1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 22 डिसेंबर 2022 (22:47 IST)

कोरोनाबद्दल राज्य सरकार म्हणतं, मास्कसक्ती नाही पण...

shinde devendra
चीन आणि काही देशांमध्ये कोरोनाच्या बीएफ 7 व्हेरिएंटच्या उद्रेकानंतर केंद्र पातळीवर उच्चस्तरीय बैठक झाली.
 
त्याचप्रमाणे महाराष्ट्रात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांचीही बैठक झाली. यामध्ये अधिकाऱ्यांनी ठेवलेल्या अहवालानुसार काही दिशानिर्देशक सूचना देण्यात आल्या आहेत.
 
सध्या मास्क सक्ती नसली तरी रुग्णालयांनी आपल्या अतिदक्षता विभागातील सोयी, व्हेंटिलेटर्स ऑक्सिजन प्लांट्स व्यवस्थित सुरू आहेत का ते पाहावे अशा सूचना दिल्या आहेत. 
 
महाराष्ट्र सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही सूचना जाहीर केल्या आहेत. 
 
भीती नको पण काळजी घ्या- चीनमध्ये आढळलेल्या व्हेरिएंट महाराष्ट्रात आढळलेला आहे, त्यामुळे घाबरण्याऐवजी कोव्हिड अनुरुप काळजी आणि लसीकरणावर भर द्यावा.  
मास्क सक्ती नाही- सध्या मास्क सक्ती नसली तरी वृद्ध आणि अतिजोखीम असणाऱ्या लोकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावा. 
पंचसुत्रीचा वापर- सर्व जिल्ह्यांनी टेस्ट-ट्रॅक- ट्रिट- व्हॅक्सिनेट आणि कोव्हिड अनुरुप काळजी या पंचसुत्रीचा वापर करावा.
प्रयोगशाळा आणि चाचण्या वाढवण्यावर भर द्यावा
100 टक्के जिनोम सिक्वेंसिंग करावे, कोव्हिड लसीकरण आणि प्रिकॉशन डोसवर भर द्यावा
 सर्व स्तरावर मनुष्यबळाचे प्रशिक्षण आणि क्षमता वाढवण्यावर भर
आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग आणि रँडम सँपलिंग अतीदक्षता विभाग,रुग्णालये सज्ज ठेवावीत.
प्रत्येक जिल्ह्याने कोव्हिड तयारीचा आढावा घ्यावा. 
 
कोरोनाच्या नव्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी व्हर्च्युअल बैठक घेतली.  
 
या बैठकीत केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया, गृहमंत्री अमित शाह, नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता. 
 
या बैठकीआधी लोकसभेत आरोग्यमंत्र्यांनी सांगितले, येणारा सणाचा काळ आणि नववर्ष स्वागताचा जल्लोष पाहाता राज्यांना सतर्क राहाण्याचे, मास्क वापरण्याचे, जागृती अभियान राबवण्याचे आणि सॅनिटायझर वापरण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश दिले आहेत. 
 
आज गुरुवार 22 डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय विमानतळावर रँडम आरटीपीसीआर सँपलिंग सुरू केलं आहे.
 
दुसऱ्या देशातून येणाऱ्यांसाठी आरटीपीसीआर सँपलिंग सुरू केलं असून या साथीविरोधात आवश्यक पावलं उचलण्य़ासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असंही मांडविया यांनी सांगितलं. 
 
आपण चीनच्या स्थितीवर लक्ष ठेवून आहोत, असं परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले.
 
काही विरोधी पक्षातील नेते आणि सोशल मीडियावरील लोकांनी भारत आणि चीन यांच्यातील विमान वाहतूक बंद करण्याची मागणी केली आहे. 
 
संसदेत नरेंद्र मोदींसह ज्येष्ठ नेत्यांची मास्क घालून उपस्थिती
 
चीनमध्ये कोरोना व्हायरसचा पुन्हा एकदा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. तेथील अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आलं असून कठोरपणे त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
 
तसंच इतर काही देशांतही कोरोना व्हायरसने बाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असल्याचं दिसून येतं.
 
या पार्श्वभूमीवर भारत सरकारने सर्व राज्यांना सतर्कतेच्या सूचना केल्या आहेत.
 
दरम्यान, दिल्ली येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात अनेक ज्येष्ठ नेत्यांनी मास्क परिधान करून उपस्थिती लावली.
 
