मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. फिफा विश्वचषक
Written By
Last Modified: शनिवार, 10 डिसेंबर 2022 (16:50 IST)

FIFA World Cup : ब्राझीलचं आव्हान संपुष्टात, अर्जेंटिना-क्रोएशिया सेमीफायनलमध्ये भिडणार

fifa jarmany
कतारमध्ये सुरू असलेल्या फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेत क्रोएशियाने ब्राझीलला हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
या पराभवामुळे ब्राझील संघावर वर्ल्ड कप स्पर्धेच्या बाहेर पडण्याची नामुष्की ओढावली आहे.
क्रोएशियाची ही कामगिरी जगभरातील फुटबॉल प्रेमींना आश्चर्यचकीत करणारी असून त्याबाबत प्रचंड चर्चा होत आहे.दुसरीकडे, लिओनल मेस्सीने अर्जेंटिना संघाला सेमीफायनलमध्ये पोहोचवलं आहे.
 
ब्राझीलचं स्वप्न भंगलं
सर्वात आधी जाणून घेऊ, ब्राझील विरुद्ध क्रोएशिया लढतीविषयी. 
 
दोन्ही संघांनी सामन्यात 1-1 गोल केले. 106व्या मिनिटाला ब्राझीलकडून नेमार ज्युनिअरने गोल केला.
 
त्यानंतर 11 मिनिटांनी म्हणजेच 117 मिनिटाला क्रोएशियाकडून ब्रुनो पेटकोविचने गोल केला. त्यामुळे दोन्ही संघांची गोलची बरोबरी झाली.
 
सामना निकाली काढण्यासाठी पेनल्टी गोलचा आधार घेण्यात आला. दोन्ही संघांना 4-4 पेनल्टी शूट मिळाले. क्रोएशियाने चारही पेनल्टी शूटवर गोल केले. तर ब्राझीलला पेनल्टीवर केवळ दोनच गोल करता आले.
त्यामुळे ब्राझीलचा संघ वर्ल्डकपबाहेर फेकला गेला आहे.
 
नेमारने या सामन्यात पहिला गोल केला तेव्हा ब्राझीलचं सेमीफायनलचं तिकीट नक्की मानलं जात होतं. मात्र क्रोएशियाच्या पेटकोविकने केलेल्या गोलमुळे सामन्याचं पूर्णच चित्र पालटलं.
 
पेनल्टी शूटवेळी ब्राझीलने नेमार ज्युनिअरला एकही संधी दिली नाही. क्रोएशियाकडून लुका मॉद्रिचचा पेनल्टी किक निर्णायक ठरला. तर ब्राझीलकडून मर्किनिओसचा पेनल्टी गोल हुकणे हेसुद्धा त्यांच्या पराभवाचं एक कारण ठरलं.
 
पेनल्टीच्या संदर्भात क्रोएशियाचा रेकॉर्ड खूप चांगला राहिला आहे. राऊंड ऑफ 16 मध्ये क्रोएशियाने जपानचा 3-1 असा पराभव करून त्यांना स्पर्धेबाहेर केलं होतं.
बॉल पझेशन म्हणजेच फुटबॉल जास्त वेळ कुणाकडे राहतो, त्या बाबत क्रोएशिया आणि ब्राझीलमधील अंतर खूप कमी राहिलं.
 
51 टक्के वेळेसह क्रोएशिया पुढे राहिला. मात्र ब्राझीलने या सामन्यात 11 ऑन-टारगेट शॉट मारले. त्याबाबत क्रोएशियाचा स्कोअर केवळ 1 होता.
 
म्हणजे ब्राझीलने चेंडू गोलपोस्टपर्यंत अनेकवेळा नेला. मात्र ते एकाही वेळी यशस्वी ठरले नाहीत. अखेरीस, पेनल्टीमध्ये त्यांना पराभवास सामोरे जावे लागले.
मेस्सीची जादूई कामगिरी आणि अर्जेंटिना सेमीफायनलमध्ये
फिफाचा दुसरा क्वार्टर फायनल सामना शुक्रवारी (9 डिसेंबर) रात्री उशीरा साडेबारा वाजता झाला.
 
