रविवार, 17 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वर्ल्ड कप 2023
Written By
Last Modified: गुरूवार, 16 नोव्हेंबर 2023 (08:57 IST)

Cricket World Cup: भारताची फायनलमध्ये धडक पण सेमी फायनलमध्येच कच्चे दुवे उघड

ओंकार डंके
भारतानं तब्बल 12 वर्षांनी वन-डे विश्वचषक स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केलाय. मुंबईत बुधवारी (15 नोव्हेंबर) रोजी झालेल्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियानं न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव केला.
 
आयसीसी विजेतेपदांचा 10 वर्षांचा दुष्काळ संपवण्यापासून टीम इंडिया आता फक्त 1 सामना दूर आहे. हा दुष्काळ संपवण्यासाठी भारतीय क्रिकेट संघाला रविवारी ( 19 नोव्हेंबर) होणारी वर्ल्ड कप फायनल जिंकावी लागेल.
 
भारताची या स्पर्धेतील कामगिरी पाहता हा विजय अनपेक्षित नव्हता. या सामन्याचा फक्त स्कोअरबोर्ड पाहिला तर हा मोठा विजय असल्याचं स्पष्ट होतं. पण, हा मोठा विजय सहज मिळालेला नाही.
 
स्वैर गोलंदाजी, जमलेली भागिदारी, सुटलेला झेल, फसलेला रन आऊट आणि या सर्वांमुळे वाढलेलं भारतीय चाहत्यांचं टेन्शन या सर्व प्रवासानंतर भारतानं अखेर फायनलमध्ये प्रवेश मिळवलाय.
 
वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये भारताचे काही कच्चे दुवे उघड झाले आहेत. आता स्पर्धेचा शेवट गोड करण्यासाठी या त्रुटी दूर कराव्या लागणार आहेत.
 
मोठा पण एकतर्फी नाही
भारताचा कर्णधार रोहित शर्मानं सेमी फायनलमध्ये टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विराट कोहली आणि श्रेयस अय्यरच्या दमदार शतकांच्या जोरावर टीम इंडियानं निर्धारित 50 ओव्हर्समध्ये 4 बाद 397 धावा केल्या.
 
टीम इंडियानं या स्पर्धेत एकतर्फी विजयासंह सेमी फायनलमध्ये प्रवेश केला होता. मुंबईतील वानखेडेच्या पिचवर श्रीलंकेवर 302 धावांनी दणदणीत विजय मिळवला होता.
 
दक्षिण आफ्रिकेला 243 धावांनी पराभूत केलं होतं. पण, न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघाला एकतर्फी विजयाची पुनरावृत्ती करता आली नाही.
 
बुमराचा स्वैर मारा
भारतीय गोलंदाजीची सुरूवातच धक्कादायक झाली. जसप्रीत बुमराच्या पहिल्याच बॉलवर डेव्हॉन कॉनवेनं चौकार लगावून न्यूझीलंडचं खात उघडललं.
 
बुमरानं ज्या अचूक टप्प्यावर पहिल्या नऊ सामन्यात गोलंदाजी केली होती. तो टप्पा त्याला सुरुवातीला सापडला नाही. त्यानं पहिल्या 3 ओव्हर्समध्ये तब्बल 22 धावा दिल्या. यामध्ये एका वाईड बॉल चौकाराचाही समावेश होता.
 
पहिल्या 9 सामन्यात फक्त 3.55 च्या इकोनॉमी रेटनं गोलंदाजी करणाऱ्या बुमरानं सेमी फायनलमध्ये 6.40 च्या इकोनॉमी रेटनं धावा दिल्या. पहिल्या 10 ओव्हरमधील ‘पॉवर प्ले’मध्ये विकेट घेण्यात त्याला अपयश आलं.
 
397 धावांचं संरक्षण आणि मोहम्मद शमीचा ड्रीम सामना यामुळे बुमराचं सेमी फायनलमधील अपयश झाकलं गेलंय. पण, फायनलमध्ये त्यानं ही चूक केली तर टीम इंडियाला चांगलीच महागात पडू शकते.
 