आज (22 डिसेंबर) उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती जगदीप धनकड, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात मास्क परिधान करून बसले होते.
 
त्यांच्याशिवाय इतर काही खासदारही मास्क घालून सभागृहात आले होते, अशी माहिती ANI वृत्तसंस्थेने दिली आहे.
 
कोरोनाच्या BF.7 व्हेरियंटचे भारतात 3 रुग्ण
चीनमध्ये कोव्हिडची तिसरी लाट आणणाऱ्या कोरोना व्हायरसच्या BF.7 या व्हेरियंटचे रुग्ण भारतात आढळल्याची माहिती समोर आली आहे.
 
या व्हेरियंटचे 3 रुग्ण भारतात आढळल्याची बातमी NDTV वृत्तवाहिनीने PTI वृत्तसंस्थेच्या हवाल्याने दिली.
 
BH.7 व्हेरियंटचे भारतात गुजरातमध्ये दोन तर ओडिशात एक रुग्ण सापडला आहे.
 
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी याबद्दल एक बैठक घेतली आणि जगातील अनेक देशांमध्ये सध्याच्या कोरोना स्थितीचा आढावा घेतला.
 
मांडविया म्हणाले, काही देशांमध्ये कोव्हिड-19 च्या रुग्णांच्या वाढती संख्या पाहाता आज तज्ज्ञ आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली. कोव्हिड अद्याप संपलेला नाही. या संदर्भातील सर्व घटकांना सतर्क राहून लक्ष ठेवण्याचे आदेश मी दिले आहेत. कोणतीही स्थिती हाताळण्यास आम्ही तयार आहोत.”
 
केंद्र सरकारची सर्वच राज्यांना सतर्कतेची सूचना
चीनमध्ये किंवा इतर देशात जे सुरू आहे, त्याची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी प्रत्येक राज्याला सतर्क राहण्याची सूचना केली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली.
 
आज (21 डिसेंबर) एक पत्रकार परिषद घेऊन सावंत म्हणाले, “महाराष्ट्रात अशा प्रकारचा कोणताही रुग्ण सापडलेला नाही. घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही. लसीकरण पुरेसं झालेलं आहे. आरोग्य विभागही सज्ज आहे. या सर्वांचा आजच्या बैठकीत आढावा घेण्यात आला.”
 
“चाचणी, निगराणी, उपचार आणि लसीकरण या सगळ्या गोष्टींसाठी विभागाने तयार राहावं. तालुका क्षेत्रापासून ते महानगर क्षेत्रापर्यंत विभागाला या सर्व सूचना देण्यात आलेल्या आहेत,” असं सावंत यांनी सांगितलं.
 
यासंदर्भात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री एक बैठक घेऊन मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर केंद्रीय मंत्र्यांसोबतही आपण बैठकीत सहभागी होणार आहोत, असं सावंत म्हणाले.
 
केवळ 27-28 टक्के जणांना तिसरा डोस
कोव्हिडवर केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीनंतर नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले, “फक्त 27-28 टक्के लोकांनी कोरोना लसीचा तिसरा डोस घेतला आहे. आम्ही इतरांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करतो. सावधगिरीचा एक डोस अनिवार्य आहे आणि प्रत्येकाला मार्गदर्शन केले जाते. ”
 
ते पुढे म्हणाले, “तुम्ही गर्दीच्या ठिकाणी, घरामध्ये किंवा बाहेर असाल तर मास्क वापरा. को-मॉर्बिडिटी किंवा वृद्ध लोकांसाठी हे सर्व अधिक महत्वाचे आहे. आतापर्यंत हवाई प्रवासाबाबत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.”
 
'भारताला घाबरण्याची गरज नाही'
'भारताला घाबरण्याची गरज नाही, लसीकरण कव्हरेज आणि ट्रॅक रेकॉर्ड उत्कृष्ट आहे, असं सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांनी म्हटलं आहे.
 
चीनमध्ये कोरोनामुळे लाखो लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना पूनावाला यांनी चीनमधून येणाऱ्या बातम्या चिंताजनक असल्याचं म्हटलं. मात्र भारताने घाबरण्याची गरज नाही, असंही ते म्हणाले.
 
आदर पूनावाला म्हणाले, “भारतातील लसीकरणाचे उत्कृष्ट कव्हरेज आणि ट्रॅक रेकॉर्ड पाहता घाबरण्याची गरज नाही. भारत सरकारने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांवर आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि त्याचे पालन केले पाहिजे.”
 
