शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By वेबदुनिया|

रंग दिवाळीचे..

तरुणाई आणि दिवाळी हे दोन्ही शब्द एकमेकांसाठी पूरक आहेत. दिवाळीमध्ये तरुणाई नसेल तर त्याचा आनंद मिळवणं
जरा कठीणच. सर्व सणांमध्ये या बदललेल्या सणांच्या स्वरूपामध्येही आनंदाने सहभागी होणार्‍या या तरुणाईवर नेहमीच टीका होते. ‘ही मुलं आपल्या परंपरा जपत नाहीत’ किंवा ‘आमच्यावेळी असं नव्हतं हं’ अशी वाक्यं ऐकायला मिळतात. पण खरंच या सणांमध्ये एवढा बदल झालाय? आणि जर तसं असेल तर ते आपल्या प्रगत होत जाणार्‍या संस्कृतीसाठी योग्य की अयोग्य?

पूर्वीच्या काळी दिवाळीची मजा खरंच न्यारी होती. अख्खा वाडा म्हणजे एक कुटुंब असं समजून साजरी होणारी दिवाळीही वेगळी.. फराळाचा खमंग वास.. किल्ल्यासाठी माती, दगड गोळा करणे, त्यावरून भांडणं होणे, किल्ल्यावर शेवटचा हात फिरवण्यासाठी चाललेली मुलांची धावपळ, मुलींची रांगोळीची तयारी आणि फटाके खरेदी..हे सगळं आज घडणं शक्य आहे.
आजच्या फ्लॅट संस्कृतीमध्ये या सगळ्या गोष्टी घडणं शक्य नाही आणि त्यामुळे कदाचित आजच्या पिढीत सणांच्या संकल्पना थोडय़ा फार बदलत चालल्या आहेत. दिवाळीची पहाट, दिव्यांच्या प्रकाशात उजळलेल्या बागा आणि फराळ या गोष्टींनी स्वत:ची जागा दिवाळी या सणात निर्माण केली आहे. पूर्वी होणार्‍या सणांच्या तुलनेत आता अनेक बदल झाले आहेत हे नक्की. आताच्या पिढीच्या मानसिकतेतही बदल झाले आहेत. परंपरेची जागा थोडय़ा फार प्रमाणात एन्जॉयमेंटनी घेतली आहे. अनिर्बध फटाके उडवण्यासारख्या गोष्टीही हमखास दिसतात. किती हजारांचे फटाके उडवले किंवा किती हजारांची माळ लावली असं अभिमानाने सांगणारी ‘आपली पोरं’ ही चौका-चौकात सापडतात. पण सणाच्या रंगाचा बेरंग करण्याचा हेतू त्यात नक्कीच नसतो.

अभ्यासाच्या आणि करिअरच्या शर्यतीत अनेकजणांना आपल्या खास मित्र-मैत्रिणींना भेटणंही अवघड जातं. दिवाळीच्या निमित्ताने असे सवंगडी पुन्हा एकदा पारावर जमतात आणि त्या पारावरच दिवाळीची ती संध्याकाळ साजरी करतात. हॉस्टेलवर राहणारे मित्र आपल्या इतर मित्रांना घेऊन गावी जातात आणि गावाकडची वेगळी दिवाळी अनुभवतात. दिवाळी पहाटच्या निमित्ताने तो आणि ती एकमेकांना भेटतात आणि पुन्हा रोज भेटलं पाहिजे असा मनाशी विचार करतात. प्रदूषण करणारे आवाजाचे फटाके न उडवता निसर्गाची हानी रोखण्याचा वैयक्तिक प्रयत्न अनेक तरुण- तरुणी करतात. एरव्ही जिन्स आणि टी-शर्टमध्ये असणारे तरूण-तरूणी नऊवारी साडय़ा आणि सलवार कुत्र्यांमध्ये दिसून येतात. असे दिवाळीचे रंग या तरुणाईशिवाय अनुभवणे कठीणच.

भूषण वैद्य