रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वर्ल्ड कप 2023
Written By
Last Modified: शनिवार, 4 नोव्हेंबर 2023 (10:39 IST)

हार्दिक पंड्या : बॅड बॉय, दुखापतींचा वेढा ते वर्ल्डकपमधून बाहेर

टीम इंडियाचा अष्टपैलू हार्दिक पंड्या घोट्याच्या दुखापतीतून सावरलेला नाही, त्यामुळे क्रिकेट विश्वचषक 2023 मधील उर्वरित सामने खेळू शकणार नाही.
 
गेल्या महिन्यात पुण्यात बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी करताना त्याच्या डाव्या घोट्याला दुखापत झाली होती.
 
आयसीसीचे म्हणणं आहे की, शनिवारी (4 नोव्हेंबर) स्पर्धेच्या इव्हेंट टेक्निकल कमिटीकडून मंजुरी मिळाल्यानंतर वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाचा प्लेइंग ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला आहे. म्हणजेच रविवारी (5 नोव्हेंबर) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या सामन्यात प्रसिद्ध कृष्णा निवडीसाठी उपलब्ध असेल.
 
हार्दिकसाठी शिखरापर्यंतचा हा प्रवास खाचखळग्यांनी भरलेला होता. विविध प्रसंगांद्वारे हार्दिकची ही रोलरकोस्टर सफर जाणून घेऊया.
 
जानेवारी 2019 मध्ये कॉफी विथ करणचा एपिसोड रिलीज झाला. पाहुणे होते हार्दिक पंड्या आणि के.एल.राहुल. मनमोकळ्या गप्पांसाठी प्रसिद्ध अशा या कार्यक्रमात हार्दिकने महिलांसंदर्भात काही उद्गार काढले.
 
या उद्गारांनी वादाची राळ उडाली. महिलांचा अपमान करणारं वक्तव्य असल्याच्या विचारातून हार्दिकवर जोरदार टीका झाली. बीसीसीआयने याप्रकाराची दखल घेत हार्दिक आणि राहुलवर बंदीची कारवाई केली.
 
कार्यक्रम प्रसारित झाला त्यावेळी हार्दिक आणि राहुल ऑस्ट्रेलियात खेळत होते. या दोघांनाही तात्काळ मायदेशी परतण्याचा आदेश देण्यात आला. या दोघांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. चौकशी पूर्ण होईपर्यंत हार्दिक संघाबाहेर राहील असा निर्णय बीसीसीआयने घेतला होता. मात्र काही दिवसातच ही बंदी उठवण्यात आली.
 
प्रकरणाची व्यापी वाढल्यानंतर हार्दिकने ट्वीटर अकाऊंटवरून माफी मागितली. महिलांचा अनादर करण्याचा माझा हेतू नव्हता. कार्यक्रमाचं हसतंखेळतं स्वरुप असल्याने माझ्या तोंडून असे उद्गार निघाले. या उद्गारांसाठी मी माफी मागतो असं हार्दिकने म्हटलं होतं. हा एपिसोड दाखवला तर महिला वर्गाची नाराजी ओढवेल या विचारातून स्टार वर्ल्ड आणि हॉटस्टारने हा एपिसोड काढून टाकला.
 
या उद्गारांवरून हार्दिकच्या जीवनशैलीवर टीका झाली. जन्माने भारतीय पण जीवनशैली कॅरेबियन असं अनेकांनी हार्दिकचं वर्णन केलं होतं. टॅटू,केसांना जेल, रंगीबेरंगी कपडे, डान्सची आवड, कानाला हेडफोन लावून इंग्रजी गाणी ऐकणं अशा सगळ्या गोष्टींसाठी हार्दिक टीकेच्या केंद्रस्थानी होता. महिलांसंदर्भात आक्षेपार्ह उद्गारांमुळे हार्दिकच्या घरच्यांनाही ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं
 
वर्तनामुळे क्रिकेटविश्वात अनेकांची कारकीर्द भरकटली होती. हार्दिकही त्याच वाटेवर आहे अशी चर्चा रंगू लागली. हार्दिकने मायदेशी परतल्यानंतर थेट घर गाठलं. दोन दिवस घरात स्वत:ला बंद करून घेतलं. त्याच्या प्रशिक्षकांनी त्याला घरातून बाहेर काढलं आणि सरावासाठी नेलं. तुम्हाला यापुढे माझं नाव वाईट कारणांसाठी कधीच ऐकायला मिळणार नाही असं हार्दिकने प्रशिक्षकांना सांगितलं.
 
