शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: रविवार, 2 जानेवारी 2022 (17:34 IST)

ओमिक्रॉन कोरोना : महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 9170 नवे कोरोना रुग्ण, एकट्या मुंबईत 6180

देशभरात कोरोना व्हायरस पुन्हा डोकं वर काढताना दिसून येत आहे. कोरोनाची तिसरी लाट टाळण्यासाठी सर्वच ठिकाणी खबरदारी घेत विविध प्रकारचे निर्बंध लागू करण्यात येत आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 9170 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. त्यापैकी 6180 नवे रुग्ण एकट्या मुंबईतले आहेत. महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्रालयाकडून प्रसिद्ध केलेल्या दैनंदिन अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
सध्या कोरोना व्हायरसच्या ओमिक्रॉन व्हेरियंटवर सर्वांचं विशेष लक्ष आहे. महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वीच ओमिक्रॉनचा शिरकाव झाला होता.
आज महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा संसर्ग झालेले 6 रुग्ण आढळून आले. या व्हेरियंटची लागण झालेले एकूण 460 रुग्ण राज्यात आतापर्यंत आढळले आहेत.
त्यापैकी सर्वाधिक 327 ओमिक्रॉन रुग्ण मुंबईत आढळून आले आहेत.
तर पिंपरी-चिंचवडमध्ये 28 पुणे ग्रामीण 21, पुणे शहर 13 तसंच ठाणे शहरात 12 ओमिक्रॉन रुग्ण आढळून आले.
याव्यतिरिक्त, नवी मुंबई, पनवेल, कल्याण-डोंबिवली, नागपूर आणि सातारा यांसारख्या शहरांमध्येही ओमिक्रॉन व्हेरियंटने बाधित झालेले रुग्ण आढळून येत आहेत. म्हणजेच, फक्त शहरी नव्हे तर ग्रामीण भागातही ओमिक्रॉन बाधितांची संख्या दिसून येत आहे.