राज्यात एकाच दिवशी 5 हजार 71 कोरोना रुग्णांना घरी सोडण्याचा विक्रम!
कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतेय तसे कोरोनातून बरे होणार्यांची संख्याही वाढत असून, काल राज्यभरात तब्बल 5 हजार 71 कोरोना रुग्णांना घरी सोडण्यात आले. यात मुंबई क्षेत्रातील तब्बल 4242 रुग्ण आहेत. आतापर्यंत 56 हजार 49 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. एकीकडे ही दिलासा देणारी बातमी असताना राज्यात आज आणखी 2786 नवीन रुग्ण आढळून आले तर 178 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला.
कोरोनाचा संसर्ग झाल्यापासून 29 मे रोजी राज्यात एकाच दिवशी 8381 रुग्णांना घरी सोडण्यात आले होते. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यानंतर सातत्याने बरे होणार्या रुग्णांचा आलेख वाढत असून सुमारे 15 दिवसानंतर आज पुन्हा एकदा बरे होणार्या रुग्णांची संख्या पाच हजारापेक्षा अधिक होती. आज घरी परतलेल्या 5071 रुग्णांमध्ये मुंबई मंडळातील 4242, पुणे मंडळात 568, नाशिक मंडळात 100, औरंगाबाद मंडळातील 75 रुग्णांचा समावेश आहे. राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्याच्या तीन महिन्यानंतर राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 47.2 टक्के आहे. त्यात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.