संघाला संतुलित करण्यासाठी अष्टपैलू खेळाडू महत्त्वाचे ठरतात. भारतीय संघाला नेहमीच अशा अष्टपैलू खेळाडूची आवश्यकता होती. हार्दिक पंड्याच्या रुपात भारताला खऱ्या अर्थाने अष्टपैलू खेळाडू गवसला होता.
 
हार्दिक फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही करत असल्याने संघाला एक अतिरिक्त फलंदाज किंवा गोलंदाज खेळवता येऊ लागला. याव्यतिरिक्त अफलातून क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून धावा रोखणं, झेल पकडणं यामध्येही हार्दिक योगदान देत असल्याने त्याची उपयुक्तता वाढली होती.
 
भात्यात सर्व प्रकारचे फटके केलेल्या असलेल्या हार्दिकने फिनिशर म्हणून स्वत:ला प्रस्थापित केलं होतं. भागीदारी फोडणारा गोलंदाज म्हणूनही तो ओळखला जाऊ लागला होता.
 
त्याने घेतलेल्या अफलातून कॅचेसची युट्यूबवर पसंती मिळू लागली होती. आयपीएल स्पर्धेतही मुंबई इंडियन्सचा हुकूमी शिलेदार म्हणून त्याची ब्रँड व्हॅल्यू निर्माण झाली होती.
 
कॉफी विथ करणमधले उद्गार या सगळ्या मेहनतीवर पाणी फेरणार असं चित्र होतं. आयपीएल जेतेपदाने हार्दिकच्या कारकीर्दीतील कॉफी विथ करणचा टप्पा मागे पडून खेळाचीच चर्चा होईल अशी आशा आहे.
 
दुखापतींचा वेढा
यात भरीस भर म्हणजे हार्दिकला दुखापतींनी दिलेला वेढा. पाठीच्या दुखापतीने हार्दिकला प्रदीर्घ काळ मैदानापासून दूर ठेवलं. 2018 मध्ये आशिया कप स्पर्धेच्या पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत हार्दिक दुखापतग्रस्त झाला. त्याला स्ट्रेचरवरून मैदानातून बाहेर न्यावं लागलं.
 
पाठीच्या दुखण्यामुळे हार्दिकला गोलंदाजी करता आली नव्हती. गेल्या वर्षी झालेल्या ट्वेन्टी20 विश्वचषकात हाफ फिट हार्दिकला खेळवणं भारतीय संघासाठी नुकसानाचं ठरलं होतं.
 
यंदाच्या आयपीएल हंगामादरम्यान राजस्थानविरुद्धच्या लढतीत हार्दिकने मैदान सोडलं होतं. रशीद खानने हार्दिकच्या अनुपस्थितीत कर्णधारपद सांभाळलं होतं. हार्दिकची दुखापत गंभीर नाही, क्रॅम्प्स आहेत असं रशीद खानने सांगितलं होतं.
 
अन्य एका लढतीत दुखापतीमुळे हार्दिक खेळूच शकला नाही. रशीद खानने टायटन्सचं नेतृत्व केलं होतं.
 
एंगेजमेंट आणि कन्यारत्न
 
2020 मध्ये हार्दिकच्या आयुष्यात चांगलं पर्व आलं. हार्दिक आणि सर्बियन नर्तिका नताशा स्टॅनकोव्हिक यांची एन्गेजमेंट झाली. 30 जुलै रोजी त्यांना कन्यारत्न झालं. हार्दिक-नताशा जोडीने तिचं नाव अगस्त्या ठेवलं.
 