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोव्हिड लशीचं उत्पादन केलं आहे.
 
चीनमध्ये नेमकं काय सुरू आहे?
चीनच्या सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, येत्या काही महिन्यांमध्ये कोरोनामुळे 80 कोटी लोक संक्रमित होऊ शकतात आणि मृतांचा आकडा पाच लाख असू शकतो.
 
रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार चीनमधील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन अधिकारी शू वेंबो यांनी पत्रकारांशी बोलताना व्हायरसचा नवीन व्हेरिएंट वेगाने म्युटंट होणारा असल्याचं सांगितलं. मात्र, तो फार धोकादायक नसल्याचंही त्यांनी म्हटलं.
 
अमेरिकेतील संस्था एनपीआरमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, कोरोनाच्या या लाटेत देशातील जवळपास 60 टक्के लोकसंख्येला संसर्ग होऊ शकतो, असं येल विद्यापीठात सार्वजनिक आरोग्यावर संशोधन करणाऱ्या आणि चिनी आरोग्य व्यवस्थेतील तज्ज्ञ शी चेन यांनी म्हटलं. चीनमधील आरोग्य अधिकारी डॉक्टर शाओफेंग लिएंग यांचा हवाला शी चेन यांनी दिला.
 
अहवालामध्ये म्हटलं आहे, “याचा अर्थ येणाऱ्या 90 दिवसात पृथ्वीवरची 10 टक्के लोकसंख्येला कोरोनाची लागण होऊ शकते.”
 
या महिन्याच्या सुरूवातीला चीनने आपलं झिरो कोव्हिड धोरण काहीसं शिथील केलं. त्यानंतर इथे कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.
 
चीनमधील अधिकृत आकडेवारीनुसार मंगळवारी (20 डिसेंबर) कोव्हिडच्या संसर्गामुळे पाच मृत्यू झाले आणि सोमवारी (19 डिसेंबर) दोन मृत्यू झाले. चीन ज्या तऱ्हेने मृत्यूंची गणना करत आहे, ती पद्धत जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांमध्ये न बसणारी आहे.
 
चीन केवळ न्यूमोनियासारख्या श्वसनाशी संबंधित आजारामुळे झालेले मृत्यूच कोव्हिडमुळे झाल्याचं गृहीत धरत आहे. हीच पद्धत जागतिक आरोग्य संघटनेच्या पद्धतीच्या बरोबर उलट आहे.
 
देश आपापली मानकं निश्चित करून कोव्हिडमुळे होणाऱ्या मृत्यूंची आकडेवारी सादर करत आहे. अशावेळी देशांमध्ये तुलना करणंही अवघड होतं, असं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे.
 
थेट कोरोनामुळे मृत्यू झाला नाही, मात्र कोरोनाशी संबंधित कारणांमुळे झाला असला तरी त्याचा समावेश कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंमध्येच करावा ,असं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे.
 
चीनमधलं हे संकट धोक्याची घंटा?
अमेरिकन वर्तमानपत्र वॉशिंग्टन पोस्टमध्ये चीनमधल्या कोव्हिडच्या नवीन लाटेबद्दल एक लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे.
 
त्यात म्हटलं आहे की, “चीनचं झीरो कोव्हिड धोरण हे टिकणारं नव्हतंच. त्यातही ते धोरण कोणत्याही तयारीशिवाय आणि बॅकअप प्लॅनशिवाय शिथील करण्याचा निर्णय घेतला गेला. त्यामुळे इथल्या लोकांना कोरोना संसर्गाचा धोका निर्माण झाला. या निर्णयामुळे कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.”
 
“हे संकट सगळ्या जगालाही हादरवून टाकू शकतं. तीन वर्षांपूर्वी वुहानमध्ये झालेल्या कोरोनाच्या उद्रेकानंतर सगळं जगही ठप्प झालं होतं. जे चीनमध्ये घडतंय, ते त्या देशापुरतंच मर्यादित राहील असं नाहीये.”
 
या लेखात पुढं म्हटलं आहे, “जिनपिंग सरकारने कोरोना काळात कठोर धोरणांचा अवलंब केला, लोकांना जबरदस्तीने क्वारंटाइन केलं. मात्र 7 डिसेंबरला चीनने कोरोनासंबंधीचे सर्व नियम शिथील केले. आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचं त्यांनी म्हटलं. पण सध्याचं चित्र पाहता परिस्थिती आटोक्यात नसल्याचंच दिसत आहे.”
 
