मी भारतीय असल्याची मला लाज वाटते
अमोल कपोले
ज्या देशाला स्वातंत्र्य मिळून साठहून जास्त वर्ष झाली, त्या देशातल्या सर्वसामान्य नागरिकांना साध्या मूलभूत सुविधाही (रस्ते, संडास, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण) पुरेशा प्रमाणात देता येत नाहीत, तो देश काय कपाळ महासत्ता होणार? ओम नमः शिवाय मी भारतीय असल्याची मला लाज वाटते. मी भारतीय असल्याची मला खूप लाज वाटते. मी भारतीय असल्याची मला प्रचंड लाज वाटते. मी भारतीय असल्याची मला मनापासून लाज वाटते. दिवाळीच्या फराळात ऐनवेळी खडा लागल्यासारखं वाटतंय ना? तेही अगदी महाकडू? पण माझा नाईलाज आहे. भारताच्या खोटा-खोटा, वरवरच्या समृद्धीची चित्रं रंगवणं, सूरज बडजात्या किंवा करण जोहरच्या टूकार चित्रपटातल्यासारखं अनुक्रमे भारतीय संस्कृती आणि देशप्रेमाच्या बेगडी कथा-कहाण्या रंगवून स्वतःची आणि इतरांचीही (कुणी वाचत असल्यास) घोर दिशाभूल करणं मला जमणार नाही. गेली तीन-साडेतीन वर्ष बघा. आपण सारेच भारताच्या तथाकथित प्रगतीचा माज (होय. माजच.)डोक्यात गेल्यासारखे वागत आहोत असं नाही वाटत तुम्हाला? आयटीमधल्या तथाकथित यशाच्या कहाण्या आपण गेली चार वर्षे मारे रंगवून रंगवून स्वतःचं समाधान करवून घेत असलो, तरीही ज्या आयटीच्या जोरावर आपण समृद्धीची फळं (?) चाखत आहोत, त्या आयटीतील आपली प्रगती म्हणजे तरी नक्की काय आहे याचा कधी विचार केलात का? इतके जर आपण आयटीच्या जगातले अनभिषिक्त सम्राट वगैरे असू, तर मला सांगा एकाही भारतीय कंपनीच्या नावावर मोठं एखादं सॉफ्टवेअर का नाही? अमेरिकन कंपन्यांच्या घरातल्या मोलकरणीसारखे आपण त्यांच्या दुय्यम तिय्यम दर्जाच्या कामांचे कॉन्ट्रॅक्टस मिळवून स्वतःची कोणती तिसमारखानी सिद्ध करतो, ते एक ब्रह्मदेवच जाणे. असो. मुद्दा आयटीशी किंवा कोणत्याही एका क्षेत्राशी संबंधित नाही. मुद्दा हा आहे, की गेल्या चार वर्षांपासून आपण महासत्ता वगैरे बनण्याच्या बेतात असल्यागत स्वतःचीच पाठ थोपटून घेत मुर्खांच्या नंदनवनात वावरत आहोत, ते कधी बंद करणार, हा आहे. आपल्यातले बरेचसे महाभाग (विशेषतः सर्वपक्षीय राजकीय बिनडोक, तत्वहीन, कणाहीन, स्वार्थी, दूरदृष्टीहीन नेते, निष्क्रिय, कर्तृत्वहीन सरकारी अधिकारी आणि समृद्धीची सूज आलेला आमचा मध्यम आणि नवमध्यम श्रीमंत वर्ग हे सारेच) तर भारत महासत्ता झाल्यागत गमजा मारत फिरत असतात. खरंच का हो आमची महासत्ता होण्याची लायकी आहे का? जरा विचारा ना प्रश्न स्वतःलाच.. आणि प्रामाणिकपणे उत्तरही द्या. ज्या देशाला स्वातंत्र्य मिळून साठहून जास्त वर्ष झाली, त्या देशातल्या सर्वसामान्य नागरिकांना साध्या मूलभूत सुविधाही (रस्ते, संडास, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण) पुरेशा प्रमाणात देता येत नाहीत, तो देश काय कपाळ महासत्ता होणार? ज्या देशात नागरिकांना ‘बेसिक सिव्हीक सेन्स’सुद्धा सांभाळता येत नाही, तो देश