शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. ओळख क्रिकेटपटूंची
Written By राकेश रासकर|

सुनील गावसकर

नाव : सुनील मनोहर गावसकर
जन्म : १० जुलै १९४९
ठिकाण : मुंबई
देश : भारत
कसोटी पदार्पण : भारत वि. वेस्ट इंडिज, पोर्ट ऑफ स्पेन, १९७१
वन डे पदार्पण : भारत वि. इंग्लड, लीडस १९७४
शैली : उजव्या हाताचा फलंदाज व मध्यमगती गोलंदाज

सुनील मनोहर गावसकर. क्रिकेटच्या इतिहासात कधीही न पुसले जाणारे नाव. विक्रमादित्य हे बिरूद त्यांना सार्थ ठरू शकेल. १९७१ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारया गावसकरांनी कसोटीत १० हजारापेक्षा जास्त धावा काढल्या आहेत. हा टप्पा ओलांडणारे ते पहिले खेळाडू.

वेस्ट इंडिजमधील पदार्पणाच्या कसोटी मालिकेत त्यांनी ७७४ धावा काढून मालिका जिंकून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता. त्यानंतर त्याची बॅट ‍निवृत्तीपर्यंत तळपत राहिली. १९८३ मध्ये त्यांनी डोनाल्ड ब्रॅडमन यांचा सर्वाधिक कसोटी शतकांचा (२९ शतके) हा विक्रम मोडला.
गावसकर यांनी कारकिर्दीत ३५ कसोटी शतके ठोकली. त्यांचा हा विक्रम २००५ पर्यंत अबाधित होता. नंतर मास्टर ब्लास्टर सचिन ‍तेंडूलकरने तो मोडला. सलग तीन डावात शतक काढण्याचा विक्रमही त्यांच्याच नावावर आहे. (२००६ मध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉंटिंगने या विक्रमाशी बरोबरी केली.)

गावसकर ७० ते ८० या दशकात बराच काळ भारतीय संघाचे कर्णधारही होते. भारताला १९८३ सालचा विश्वकरंडक जिंकून देण्यात त्यांनी मोलाचा वाटा उचलला होता. फलंदाजीबरोबर गावसकर उत्तम क्षेत्ररक्षकही होते. यष्टीरक्षक सोडून कसोटीत १०० हून जास्त झेल घेण्याचा पहिला भारतीय होण्याचा मान त्यांनी मिळवला होता

गावसकर आक्रमक फलंदाज नसले तरी त्याचे फटके मारण्याचे तंत्र विशेष होते. लेट फ्लिकचे ते बादशहा होते. खर्‍या अर्थाने ते कसोटी क्रिकेटचे खेळाडू होते. त्यामुळे एकदिवसीय सामन्यात त्यांना पहिले शतक काढण्यासाठी १९८७ साल उजाडावे लागले.

कसोटीतील त्याच्या अव्दितीय कामगिरीमुळे १९८० मध्ये त्यांना व्हिस्डेन या क्रिकेटमधील प्रसिद्ध मासिकातर्फे सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून गौरविण्यात आले. त्यांच्या क्रिकेटमधील कामगिरीबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मभूषण देऊन गौरव केला आहे.

निवृत्तीनंतर त्यांनी सनी डेज, रन्स अन रूइन्स व वन डे वंडर ही तीन पुस्तकेही लिहिली आहेत. सध्या ते एक प्रसिध्द समालोचक व स्तंभलेखक आहेत.

कसोटी
सामने - १२५
धावा - १०१२२
सरासरी - ५१.१२
सर्वोत्तम - २३६
१००/५० - ३४/४५
झेल - १०८

वन डे
सामने - १०८
धावा - ३०९२
सरासरी - ३५.१३
सर्वोत्तम - १०३
१००/५० - १/२७
झेल - २२