1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वर्ल्ड कप 2023
Written By
Last Modified: शनिवार, 7 ऑक्टोबर 2023 (21:01 IST)

वर्ल्ड कप SA vs SL: एडन मार्करमचा श्रीलंकेविरुद्ध पराक्रम, दक्षिण आफ्रिकेनं केला विश्वचषकात कुणालाही न जमलेला विक्रम

Aiden Markram
क्रिकेट विश्वचषकाचं आपल्याला प्रबळ दावेदार का म्हटलं जातंय, हे दक्षिण आफ्रिकेनं त्यांच्या पहिल्याच सामन्यात दाखवून दिलंय. दिल्लीमध्ये त्यांचा श्रीलंकेविरुद्ध सामना होतोय.
 
या सामन्यात पहिल्यांदा बॅटींग करण्यासाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेनं 5 बाद 428 धावांचा डोंगर उभा केला. क्रिकेट विश्वकप स्पर्धेच्या इतिहासातील एखाद्या टीमनं उभारलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे.
 
दक्षिण आफ्रिकेकडून तीन फलंदाजांनी शतक झळकावली. त्यामध्ये एडन मार्करमचं शतक हे सर्वात वादळी ठरलं. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या मार्करमनं फक्त 49 चेंडूत शतक झळकावत विश्वचषकातील सर्वात जलद शतकाचा विक्रम केला.
 
मार्करमनं आयर्लंडचा अष्टपैलू केव्हिन ओ ब्रायनचा 12 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला.
 
ओ ब्रायननं 2011 साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत इंग्लंड विरुद्ध 50 चेंडूत शतक झळकावलं होतं.
 
मार्करमनं 14 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीनं शतक झळकावत ओ ब्रायनला मागं टाकलं.
 
मार्करमच्या वादळी खेळीपूर्वी क्विंटन डी कॉक आणि रासी व्हेन डेर डुसे यांनीही शतक झळकाले.
 
पहिली विकेट झटपट पडल्यानंतर या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 204 धावांची भागिदारी केली. क्विंटननं 100 तर व्हेन डेर डुसे यानं 108 धावा केल्या.
हे दोघं बाद झाल्यानंतरही दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी फटकेबाजी सुरूच ठेवली.
 
विशेषत: मार्करम सुसाट खेळला. हेन्री क्लासेननं 20 बॉलमध्ये 32 तर डेव्हिड मिलरनं 21 बॉलमध्ये 39 धावा करत दक्षिण आफ्रिकेला विश्वचषक इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या गाठून दिली.
 
दक्षिण आफ्रिकेनं उभारलेली 5 बाद 428 ही वन-डे विश्वचषकातील सर्वोच्च धावसंख्या आहे.
 
आफ्रिकेनं यावेळी ऑस्ट्रेलियाचा आठ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. ऑस्ट्रेलियानं 2015 साली झालेल्या विश्वचषकात अफगाणिस्तानविरुद्ध 6 बाद 417 धावा केल्या होत्या.
 
या सामन्यात झाले हे विक्रम
दक्षिण आफ्रिकेनं वन-डे विश्वचषकातील सर्वोच्च धावसंख्या उभारली.
 
एडन मार्करमनं वन-डे विश्वचषकातील सर्वात जलद शतक झळकावले.
 
वन-डे विश्वचषकातील एकाच डावात तीन फलंदाजांनी शतक झळकावण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. दक्षिण आफ्रिकेकडून क्विंटन डी कॉक, रासी व्हेन डेर डुसे आणि एडन मार्करम यांनी शतक झळकावलं.
 
त्यापूर्वी श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाका यानं टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. शनाकाच्या निर्णयाचा फायदा घेणं श्रीलंकेच्या गोलंदाजांना जमलं नाही.
 
श्रीलंकेला त्यांचा प्रमुख फिरकी गोलंदाज महीश तीक्षाणाची कमतरता जाणवली. खराब फिटनेसमुळे तीक्षाणा हा सामना खेळू शकला नाही. कर्णधार दासून शनाकानं आफ्रिकेला अडवण्यासाठी 6 गोलंदाज वापरले. त्यापैकी एकही प्रभाव टाकू शकला नाही. आयपीएल स्पर्धा गाजवलेला वेगवान गोलंदाज पथरिना सर्वात महागडा ठरला. त्यानं 10 ओव्हर्समध्ये 95 रन दिले.
 
दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज चांगलेच फॉर्मात आहेत. फलंदाजांच्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या बळावरच त्यांनी ऑस्ट्रेलिया विरुद्धची पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका 3-2 या फरकानं जिंकली होती.
 
या सामन्यासाठी दोन्ही संघ असे आहेत
 
दक्षिण आफ्रिका : तेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), व्हेन डर डुसे, एडन मार्करम, हेन्रिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को यान्सन, गेराल्ड कोएट्झे, कागिसो रबाडा, केशव महाराज, लुंगी एन्गिडी
 
श्रीलंका : पथुम निसांका, कुशल परेरा, कुशल मेंडिस (यष्टीरक्षक), सदीरा समरविक्रम, चरिथ असलंका, धनंजय डिसिल्वा, दासून शनाका (कर्णधार), कासून राजिता, दिलशान मदुशंका, मथीशा पथरीना
 


























Published By- Priya Dixit