जाडेजाचं अपयश
जसप्रीत बुमराप्रमाणेच रविंद्र जाडेजानंही पहिल्या नऊ सामन्यात 4 पेक्षा कमी इकोनॉमी रेटनं गोलंदाजी केली होती. पण, तो देखील बुमरासारखाच महागडा ठरला.
 
मिच सँटनरला पहिल्या इनिंगमध्ये पिचकडून चांगलीच मदत मिळाली होती. त्यामुळे जाडेजाकडून भारतीय संघाला मोठ्या अपेक्षा होत्या. जाडेजाच्या गोलंदाजीनं सेमी फायनलमध्ये अपेक्षाभंग झाला.
 
जाडेजानं 10 ओव्हर्समध्ये 6.30 च्या सरासरीनं 63 धावा दिल्या आणि त्याला एकही विकेट मिळाली नाही. विशेष म्हणजे यापूर्वी धरमशालामध्ये झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातही त्याला विकेट घेण्यात अपयश आलं होतं.
 
जाडेजानं धरमशालापेक्षा 15 धावा जास्त दिल्या. केन विल्यमसन आणि डॅरिल मिचेल या जोडीनं त्याची गोलंदाजी सहज खेळून काढली.
 
या खराब गोलंदाजीचा परिणाम जाडेजाच्या फिल्डिंगवरही झाला. त्यानं गरज नसताना थ्रो करत न्यूझीलंडला 4 धावा बहाल केल्या.
 
बुमरा आणि जाडेजाप्रमाणेच मोहम्मद सिराजही महागडा ठरला. त्यानं 9 ओव्हर्समध्ये 78 धावा देत 1 विकेट घेतली.
 
‘ते’ जीवदान महाग ठरलं असतं
केन विल्यमसन आणि डॅरिल मिचेल या जोडीनं तिसऱ्या विकेटसाठी 181 धावांची भागिदारी केली. सुरुवातीला सावध खेळणाऱ्या या दोघांनी जम बसल्यावर चांगली फटकेबाजी केली.
 
भारतीय स्पिनर्सला त्यांनी अजिबात दाद दिली नाही. त्यामुळे अखेर रोहित शर्माला त्याचा हुकमी एक्का असलेल्या जसप्रीत बुमराच्या हाती बॉल द्यावा लागला.
 
बुमरानं दुसऱ्या स्पेलमध्ये विल्यमसनला जवळपास बाद केलं होतं. पण, त्याचा सोपा झेल मोहम्मद शमीनं सोडला. शमीनं हा झेल सोडला त्यावेळी विल्यमसन 52 धावांवर खेळत होता.
 
शमीनंच पुढे विल्यमसनचा अडसर 69 धावांवर दूर केला. त्यामुळे सुदैवानं त्यानं दिलेलं जीवदान फार महाग पडलं नाही. पण, फायनलमध्ये या पद्धतीनं झेल सोडणं दुर्दैवी ठरु शकतं.
 
गोलंदाजांनी दिल्या 300 धावा
प्रभावी गोलंदाजी हे भारतीय संघाच्या यशाचं मुख्य वैशिष्ट्य ठरलं आहे. या विश्वचषक स्पर्धेतील 9 साखळी सामन्यांमध्ये एकदाही प्रतिस्पर्धी संघाला 300 धावा करता आल्या नव्हत्या.
 
सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडनं 329 पर्यंत मजल मारली. डॅरिल मिचेलनं शतक झळकावत 134 धावा केल्या. विल्यमसननं 69 तर ग्लेन फिलिप्सनं 41 धावांचं योगदान दिलं. त्यांच्या फलंदाजीमुळे 40 ओव्हर्सपर्यंत न्यूझीलंड आणि भारताच्या धावांमध्ये फार फरक नव्हता.
 
भारतीय गोलंदाजांनी शेवटच्या 10 ओव्हर्समध्ये लौकिकाला साजेशी कामगिरी करत न्यूझीलंडला रोखलं.
 
आता वर्ल्ड कप फायनलमध्ये फक्त 10 नाही तर 50 ओव्हर्स किंवा सर्व 10 विकेट्स पडेपर्यंत गोलंदाजीतील कोणतीही शिथिलता भारतीय संघाला परवडणार नाही.