अहमदाबादमध्ये सुरु असलेल्या वर्ल्डकप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजीसमोर फलंदाजांनी अक्षरशः नांगी टाकली.ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि बॉलर्सनी तो निर्णय सार्थ ठरवत संपूर्ण स्पर्धेत धावांचे डोंगर उभारलेल्या भारतीय फलंदाजांना 250 धावाही करू दिल्या नाहीत.
भारतीय संघाने ऑस्ट्रेलियासमोर जिंकण्यासाठी 241 धावांचा आव्हान ठेवलं आहे.
पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जॉश हेझलवूड आणि झाम्पाच्या अप्रतिम गोलंदाजीसमोर एकही भारतीय फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही.
मिचेल स्टार्कच्या बॉलिंगवर के. एल. राहुलही आउट झाला. डावाच्या शेवटच्या टप्प्यात बॉल रिव्हर्स होत असताना मिचेल स्टार्कने ऑफस्टम्पच्या बाहेर टाकलेल्या बॉल खेळत असताना राहुलने जॉश इंग्लिशच्या हातात झेल दिला.
आउट होण्यापूर्वी राहुलनं 107 बॉलमध्ये 66 धावांची संयमी खेळी केली. राहुलने त्याच्या खेळीत फक्त एक चौकार मारला.
भारताने 40 ओव्हर्समध्ये 197 धावा केल्या. रवींद्र जडेजा आउट झाल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि के. एल. राहुलने भारताचा डाव सावरला. भारताचा निम्मा संघ 178 धावांवर बाद झाला.
रोहित बाद झाल्यानंतरच्या 29 ओव्हर्समध्ये भारतीय फलंदाजांना फक्त 2 चौकार लगावता आले.
35.5 - जॉश हेझलवूडच्या गोलंदाजीवर रवींद्र जडेजाने जॉश इंग्लिशच्या हातात झेल दिला. विराट कोहली आउट झाल्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या रवींद्र जडेजाला फक्त 9 धावाच करता आल्या.
34.5 - केएल राहुलनं 86 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर 4 बॉलच्या अंतरानं बाद झाल्यानंतर राहुल मैदानात उतरला होता.
त्यानं विराट कोहलीसोबत चौथ्या विकेटसाठी 67 धावांची भागिदारी केली. या अर्धशतकी खेळीत त्यानं फक्त 1 चौकार लगावला आहे.
फायनलमध्ये विराट कोहली अर्धशतक करून आउट
28.3 - पॅट कमिन्सनं भारताला मोठा धक्का दिलाय. विराट कोहली 54 रन्सवर असताना आउट झाला. त्यानं एक अप्रतिम बॉलवर विराट कोहलीला बोल्ड केलं.
भारतानं 148 धावांवर चौथी विकेट गमावली. त्यापूर्वी पहिल्या 3 विकेट्स झटपट गेल्यानंतर विराट कोहली आणि के.एल. राहुल या दोघांनी भारताचा डाव सावरला.
या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नईत झालेल्या सामन्यात विराट आणि राहुलनेच भारताला संकटातून बाहेर काढलं होतं. आता फायनलमध्येही त्यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.
फटकेबाजीच्या नादात रोहित, अय्यर स्वस्तात परतले
10.2 - ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सनं श्रेयस अय्यरला 4 धावांवर बाद करत ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का दिलाय. भारताची 11 व्या ओव्हरमध्ये 3 बाद 81 अशी अवस्था झाली आहे.
9.4 -रोहितने संपूर्ण स्पर्धेतला त्याचा आक्रमक अंदाज कायम ठेवत ग्लेन मॅक्सवेलला षटकार आणि चौकार खेचून त्याच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला पण चौथ्या बॉलवर ट्रेव्हिस हेडने मागे पळत जाऊन आक्रमक कॅच घेत रोहित शर्माला तंबूचा रस्ता दाखवला.
आउट होण्यापूर्वी रोहित शर्मानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार लगावण्याचा विक्रम केला. यापूर्वी हा विक्रम वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेलच्या नावावर होता.
गेलनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध 85 षटकार लगावले होते. रोहितनं वर्ल्ड कप फायनलमध्ये गेलला मागं टाकलंय.
शुबमन गिल स्वस्तात आउट
4.1 - पाचव्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर मिचेल स्टार्कचा बॉल फटकावण्याच्या नादात शुबमन गिल आउट झाला. शुबमन गिल आउट झाल्यानंतर विराट कोहली फलंदाजीला उतरला.
त्याआधी साखळी सामन्यांमध्ये आक्रमक सुरुवात करून देण्याचा ट्रेंड बदलत भारतीय सलामीवीरांनी फायनलमध्ये सावध सुरुवात केली.
ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी दीड लाख प्रेक्षकांना शांत केलं
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने फायनलच्या आधी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये एक विधान केलं होतं.
फायनल बघायला आलेल्या सुमारे दीड लाख प्रेक्षकांना शांत करण्यात जो आनंद आहे तो कशातच नसल्याचं तो म्हणाला होता.
ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराने केलेल्या या विधानाला खरं ठरवत बॉलर्सनी भारताच्या आघाडीच्या फलंदाजांना चांगलंच जखडून ठेवलं. स्वतः पॅट कमिन्सने पाच ओव्हरमध्ये 14 धावा देत श्रेयस अय्यरला आउट केलं.
ऑस्ट्रेलियाच्या इतरही बॉलर्सनी कंजूस बॉलिंग केली. रोहित आणि विराटने भारताचा डाव तर सावरला पण तब्बल सोळा ओव्हरपर्यंत त्यांना एकही चौकार लगावता आला नाही.
ग्लेन मॅक्सवेल, मिच मार्श आणि ट्रेव्हिस हेड या तिघांनी मिळून पाचव्या बॉलर्सचा कोटा पूर्ण केला. त्यांनी 10 ओव्हर्समध्ये 41 धावा देत 1 विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाच्या पार्ट टाईम गोलंदाजांना टार्गेट करण्यात भारताला अपयश आलं
तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सनं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला.
वर्ल्डकप फायनलमध्ये घुसला पॅलेस्टाईनचा समर्थक
भारताचा डाव सुरु असताना 'फ्री पॅलेस्टाईन' असा मजकूर लिहिलेला टी-शर्ट घालून एक व्यक्ती मैदानात घुसला.
वर्ल्ड कप फायनलला केलेल्या सुरक्षाव्यवस्थेची चर्चा माध्यमांमध्ये केली जात असताना अशा पद्धतीने एक व्यक्ती मैदानात घुसल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
पॅलेस्टाईनचा झेंडा हातात घेतलेल्या या व्यक्तीने मैदानावर येऊन विराट कोहलीला आलिंगन देण्याचा प्रयत्न केला. मैदानावर उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी तात्काळ त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं.
विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील दोन्ही संघ असे आहेत :
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रविंद्र जाडेजा, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज
ऑस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर, ट्रेव्हिस हेड, मिच मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, जॉश इंग्लिस (यष्टीरक्षक), मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (कर्णधार), अॅडम झम्पा, जॉश हेझलवूड
गेल्या 12 वर्षांपासून भारतीय क्रिकेट चाहते ज्या क्षणाची वाट पाहतायत तो आता काही तासांवर आलाय. या निर्णायक क्षणानं मागच्या दहा वर्षात हुलकावणी दिलीय. अखेर ही प्रतीक्षा संपणार का?
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 1 लाख 32 हजार प्रेक्षकांच्या गजरात रोहित शर्मा विश्वविजेतेपदाची ट्रॉफी उंचावणार का? हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
Published By- Priya Dixit