शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 27 एप्रिल 2020 (09:33 IST)

पोलिसांसाठी स्वतंत्र कोरोना दक्षता कक्ष – गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबईत दोन हॉस्पिटल राखीव
कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातील दोन पोलीस बांधवांचा मृत्यू झाला, ही अत्यंत दुःखद व दुर्दैवी घटना आहे. महाराष्ट्र शासन त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. दोघांच्याही कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची मदत व योग्य ती शासकीय नोकरी तसेच नियमानुसार मिळणारी मदत दिली जाईल. पोलिसांना तातडीने उपचार मिळावेत याकरिता एक स्वतंत्र कोरोना दक्षता कक्ष निर्माण करण्यात आला आहे, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फेसबूकद्वारे संवाद साधताना स्पष्ट केले.
 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लढाईमध्ये आपले पोलीस दल अत्यंत कठीण अशा परिस्थितीत काम करत आहे. पोलिसांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे आहे.
 
कोरोना विशेष कक्ष व नोडल अधिकारी
कोरोना संदर्भात प्रकृतीची कोणतीही तक्रार असलेल्या पोलिसाला वा अधिकाऱ्याला तातडीने उपचार मिळावेत याकरिता एक स्वतंत्र कोरोना दक्षता कक्ष निर्माण करण्यात आला आहे. मुंबईसाठी सहपोलीस आयुक्त नवल बजाज तर महाराष्ट्रासाठी अतिरिक्त महासंचालक संजीव सिंघल यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात येत आहे. जिल्हा स्तरावर देखील संबंधित पोलीस आयुक्त व जिल्हा पोलीस अधीक्षक हे अशा प्रकारचे कक्ष निर्माण करतील. तसेच मुंबईमध्ये दोन हॉस्पिटल हे पोलिसांसाठी राखीव ठेवण्यात येतील, अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली.
 
कोरोना विरुद्धच्या लढाईत आपल्याला कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवायचा आहे. त्यासाठी समाजातील सर्व घटकांनी सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी यावेळी केले.
 
वाधवान प्रकरण
वाधवान प्रकरणाबद्दल अधिक माहिती देताना गृहमंत्री म्हणाले की, आज दि.२६ रोजी दुपारी साडेतीन वाजता सातारा पोलीस अधीक्षकांनी धीरज व कपील वाधवान या दोघांना सीबीआयच्या ताब्यात दिले. तसेच त्यांचे कुटुंबातील इतर लोकांना होम कॉरंटाइन केले आहे.
 
या कुटुंबाला महाबळेश्वर येथे जाण्यासाठी जे पत्र गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी दिले होते, त्याबाबत नेमलेल्या अपर मुख्य सचिव मनोज सौनिक चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाला असून तो अहवाल रीतसर माझ्याकडे येईल आणि पुढे मा.मुख्यमंत्र्यांकडे जाईल. त्यावर योग्य तो निर्णय होईल.
 
या अहवालात अमिताभ गुप्ता यांनी स्वतः हे पत्र मानवतेच्या आधारावर दिल्याचे कबूल केले. त्यामुळे पत्र देण्याबाबत त्यांच्यावर कोणाचाही दबाव नव्हता हे स्पष्ट झाले आहे तसेच याचा चौकशी अहवाल लवकरच सार्वजनिक करण्यात येईल.
 
कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी कसलेही राजकारण न करता सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन श्री.देशमुख यांनी केले आहे.