शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. फेंगशुई
  4. »
  5. फेंगशुई आर्टीकल
Written By वेबदुनिया|

आयुष्यात रंग भरा फेंगशुईने

WD
फेंगशुईच्या स्पर्शाने आयुष्य बदलून जाते. फेंगशुई केवळ विशिष्ट वस्तूच्या वापराने किंवा घरात काही बदल करण्यानेच अंगिकारता येते असे नाही. तर रंग हेही फेंगशुईत महत्त्वाचे असतात. विशिष्ट रंगांच्या वापराने आपल्या आयुष्यात उत्साहाचे, आनंदाचे रंग भरतात. निराशा, अनुत्साहाचे ब्लॅक अँड व्हाईट आयुष्य संपून ते रंगीत होते. आपल्याला अनुकूल अशा रंगांच्या वापराने ची ही सकारात्मक उर्जा उत्पन्न होते. या रंगांच्या वस्तू आपण घर किंवा ऑफीसमध्ये योग्य जागी ठेवल्यास सकारात्मक उर्जा वाहू लागते.

फेंगशुई रंग यीन आणि यांगमध्ये विभागले गेले आहेत. यीन रंग आपल्याला सुखावणारे असतात. आपल्या मनाला उभारी देणारे असतात. असे रंग बेडरूम आणि नर्सरीमध्ये दिले पाहिजे. निळा हा यीन रंग आहे. आपल्याला सुखावणारा आणि डोळ्यांना विश्रांती देणारा रंग आहे. उदाहरणार्थ. आपण समुद्राचे चित्र पहातो म्हणजे काय तर त्यातील शांत पाणी, त्याचा अफाटपणा आपल्याला भावतो. या चित्रामुळे होत काही नाही, पण एक शांत अनुभव मात्र येतो. घरात एखादी आजारी व्यक्ती असल्यास किंवा एखादा शस्त्रक्रियेतून बरा होत असल्यास ती व्यक्ती ज्या खोलीत असेल तिला निळा रंग असल्यास लवकर बरे होण्यास मानसिक मदत होते. फेंगशुईत निळ्या रंगाची सांगड बुद्धिमत्ता आणि शोधक वृत्तीशी घातली आहे.

निळ्याव्यतिरिक्त इतरही अनेक रंग यीनमध्ये गणले जातात. काळा रंग करीयरसाठी सर्वोत्तम मानला जातो. मेटॅलिक रंगांबरोबर तो वापरला तरी तो उत्तम. काळा रंग हा सत्ता आणि भावनिक संरक्षणाचे प्रतीक मानला जातो. जांभळा रंगही यींग श्रेणीतील आहे. आजारातून बरे होण्यासाठी निळ्या रंगाप्रमाणेच हाही उपयुक्त आहे. फेंगशुईत जांभळ्या रंगाची सांगड प्रेरणेच्या तीव्र जाणीवेशी घातली आहे. पांढरा रंगही यीन श्रेणीतील असून त्याची सांगड पावित्र्य आणि आत्मविश्वासाशी घातली आहे.

आता यांग श्रेणीतील रंगांविषयी. या श्रेणीतील रंग काहीसे भडक असतात. पण ते त्यांच्या यीन रंगातील सहकाऱ्यांना पूरकही असतात. लाल हा यांग रंग आहे. भावनात्मक उत्तेजना निर्माण करण्यासाठी लाल रंग उपयुक्त आहे. पण कधी कधी या उत्तेजना प्रमाणाबाहेरही असू शकतात. त्यामुळे यांचा वापर काळजीपूर्वक करायला हवा. हा रंग योग्य प्रमाणात वापरल्यास वातावरणात सकारात्मक उर्जा उत्पन्न करण्याचे सामर्थ्य या रंगात आहे. पिवळा हा आणखी एक यांग रंग लाल रंगाच्या प्रकृतीशी साधर्म्य साधणारा आहे. पिवळा रंग सूर्यप्रकाशाशी संबंधित असून त्यामुळे उबदारपणा, सौम्यता आणि मित्रत्व निर्माण होते. हा रंगही अतिशय काळजीपूर्वक वापरला पाहिजे. याचा अनाठायी काळजी उत्पन्न करू शकतो.

WD
एखाद्याकडे संघटनात्मक कौशल्य नसेल तर त्याच्यासाठी ऑरेंज रंग उपयुक्त आहे. त्याने आपल्या ऑफिसात किंवा घरात त्याचा वापर केला पाहिजे. हा रंग संघटनात्मक आहे. सृजनशील क्षेत्रातील उदाहरणार्थ कला किंवा साहित्यातील मंडळींसाठी हा रंग विशेष उपयुक्त आहे. सृजनाची ची ही उर्जा उत्पन्न करण्यासाठी ऑरेंज रंग विशेष सहाय्यभूत ठरतो. याशिवाय किरमिजी, सोनेरी हे अन्य यांग रंग आहेत. या रंगांची सांगड नशीब, पैसा आणि प्रणयाशी आहे.

फेंगशुई रंग वापरण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे एकत्रीकरण हा आहे. उदाहरणार्थ काळा रंग आणि मेटॅलिक रंग एकत्र वापरल्यास करीयर झेप घेऊ शकते. पांढरा रंग सोनेरी किंवा रूपेरी रंगांबरोबर वापरल्यास आत्मविश्वासाचे वातावरण निर्माण होते. हे कॉम्बिनेशन घरातील सर्व लोक जमतात अशा खोलीत वापरल्यास सकारात्मक उर्जा उत्पन्न होते. लॅव्हेंडर रंगही असे वातावरण उत्पन्न करण्यास सहाय्यभूत आहे. मात्र यातील कुठलेही रंग वापरताना त्यांचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त नको. अन्यथा त्यातून तुम्हालाच त्रास होण्याची शक्यता आहे.

फेंगशुई रंग वापरल्याने तुमच्या आयु्ष्यात सकारात्मक बदल घडू शकतील. सकारात्मक उर्जेचा संचार घऱात, कार्यालयात किंवा जेथे तुम्ही काम करता तेथे होईल. तेही तुम्हाला त्याची जाणीव न होता. त्यामुळे उपयोग करून पहायला तरी काय हरकत आहे?