जान्हवी मुळे
एक टाईम आऊट, तीन पराभव आणि बोर्डाची बरखास्ती. श्रीलंका क्रिकेटवर सध्या मोठी आपत्ती कोसळल्यासारखं चित्र आहे.
लंकन टीमला आधी अफगाणिस्ताननं हरवलं. मग भारताकडून त्यांना मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला. भारताविरोधात सलग दोन सामन्यांत श्रीलंकेची टीम साठ धावांची वेसही ओलांडू शकली नाही.
त्यानंतर बांगलादेशविरुद्ध लढतीत अँजलो मॅथ्यूजला टाइम आउट देण्याचा प्रकार घडला. तो सामनाही श्रीलंकेनं गमावला आणि त्यांच्या चाहत्यांच्या जखमेवर मीठ चोळलं गेलं.
हे सगळं कमी होतं की म्हणून की काय, पण यादरम्यान श्रीलंकन क्रिकेट बोर्डच बरखास्त करण्याचा निर्णय त्यांच्या क्रीडामंत्र्यांनी घेतला. दुसऱ्याच दिवशी कोर्टानं ती बरखास्ती थांबवली आहे.
बांगलादेशविरुद्धचा वादग्रस्त ठरलेला सामना सुरू होण्याआधीच श्रीलंकन क्रिकेटमधल्या या समस्या पुन्हा जगासमोर आल्या होत्या.
श्रीलंका क्रिकेट बोर्ड संकटात
मुंबईत वानखेडे स्टेडियमवर 2 नोव्हेंबरला झालेल्या सामन्यात श्रीलंकेला 302 रन्सनी दारूण पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर श्रीलंकन टीमवर मायदेशात टीकेची झोड उठली.
बीबीसी सिंहलाच्या वृत्तानुसार चाहत्यांनी बोर्डाच्या मुख्यालयाबाहेर निदर्शनं, धरणं आंदोलनही केलं आणि पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
त्या पार्श्वभूमीवर क्रीडामंत्र्यांनीही संपूर्ण क्रिकेट बोर्डानं राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती.
शनिवारी 4 नोव्हेंबरला श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे सचिव मोहन डी सिल्वा यांनी राजीनामा दिला.
दुसऱ्याच दिवशी म्हणजे 6 नोव्हेंबरला श्रीलंकेचे क्रीडामंत्री रोशन रणसिंघे यांनी संपूर्ण श्रीलंका क्रिकेट नियामक मंडळच बरखास्त केल्याचं जाहीर केलं.
श्रीलंकन सरकारनं क्रिकेटमधल्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी एक कॅबिनेट कमिटीही नेमली आहे.
तसंच श्रीलंकन क्रिकेटचा कारभार पाहण्यासाठी एका सात सदस्यीय अंतरीम क्रिकेट समितीची स्थापना करण्यात आली.
तिचं अ्ध्यक्षपद श्रीलंकेचे माजी क्रिकेटर आणि 1996 च्या विश्वचषक विजेत्या संघाचे कर्णधार अर्जुन रणतुंगा यांना देण्यात आलं. समितीत श्रीलंकन सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आणि बोर्डाच्या एका माजी अध्यक्षांचाही समावेश केला.
रणतुंगा यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली की, त्यांची समिती अशी टीम उभारेल जी देशासाठी खेळेल.
ते म्हणाले होते, “आशा आहे की आम्ही असा संघ उभारू जो शिस्त पाळेल आणि देशावर प्रेम करेल. अशी टीम जे एक कुटुंब असेल आणि देशातल्या 2.2 कोटी लोकांवर प्रेम करेल.”
पण आता न्यायालयानं क्रीडामंत्र्यांच्या या निर्णयाला स्थगिती दिली आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शमी सिल्वा यांच्या अपीलवर सुनावणी करताना कोर्टानं हा निर्णय दिला.
या प्रकरणी पुढील सुनावणी दोन आठवड्यांनी होणार असून तोवर बोर्ड बरखास्त होत नसल्याचं कोर्टानं स्पष्ट केलं आहे.
क्रिकेट बोर्ड आणि क्रीडामंत्र्यांमधला वाद
पण श्रीलंकन क्रिकेट बोर्ड म्हणजे एसएलसी आणि क्रीडामंत्री रणसिंघे यांच्यात वाद होण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या काही महिन्यांत दोघांमधला वाद विकोपाला गेला.
एसएलसीमध्ये भ्रष्टाचार आणि खेळाडूंच्या शिस्तभंगाच्या तक्रारी तसंच मॅच फिक्सिंगचे आरोप समोर आले असल्याचा दावा रणसिंघे यांनी केला होतता.
खरतर एसएलसी ही श्रीलंकेतली सर्वात श्रीमंत क्रीडासंस्था आहे. पण अख्ख्या श्रीलंकेतच आर्थिक संकट ओढवलं आहे, ज्यातून देश अजून बाहेर पडलेला नाही. अशातच श्रीलंका क्रिकेट बोर्डालाही आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागतंय आणि क्रीडामंत्र्यांशी त्यांचा वाद सुरू आहे.