“बीजिंगमध्ये ओमिक्रॉनचा संसर्ग अशा वेगानं पसरत आहे की, हे शहर ओसाडवाडी बनत आहे. ही भीती बीजिंगपुरती मर्यादित नाहीये, तर सगळ्या चीनमध्येच असं वातावरण आहे.
 
आकडेवारी दडविण्यासाठीच ओळखलं जाणारं चिनी सरकार दररोज समोर येणाऱ्या कोरोनाच्या प्रकरणांची नीट नोंदही ठेवत नाहीये. अनेक ट्रॅकिंग अॅप डिअॅक्टिव्हेट करण्यात आलेत. त्यामुळे चीनमध्ये नेमकी परिस्थिती काय आहे, कोरोनाची आकडेवारी काय आहे, याबद्दल गोंधळाचीच परिस्थिती आहे,” असं वॉशिंग्टन पोस्टच्या लेखात म्हटलं आहे.
 
नियम शिथील केल्यामुळे भलेही लोकांना बाहेर फिरण्याचं स्वातंत्र्य मिळालं आहे, पण परिस्थिती अशी आहे की लोकच स्वतःला घरात कोंडून घेत आहेत.
 
“चीनसाठी हे संकट अजूनच गहिरं होऊ शकतं. कारण त्यांच्या 60 हून अधिक वय असलेल्या लोकसंख्येपैकी केवळ 69 टक्के लोकांनीच बूस्टर डोस घेतला आहे. 80 हून अधिक वय असलेल्या लोकांमध्ये बूस्टर डोस घेतलेल्या लोकांची संख्या तर अजूनच कमी आहे. या लोकांना ओमिक्रॉनच्या संसर्गाचा धोका जास्त आहे.”
 
चीनमधून ज्या बातम्या समोर येत आहेत, त्यावरून मृतांचा आकडा वाढत जातोय हे स्पष्ट दिसतंय. स्मशानातले कर्मचारी रात्रंदिवस काम करत आहेत. गणिती प्रारुपानुसार विचार करता चीनमध्ये पुढच्या वर्षाच्या सुरूवातीला 10 लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होऊ शकतो.”
 
औषधांची रिकामी होणारी दुकानं आणि हॉस्पिटलमध्ये वाढते बेड
रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं लिहिलं आहे की, 2019 मध्ये जेव्हा वुहानमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला, तेव्हापासून आतापर्यंत कोरोना संसर्गामुळे केवळ 5242 लोकांचा मृत्यू झाल्याचं चीनने त्यांच्या अधिकृत आकडेवारीमध्ये म्हटलं आहे.
 
त्यामुळेच चीन आता जे आकडे दाखवत आहे, त्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
 
सात डिसेंबरपासून चीनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढतीये. त्यामुळे चीनमधल्या कोरोना मृत्यूंची संख्याही अधिक असू शकते.
 
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, “राजधानी बीजिंगमध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंसाठी निर्धारित केलेल्या स्मशानांबाहेर लोकांच्या रांगा लागल्या होत्या. सुरक्षा गार्ड या स्मशानांच्या फाटकांवर गस्त घालत होते.”
 
रॉयटर्सनं म्हटलं आहे की, बीजिंग या संसर्गाचा हॉटस्पॉट आहे. शांघाय शहरातही संसर्ग वेगानं पसरत आहे, इथे रस्त्यावर दिवसाही कोणी दिसत नाहीये. साहजिकच, कोव्हिडची वाढती रुग्णसंख्या देशाच्या आरोग्य व्यवस्थेवरचा दबाव वाढवत आहे.
 
चीनमध्ये मेडिकलच्या अनेक दुकानं रिकामी झाली आहेत. लोक घाबरून औषधांचा साठा करून ठेवत आहेत. त्यामुळे अनेक गरजेची औषधंही मिळत नाहीयेत.
 
चीनमधील रुग्णालयातील आरोग्य सुविधा वाढविल्या जात आहेत. नवीन आयसीयू बनवले जात आहेत. बेड्सची संख्या वाढवली आहे.
 
गेल्या आठवड्यात बीजिंग, शांघाय, वांग्झाऊ, चेंग्दूसह देशातील प्रमुख शहरांनी तापावर उपचारासाठी तात्पुरते दवाखाने उघडल्याची घोषणा केली. काही खेळाच्या मैदानांचं रुपांतरही क्लिनिकमध्ये करण्यात आलं आहे.