राज्यात ५२,६५३ अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७६ टक्के
राज्यात रविवारी नव्या कोरोनाबाधितांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट झाली असून हे प्रमाण ९४.७६ टक्क्यांवर पोहोचलं आहे. त्यामुळे राज्यात सध्या ५२,६५३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, राज्यात रविवारी ३,०८१ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली तर ५० जणांचा मृत्यू झाला. नवीन २,३४२ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण १८,८६,४६९ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यात एकूण ५२,६५३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९४.७६ टक्के झालं आहे.
पुणे शहरात दिवसभरात २७३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान, ३४५ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यत १, ७५, ९७३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच पिंपरी-चिंचवड शहरात दिवसभरात १२३ कोरोनाबाधितांची नोंद झाली असून एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.