मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. आमने-सामने
Written By वेबदुनिया|

पुसदमध्ये काका-पुतणे आमने-सामने

महाराष्ट्राच्या राजकीय घराण्यांमध्ये प्रसिद्ध असलेल्या, या राज्याला दोन मुख्यमंत्री देणार्‍या नाईक घराण्याचा बालेकिल्ला आज बंडखोरीने ग्रासला आहे. या बंडखोरीमुळे घरातील काका आणि पुतण्या रिंगणात उतरण्याची आणि त्यामुळे निवडणुकीची रंगत वाढल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

१९९५ च्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच रिंगणात उतरणारे मनोहर नाईक यांना तत्कालीन जनता दलाचे बाळासाहेब मुखरे यांनी चांगलीच लढत दिली. ते केवळ ४ हजार मतांनी पराभूत झाले हेते. २००१, २००४ ची निवडणूक मनोहरराव नाईकांनी जिंकली. मात्र, यंदाच्या निवडणुकीत त्यांच्याविरुद्ध त्यांचे पुतणे, ऍड. निलय नाईक बंडखोर म्हणून रिंगणात उतरले आहेत. भाजपा-सेना युतीत हा मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला आला आहे. सेनेच्या जिल्हा महिला संघटक डॉ. आरती फुपाटे यांचेही या भागात उल्लेखनीय कार्य आहे. आदिवासी समाजाची मते, भाजप-सेनेची परंपरागत मते व नाईक विरोधी नकारातमक मतांवर आपण विजयी होऊ असा त्यांचा आशावाद आहे.

पूर्वी दुहेरी वाटणारी ही लढत ऍड. निलय नाईकांच्या बंडखोरीने तिरंगी झाली असून आता जसा प्रचाराला जोर चढत आहे तसतशी लढतीतली चुरस वाढत आहे. नाईकांच्या परंपरागत बंजारा मतपेढीला सुरंग लावण्याचे काम ऍड. निलय नाईक करीत असल्याने बंगल्यात मात्र दिवसेंदिवस अस्वस्थता वाढत आहे. जुन्या जाणत्या नेत्या व कार्यकार्याचा फौजफाटा असतानाही मनोहर नाईक यांच्या प्रचारातला चार्म हरवल्यासारखा वाटत आहे.

बंजारा मतांवर दोवदारी असल्याने ती मतपेढी सुरक्षित राहावी याकरिता नाना तर्‍हेचे प्रयत्न सुुरू आहे. बंजारा समाजातील तोड्याने विशेषतः युवकांमध्ये ऍड. निलय नाईकांची क्रेझ पाहता ते यावेळी मोठा उलटफेर करू शकतात अशी जोरदार चर्चा येथे आहे. आपल्या वकृत्तवाने जनतेला मोहीत करणारे ऍड. निलय नाईक विकासाच्या नावावर मते मागत आहेत. विमान आमदार मनोहरराव नाईक आपल्या संपूर्ण कुटुंबीयासह मतदारसंघ पिंजून काढत आहेत. कै. वसंतराव नाईक व सुधाकराव नाईक यांचे स्वप्न साकारण्याकरिता मतांचा जोगवा मागत आहेत. इथल्या लढतीत विजय नाईकांचाच होणार असल्याचा दावा करणार्‍या कार्यकर्त्यांना ते नाईक मनोहर वा निलय यापैकी कोणते हे मात्र हे सांगता येणे अवघड झाले आहे.