वडिलांचं छत्र हरपलं
गेल्या वर्षी हार्दिकला वैयक्तिक आयुष्यात मोठा धक्का बसला. 16 जानेवारीला हार्दिक आणि त्याचा भाऊ कृणालचं पितृछत्र हरपलं. या भावांच्या कारकीर्दीत त्यांच्या वडिलांचं मोलाचं योगदान होतं.
 
हार्दिक-कृणालचं करिअर व्हावं यासाठी वडिलांनी असंख्य खस्ता खाल्ल्या होत्या. त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टर त्यांचा जीव वाचवू शकले नाहीत.
 
ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका खेळून हार्दिक घरी परतलेला असल्यामुळे तो वडिलांच्या बरोबर होता. भाऊ कृणाल हा सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी20 स्पर्धेत खेळत होता. वडिलांच्या निधनाची बातमी कळताच कृणालने बडोदा संघाचं बबल सोडण्याचा निर्णय घेतला.
 
मुंबई इंडियन्सनं केलं नाही रिटेन
यंदाच्या आयपीएल हंगामापूर्वी लिलाव झाला. लिलावापूर्वी प्रत्येक संघाला चार खेळाडू रिटेन करण्याची संधी मिळाली. संघाचा अविभाज्य भाग असणाऱ्या खेळाडूंना संघात कायम राखलं जातं. मुंबई इंडियन्स संघाने रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, कायरेन पोलार्ड आणि जसप्रीत बुमराह यांना रिटेन केलं. हार्दिकला रिटेन केलं जाईल अशी शक्यता होती. पण मुंबईने पोलार्डच्या अनुभवाला प्राधान्य देत हार्दिकला रिलीज केलं.
 
दुखापतीमुळे हार्दिकच्या गोलंदाजीवर मर्यादा आल्याने मुंबईची गोलंदाजी कमकुवत झाली. हार्दिक सुरुवातीपासूनच मुंबई इंडियसन्चा भाग होता. फलंदाजी-गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही आघाड्यांवर योगदान असल्याने हार्दिक मुंबईकडेच असेल असं वर्तवलं गेलं पण तसं झालं नाही.
 
गुजरातचा संघ-गुजराती माणूस कर्णधार
 
मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला रिलीज करणं गुजरात टायटन्स संघाच्या पथ्यावर पडलं. टायटन्स संघाला गुजराती खेळाडू चेहरा म्हणून हवा होता. त्याचवेळी दर्जेदार खेळासाठी त्याचं नाव घेतलं जाणं आवश्यक होतं. हार्दिक या दोन्ही आघाड्यांवर फिट बसत होता. गुजरात टायटन्स संघाने 15 कोटी रुपये मानधनासह हार्दिकला कर्णधार नेमत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
 
हार्दिकने आयपीएल तसंच डोमेस्टिक स्पर्धेत कर्णधारपद भूषवलं नव्हतं. दोन महिन्यांहून अधिक काळ चालणाऱ्या स्पर्धेत हार्दिक स्वत:चा फिटेनस राखून संघाचं नेतृत्व करू शकेल का, असा प्रश्न विचारला जात होता. राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय, युवा आणि सीनिअर अशा विविधांगी खेळाडूंची मोट बांधणं हार्दिकला जमेल का? हाही प्रश्न होता.
 
कर्णधारपदामुळे हार्दिकच्या खेळावर परिणाम होईल का? असाही एक सूर होता. पण गुजरात संघव्यवस्थापनाने हार्दिकच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला. हार्दिकने जेतेपदासह या विश्वासाला न्याय दिला आहे.
 
यशस्वी नेतृत्व
हार्दिकने गुजरात टायटन्स संघाचं यशस्वी नेतृत्व करताना फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही आघाड्यांवर दमदार कामगिरी केली. दुखापतीमुळे हार्दिक खेळू शकेल का, गोलंदाजी करू शकेल असे प्रश्न फेर धरून होते.
 
