बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वर्ल्ड कप 2023
Written By
Last Modified: शनिवार, 7 ऑक्टोबर 2023 (13:44 IST)

क्रिकेट वर्ल्ड कप : विमानाचं तिकीट काढलं, हॉटेल बुकिंग केलं, पण भारताचा व्हिसाच मिळत नाही

तरहब असग़र
"आम्हाला भारत पाहण्याची संधी कधी मिळेल हे कुणीही सांगू शकत नाही आणि अशा परिस्थितीत तिथं जाऊन क्रिकेट बघायला मिळणं ही गोष्ट आमच्यासाठी खूपच मोठी आहे. पण अडचण अशी आहे की अजूनतरी पाकिस्तानच्या नागरिकांना भारताने व्हिसा द्यायला सुरुवात केलेली नाही."
 
इस्लामाबादमध्ये राहणारे झीशान अली हे सांगत होते. त्यांना क्रिकेट आवडतं आणि त्यामुळं भारतात जाऊन वर्ल्डकपचे सामने बघण्याची त्यांची इच्छा आहे.
 
त्यांनी बीबीसीला सांगितलं की, "मी पाकिस्तानच्या भारत, श्रीलंका आणि अफगाणिस्तानसोबतच्या सामन्यांची तिकिटं काढली आहेत."
 
व्हिसाची वाट बघून बघून आता झीशान यांना नैराश्य येतंय. ते म्हणतात की, "मी हॉटेलचं बुकिंगही केलंय. मात्र भारताने अजूनही व्हिसा द्यायला सुरुवात केलेली नाही याचं दुःख आहे. व्हिसाची वाट बघून बघून आता सामने बघण्याचा माझा उत्साहच कमी होत चाललाय."
 
पाकिस्तानी क्रिकेट रसिक व्हिसाच्या प्रतीक्षेत
अहमदाबादमध्ये 5 ऑक्टोबरला वर्ल्डकपची सुरुवात झालीय. इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये वर्ल्ड कपच्या पहिला सामना खेळवला गेला.
 
पहिल्याच सामन्यात प्रेक्षकांच्या अनुपस्थितीमुळे वर्ल्ड कपचा उत्साह कमी झाल्याच्या चर्चा सुरु झाल्यात आणि दुसरीकडे पाकिस्तानचे शेकडो क्रिकेट चाहते अजूनही व्हिसाच्या प्रतीक्षेत आहेत.
 
पाकिस्तानचा पहिला सामना शुक्रवारी (6 ऑक्टोबर) नेदरलँड्स विरुद्ध होणार आहे. भारतात वर्ल्ड कप आयोजित केलेला असल्यामुळे जगभरातील क्रिकेटप्रेमींचे जथ्थे याआधीच तिथे दाखल झाले आहेत.
 
झीशान अली यांनी सांगितलं की भारत-पाकिस्तान सामन्याचं एक तिकीट त्यांनी तब्बल 27 हजार रुपये देऊन खरेदी केलंय.
 
भारताचा व्हिसा हवा असेल तर नियमानुसार दोन गोष्टी लागतात. एक म्हणजे स्वतःचं कार्ड वापरून खरेदी केलेलं सामन्याचं तिकीट आणि यासोबतच तुम्ही ज्या हॉटेलमध्ये राहणार आहात तिथलं बुकिंग.
 
ते म्हणतात की, "आम्हाला रोज असं वाटतं की 'आज आमचं नशीब खुलेल आणि व्हिसा मिळेल' पण तसं होत नाही. मात्र आता हळूहळू आम्ही निराश होत आहोत."
 
केवळ सर्वसामान्य नागरिकांनाच व्हिसा देण्यात आलेला नाही अशी परिस्थिती नाहीये तर भारतात जाऊन वर्ल्ड कपचं वार्तांकन करू पाहणाऱ्या क्रीडा पत्रकारांनाही व्हिसा मिळालेला नाही.
 
नियमानुसार व्हिसा नाकारता येतो का?
'वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा मिळेल की नाही?'
 
भारतात जाऊन क्रिकेट पाहण्याची इच्छा असलेल्या प्रत्येक पाकिस्तानी नागरिकाला या प्रश्नाचं उत्तर हवंय. मात्र, अजूनपर्यंत तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळ (आयसीसी) किंवा भारत सरकार यापैकी कुणीही या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर दिलेलं नाही.
 
बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं की नेमक्या किती पत्रकारांना आणि पाकिस्तानच्या क्रिकेट चाहत्यांना व्हिसा मिळेल याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे भारताचं परराष्ट्र मंत्रालय आणि आयसीसी नेमके किती व्हिसा देण्यात यावेत हे ठरवत आहेत.
 