जगाचे नेतृत्व कोणत्या तोंडाने करणार? ज्या देशात चाळीस-टक्के माणसं किडा-मुंग्यांपेक्षाही वाईट स्थितीत जगतात, आणि त्याहून वाईट स्थितीत मरतात, तो देश जगाला कोणते संस्कार देणार? ज्या देशातले पावरबाज नेते शेतकर्यांच्या आत्महत्यांकडे दुर्लक्ष करून क्रिकेटपटूंच्या लिलावातच जास्त रस घेतात आणि मोक्याचं भूखंड स्वतःच्या आणि स्वतःच्या मर्जीतल्या मुखंडांच्या घशात घालून शहरांच्या विकासाचं वाटोळं करतात, ते देशाला कसली पावर देणार? ज्या देशातल्या नागरिकांना धड ट्रॅफिकचे नियम पाळता येत नाहीत, ते नव्या जगाचे नियम कसले तयार करणार? जिथे सण-समारंभ साजरे करणं म्हणजे मोबाईलवर दोन ओळींचे एसेमेस पाठवणं आणि मोठा आवाजात म्युझिक सिस्टिम लावून धिंगाणा घालणं, एवढं आणि एवढंच समजलं जातं, ते जगाला काय संस्कार देणार? जिथे कामापेक्षा सुटांचंच आकर्षण जास्त, आणि कष्टांपेक्षा अंगचोरपणाच बोकाळला आहे, तो देश कशाच्या बळावर प्रगतीची स्वप्नं पाहणार?
११ सप्टेंबरचा अमेरिकेतला हल्ला आणि ७ जुलैचा लंडनमधील बॉम्बस्फोट झाल्यानंतर आजतागायत तिथे परत तसं काही करणं दहशतवाद्यांना शक्य झालं नाही. आपल्याकडे मात्र गुरूवारच्या उपवासासारखे शुक्रवारचे बॉम्बस्फोट रूटीन होवू लागले आहेत आणि त्यात मरणार्यांबद्दल कुणाला काही वाटेनासं झालं आहे. ज्या देशातल्या पोलिसांना नागरिकांचं रक्षण करता येत नाही, तो देश जगातल्या दीनदुबळ्यांचं काय रक्षण करणार?जिथला नवश्रीमंतीची सूज आलेला आमचा मध्यमवर्ग सॅटर्डे संडेला मॉल्स आणि मल्टिप्लेक्सच्या चकरा मारण्यात धन्यता मानतो आणि आहे त्यापेक्षा जास्त कमावण्याची जीवघेणी स्पर्धा आपलीशी करतो, तो देशासाठी काय विचार करणार? ज्या देशातला समस्त महिलावर्ग बिनडोक, दर्जाहीन, संस्कारहीन, बुद्धीच नसलेल्या मालिकांची पारायणं करतो, तो देश आपल्या पुढच्या पिढीवर काय संस्कार करणार ? ज्या देशातला पिढानुपिढांचा राज्यकर्ता समाज फालतू स्वार्थासाठी आरक्षणाची मागणी करतो, तो लाचार शिरोमणी या देशाचंच काय, स्वतःच्या कुटुंबाचं तरी नेतृत्व करण्याच्या लायकीचा आहे का? देशाचं जाऊ द्या. पुणे आणि मुंबईव्यतिरिक्त उर्वरित महाराष्ट्र नावाची चीज आहे, याचीच इथल्या हस्तीदंती मनोर्यातल्या महाभागांना कल्पना आहे की नाही कोण जाणे. या उर्वरित महाराष्ट्रात बेकारी, वीज, पाणी, दुष्काळ यासारखे प्रश्न अजुनही उग्र रूप धारण करून आहेत, याचीही आम्हाला कल्पना नसावी. आणि असली तरी विचार करायला वेळ आहे कोणाकडे? तो थोडीच माझा प्रॉब्लेम आहे? खरंय. भारत हा माझा प्रॉब्लेम नाहीच आहे. मी हाच भारताचा प्रॉब्लेम आहे. आणि तो सॉल्व्ह करायचा असेल ना, तर मी पासूनच सुरूवात करायला हवी. दिबाळीच्या लखलखाटात आपल्या डोक्यात इतका जरी प्रकाश पडला, तरी पुरेसं आहेह्न. अन्यथा कठीण आहे.. खूपच कठीण आहे. ..........................................................................................