हार्दिकने 15 सामन्यात 131.26च्या सरासरीने 487 धावा केल्या तसंच 8 विकेट्सही घेतल्या. प्रचंड दडपण असणाऱ्या अंतिम लढतीत हार्दिकने 3 विकेट्स आणि 34 धावांची खेळी करत विजयात निर्णायक भूमिका बजावली. हार्दिकला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. आयपीएलच्या पहिल्याच हंगामात संघाला जेतेपद मिळवून देणारा तो पहिलाच कर्णधार ठरला.
 
हार्दिकच्या या यशस्वी मोहिमेमुळे वनडे आणि ट्वेन्टी20 कर्णधारपदासाठी निवडसमितीला एक सक्षम पर्याय मिळाला आहे.
 
'माझं नाव खपतं'
 
कर्णधार म्हणून पहिल्याच हंगामात हार्दिकने संघाविषयी, कर्णधार म्हणून भूमिकेविषयी वेळोवेळी सविस्तरपणे सांगितलं.
 
"हार्दिक पंड्या हे नाव खपतं. मला त्याच्याशी काही प्रॉब्लेम नाही. हसऱ्या चेहऱ्याने मी त्याला सामोरा जातो," असं सांगत हार्दिकने प्रसिद्धीझोतात राहण्यामागचं कारण स्पष्ट केलं होतं.
 
कर्णधार म्हणून नियुक्ती झाल्यानंतरच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत हार्दिकला गोलंदाजी करणार का याविषयी विचारण्यात आलं. ते सरप्राईज असेल असं हार्दिकने सांगितलं.
 
"यश त्यांचं असेल, अपयश माझं असेल असं हार्दिकने सहकाऱ्यांना सांगितलं होतं. प्रत्येक खेळाडूला जे काम दिलं आहे, जी जबाबदारी मिळाली आहे ती पार पाडताना त्यांच्याकडे स्वातंत्र असावं. नक्की काय करायचं आहे याबाबत स्पष्टता असावी आणि दृष्टिकोनात सच्चेपण असावं.
 
सगळं चांगलं सुरू असताना त्यांना आमची गरज नाही. पण हंगामात गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडणार नाहीत. जेव्हा खाचखळग्यांना सामोरं जावं लागेल तेव्हा आम्ही असू. खेळाडूंना घरच्यासारखं वाटलं पाहिजे यावर आम्ही भर दिला. त्यांच्या मनात स्थैर्याची भावना निर्माण व्हायला हवी. नव्या प्रकारची संस्कृती विकसित करायची होती", असं हार्दिकने सांगितलं.
 
जेतेपदानंतर बोलताना हार्दिक म्हणाला, मी काय मेहनत केली आहे हे मला दाखवायचं होतं. अंतिम लढतीसाठी मी सर्वोत्तम कामगिरी राखून ठेवली होती. संघासाठी जे आवश्यक असेल ते मी करेन. तुम्ही संघ म्हणून खेळलात तर काय कमाल होऊ शकते हे गुजरात टायटन्सने दाखवून दिलं.
 
दडपणातही हजरजबाबीपणा
अंतिम लढतीत दोन्ही संघांवर, विशेषत: कर्णधारावर प्रचंड दडपण असते. हार्दिकने दडपणाच्या क्षणीही हजरजबाबीपणा जपला. भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यंदाच्या हंगामात प्रक्षेपणकर्त्या कंपनीच्या एक्सपर्ट पॅनेलमध्ये होते. ते समालोचन चमूचा भाग नव्हते. अंतिम लढतीत नाणेफेकेवेळी तसंच समालोचनासाठी रवी शास्त्री उपस्थित होते. तुम्हाला परतलेलं बघून आनंद झाला असं हार्दिकने न विसरता सांगितलं.
 
टॉस हरल्यानंतर बोलताना हार्दिकने गुजरातीत प्रेक्षकांना पाठिंबा देण्याचं आवाहन केलं. भलेही टॉस हरलो असेल पण तुमचं प्रेम-पाठिंबा गुजरात टायटन्स संघाला मिळेल असं हार्दिक गुजरातीत बोलला. याला चाहत्यांनी जोरदार आवाजी पाठिंबा दिला.