गेल्या आठवड्यात रणसिंघे यांनी श्रीलंकन बोर्डातील सर्व पदाधिकाऱ्यांकडे पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नसल्याची टीका करत संपूर्ण बोर्डाकडेच राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी बोर्ड बरखास्त करण्याचा निर्णय घेतला.
शनिवारी रणसिंगे यांनी आयसीसीला पत्र लिहून आपली बाजू समजून घेण्याची आणि आपल्याला पाठिंबा देण्याची विनंती केली.
आयसीसीच्या नियमांनुसार कुठल्याही देशातील क्रिकेट बोर्डात सरकारचा राजकीय हस्तक्षेप खपवून घेतला जात नाही. असा हस्तक्षेप झाल्यास त्या देशाच्या टीमवर निर्बंध घातले जातात.
गेल्या महिन्यात श्रीलंका बोर्डातील कथित भ्रष्टाचाराचा तपास करण्यासाठी रणसिंघे यांनी एक तीन-सददस्यीय समिती स्थापन केली होती. पण हा राजकीय हस्तक्षेप मानला गेल्यानं क्रीडामंत्र्यांना ती समिती मागे घ्यावी लागली होती.
आताही हे प्रकरण कोर्टात गेलं आहे.
भारताविषयी भीती?
दिग्गज क्रिकेट कॉमेंटेटर रोशन अभयसिंघे यांनी बीबीसी सिंहलाशी बोलताना म्हटलं आहे की, भारताविरुद्ध 55 धावांत अख्खा संघ गारद होणं ही लाजिरवाणी गोष्ट आहे आणि लोकांची त्यावरची प्रतिक्रिया स्वाभाविक आहे.
पण या वर्षात तिसऱ्यांदा आणि अवघ्या काही महिन्यांत दुसऱ्यांदा श्रीलंकेची अशी दुर्दशा झाली, तीही भारताविरोधात.
श्रीलंकेची टीम भारताविरोधात जानेवारीत तिरुवनंतपुरममध्ये 73 रन्सवर, सप्टेंबरमध्ये कोलंबोत 50 रन्सवर तर नोव्हेंबरमध्ये मुंबईत 55 रन्सवर गुंडाळली गेली.
त्यामुळे श्रीलंकन क्रिकेट टीमच्या फलंदाजीतच काही त्रुटी आहे, की भारताविरुद्ध खेळताना त्यांना समस्या जाणवते आहे, याचा अभ्यास व्हायला हवा असं अभयसिंघे सांगतात.
भारत वगळता इतर सामन्यांत लंकन फलंदाजांची कामगिरी समाधानकारक झाली, याकडे ते लक्ष वेधतात.
"भारताविरुद्ध 55 धावांत गारद झालेल्या या टीमनं इंग्लंडला हरवलं होतं. दक्षिण आफ्रिकेविरोधात हरले पण 320 धावा करून. पाकिस्तानविरोधातही त्यांनी 340 रन्स केल्या. भारताविरोधात खेळताना कुठली भीती वाटत असेल तर त्याकडे लक्ष द्यायला हवं. त्यासाठी समुपदेशकांची मदत घेता येईल."
श्रीलंकन टीमनं काय करायला हवं?
श्रीलंकेला गेला काही काळ खेळाडूंच्या दुखापतींनीही सतावलं आहे. त्यांच्या फिटनेसवर भर देण्याची गरज असल्याचं जाणकार सांगतात.
केवळ कोचेसना किंवा बोर्डाला सगळा दोष देऊन प्रश्न मिटत नाहीत. अभयसिंघे सांगतात, "एखादं बटण दाबलं की सगळे बदलेल इतक हे सोपं नाही. यातून बाहेर पडायचं तर शून्यातून सुरुवात करायला हवी."
"भारतानं 55 रन्समध्ये ऑल आऊट केलं म्हणजे श्रीलंकेचं क्रिकेट संपलं, असं नाही. आपण मॅचेस जिंकलो आहोत. एशिया कप ट्वेन्टी20 मध्ये आपण चॅम्पियन आहोत आणि वन डेत एशिया कपचे उपविजेते आहोत. काय चुकलं, कुठे चुकलं हे टीमनं आणि बोर्डानं शोधून काढायला हवं."
"आपल्या सरावात त्रुटी आहेत, खेळाडूंकडून चुका होत आहेत की हाय परफॉर्मन्स सेंटरचं चुकलंय, हे शोधायला हवं. बाहेरून जे दिसतंय, त्यावर आम्ही बोलतो आहोत. पण पुढची वाटचाल कशी असेल, हे नीट आखायला हवं."
आगामी ट्वेन्टी20 विश्वचषक आणि 2027 च्या वन डे विश्वचषकावर लक्ष ठेवून आतापासूनच तयारीची गरज आहे असं त्यांना वाटतं.
त्यासाठी श्रीलंकेला स्वतःच्याच इतिहासात डोकावून पाहावं लागेल.
1996 साली विश्वचषक जिंकल्यावर 1999 च्या विश्वचषकात श्रीलंकेला दारूण पराभव स्वीकारावा लागला होता. पण त्यातून त्यांचं क्रिकेट सावरलं, फुललं, बहरलं.
आताही ते पुन्हा राखेतून उठून उभे राहणं गरजेचं आहे. त्यांच्या देशासाठी आणि क्रिकेटसाठीही.