत्यानं वाढतांना दिसते आहे आणि ऑक्सिजन ची मागणीही वाढते आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्राला मिळणाऱ्या ऑक्सिजन च्या पुरवठामध्ये 200 मेट्रिक टनची वाढ करण्यात यावी.'
 
कुंटे यांच्या या पत्रामध्ये येऊ शकणाऱ्या भविष्यातल्या धोक्याला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही दुजोरा दिला आहे. त्यांनीही मंगळवारी (4 मे) घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये वाढत चाललेल्या आकड्यांकडे गांभीर्यानं सरकार पाहत असल्याचं म्हटलं आहे.
या काही जिल्ह्यांमध्ये भविष्यात परिस्थिती बिकट बनू शकते या शक्यतेमुळे काही जिल्ह्यांमध्ये कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रातल्या सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये त्याची अंमलबजावणी होणार आहे. जरी ही वाढ अशीच राहिली तर महाराष्ट्राची लढाई अधिक लांबेल, पण त्याच वेळेस आतापर्यंतच्या अनुभवावरुन सरकारी यंत्रणांनी आणि नागरिकांनी काय धडा घेतला हेही समजेल.