गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 7 जून 2021 (08:32 IST)

कोवॅक्सिनच्या लहान मुलांवरील चाचणीला नागपुरात सुरूवात

भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन या कोरोना प्रतिबंधक लसीच्या लहान मुलांवरील चाचणीला नागपुरात सुरूवात झाली आहे. देशभरात दिल्ली, पटना सह नागपूरमध्ये ही चाचणी होत आहे. नागपूरच्या मेडीट्रीना या हॉस्पिटलमध्ये लहान मुलांवरील कोरोना लसीची ट्रायल चालणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात १२ ते १८ वयोगटातील मुलांना पहिला डोस दिला जाणार आहे अशी माहिती मेडीट्रीना चे संचालक डॉ समीर पालतेवार यांनी दिली. 
 
भारत बायोटेक कंपनीने लहान मुलांसाठी (२ ते १८ वर्ष) कोवॅक्सिन ही कोरोना प्रतिबंधक लस विकसित केली आहे. वयवर्ष २ ते १८ या वयोगटासाठी 'भारत बायोटेक'च्या कोविड विषाणूविरुद्ध लढणाऱ्या 'कोव्हॅक्सिन' या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील "ट्रायलची" शिफारस केन्द्रीय तज्ञांच्या समितीने केली होती. त्यानुसार भारत बायोटेकच्या २ ते १८ वयोगटासाठी कोव्हॅक्सिनच्या क्लिनिकल चाचण्या करण्याची शिफारस केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या कोव्हिड-१९ बाबतच्या सबजेक्ट एक्सपर्ट कमिटीच्या तज्ज्ञांनी केली आहे. 
 
संपूर्ण प्रक्रियेत लसीकरण होणाऱ्या लहान मुलांचे सर्व समुपदेशन करण्यात आले आहे. यात त्याची प्रकृती सुदृढ आहे की नाही, या अनुषंगाने तपासणी करण्यात आली आहे. आज त्यांना कोरोनाची लागण झाली आहे का? याची चाचणी करून घेण्यात आली आहे. यासोबत अँटीबॉडीची सुद्धा तपासणी करण्यात आली.  ही चाचणी प्रक्रिया २०८ दिवस चालणार असून या प्रक्रियेची पूर्ण माहिती देऊन त्या लहान मुलांना प्रक्रियेचा भाग बनवण्यात आले आहे. तीनही वयोगटात प्रत्येकी ५० मुलांवर ही कोरोना लसीची चाचणी घेण्यात येणार आहे.