बीसीसीआयने सांगितलं होतं की, "काही पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांना आम्ही नक्की व्हिसा देऊ."
 
या अतिशय संक्षिप्त आणि अस्पष्ट विधानानंतर बीसीसीआय आणि भारत सरकारने याबाबत संपूर्ण मौन बाळगलं आहे.
 
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड काय म्हणतंय?
दुसरीकडे, पाकिस्तानमधील भारतीय उच्चायुक्तालयासाठी व्हिसा अर्ज आणि पासपोर्ट स्वीकारणाऱ्या कंपनीच्या म्हणण्यानुसार, त्यांना अद्याप भारतीय उच्चायुक्तालयाकडून कोणत्याही सूचना मिळालेल्या नाहीत. यामुळे त्यांनी सध्या व्हिसासाठी नवीन अर्ज घेण्याची प्रक्रिया थांबवली आहे.
 
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीला याबाबत ईमेलही पाठवला आहे. यामध्ये त्यांनी विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या देशाच्या आचारसंहितेचा संदर्भही दिलेला आहे.
 
पाकिस्तानी पत्रकार आणि क्रिकेट चाहत्यांना अद्याप व्हिसा न देणं हे नियमांचं उल्लंघन असल्याचं पाकिस्तानच्या बोर्डाने सांगितलंय.
 
पत्रकारांचं काय म्हणणं आहे?
पाकिस्तानमधील एका खासगी टीव्हीच्या क्रीडा पत्रकाराने बीबीसीला सांगितलं की, विश्वचषकाचे सामने कव्हर करण्याची त्यांची तयारी पूर्ण झालेली होती, पण व्हिसा न मिळाल्यामुळे त्यांनी हॉटेल आणि विमानाचं तिकीट रद्द केलं.
 
ते म्हणाले की, "पूर्वीच्या नियोजनानुसार मी आज भारतात जायला निघणार होतो पण ते शक्य झालं नाही."
 
पाकिस्तानच्या खाजगी वाहिनीसोबत काम करणाऱ्या पत्रकार मारिया राजपूत यांनी सांगितलं की, "मला आठवतं की ऑस्ट्रेलियाचा आमचा व्हिसा तीन दिवसांत आला होता, भारताने मात्र आयसीसीची मान्यता असणाऱ्या पत्रकारांनादेखील अजूनपर्यंत व्हिसा दिलेला नाहीये."
 
त्यांनी सांगितलं की यावेळी केवळ काही निवडक पत्रकारांनाच आयसीसीने मान्यता दिलेली आहे.
 
असे अनेक लोक आहेत ज्यांचं स्वतंत्र युट्युब चॅनल आहे किंवा जे डिजिटल मीडियामध्ये काम करतात आणि त्यांनी स्वतःचे पैसे खर्च करून विमानाची तिकिटं बुक केली आहेत.
 
त्यामुळे याबाबत त्या म्हणाल्या की, "पत्रकारांची अशी अवस्था असेल तर सामान्य क्रिकेट चाहत्यांची काय परिस्थिती असेल याचा अंदाज तुम्ही लावू शकता."
 
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या भूमिकेवर शंका उपस्थित करताना त्या म्हणाल्या की या संस्था या मुद्द्याला महत्व देत नाहीयेत.
 
पत्रकारांनी आयसीसी मान्यताप्राप्त पत्रकारांची यादीही परराष्ट्र मंत्रालयाला दिली होती, जेणे करून हे प्रकरण सरकारी पातळीवर मांडता येईल, पण त्यानंतर चार-पाच दिवस उलटून गेले आणि तिथूनही प्रतिसाद मिळत नाही.
 
भारताचा व्हिसा कधी मिळेल?
या प्रकरणावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या प्रवक्त्याने बीबीसीला सांगितलं की पीसीबीने हे प्रकरण आयसीसीकडे अनेकवेळा मांडलं आहे.
 
ते म्हणाले की, "आम्ही त्यांना दोन-तीन वेळा ईमेलही केले आहे, पण आता एक-दोन दिवसांत ही समस्या दूर होईल, असं त्यांनी आम्हाला सांगितलं आहे. त्यानंतर पत्रकारांना भारताचा व्हिसा मिळायला सुरुवात होईल."
 
हे ध्यानात घ्यायला हवं की सामान्य क्रिकेट चाहत्यांसाठी भारताचे व्हिसा धोरण अद्यापही स्पष्ट केलं गेलेलं नाही आणि या प्रक्रियेला नेमका किती वेळ लागेल हेदेखील सांगितलं गेलेलं नाही.