अर्जेंटिना आणि नेदरलँड्समध्ये झालेल्या या सामन्यात दोन्ही संघांनी प्रत्येकी 2 गोल केले.
 
पहिला गोल अर्जेंटिनाकडून नॉऊवेल मोलिना याने केलं. मात्र या गोलसाठी लिओनल मेस्सीने दिलेला पास या वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम पासपैकी एक म्हटला जात आहे.
 
मेसीने डच डिफेन्स भेदून काढत मोलिनापर्यंत चेंडू पोहोचवला. त्यानंतर मोलिनाने संधी न दवडता तो बॉल गोलपोस्टमध्ये ढकलून दिला.
 
यानंतर 73व्या मिनिटाला अर्जेंटिनाकडून दुसरा गोल स्टार फुटबॉलर मेस्सीने केला.
 
मात्र यानंतर 83व्या आणि 128व्या मिनिटाला डच फुटबॉलर वुट वेहोर्स आणि डेन्झेल डमफ्रीज यांनी गोल केल्यामुळे दोन्ही संघांचा स्कोअर बरोबरीवर आला.
 
त्यामुळे या सामन्याचा निकालही पेनल्टी शूटने लागणार हे स्पष्ट होतं.
 
दोन्ही संघांना 5-5 पेनल्टी शूट मिळाले. अर्जेंटिनाकडून मेस्सीने पहिला गोल केला. त्यानंतर त्यांच्या संघातील गोलकिपर एमी मार्टिनेजने वर्जिल वॅन डाईज आणि स्टीव्हन बरहाऊस यांचे गोल रोखण्याचं महत्त्वपूर्ण काम केलं.
 
कतार वर्ल्ड कप स्पर्धेत अर्जेंटिनाने आतापर्यंत केवळ एकच सामन्यात पराभव पत्करला आहे, तो म्हणजे सौदी अरब संघाविरुद्धचा पहिला सामना.
 
या पराभवामुळे फुटबॉल चाहत्यांना आश्चर्य झालं होतं. कारण, सलग 36 सामने जिंकणाऱ्या अर्जेंटिनासाठी हा पराभव अत्यंत धक्कादायक होता.
 
या वर्ल्डकप स्पर्धेत अर्जेंटिनाचा प्रवास तसाच दिसला, जसा तो 1990 च्या वर्ल्डकपमध्ये होता.
 
इटलीमध्ये झालेल्या त्या स्पर्धेत अर्जेंटिनाने आपला पहिला सामना कॅमेरून संघाविरुद्ध गमावला होता.
 
त्यावेळीही सर्व फुटबॉल चाहत्यांसाठी ती आश्चर्यजनक घटना होती. मात्र, अखेरीस अर्जेंटिना फायनलमध्ये पोहोचण्यात यशस्वी ठरला. पुढे त्यांना जर्मनीकडून पराभूत व्हावं लागलं होतं.
 
मेसीचा नवा विक्रम
मेसीने या वर्ल्ड कप स्पर्धेत आतापर्यंत 10 गोल मारले आहेत. या कामगिरीमुळे त्याने अर्जेंटिनाचे दिग्गज माजी फुटबॉलर गेब्रियाल बतूता यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
 
35 वर्षीय स्टार फुटबॉलर मेस्सीचा हा अखेरचा वर्ल्ड कप मानला जात आहे. अशा स्थितीत त्याच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिना संघावर वर्ल्ड कप जिंकण्याचा दबाव आहे.
 
नेदरलँड्सबाबत बोलायचं झाल्यास गेल्या 20 सामन्यांमध्ये त्यांचा हा पहिलाच पराभव ठरला. या पराभवामुळे थेट वर्ल्डकपबाहेर पडण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
आता येत्या बुधवार-गुरुवारदरम्यान रात्री साडेबारा वाजता अर्जेंटिना आणि क्रोएशिया यांच्यात फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना होईल. कतारच्या लुसैल स्टेडियममध्ये हा सामना खेळवण्यात येईल.
 
तर, शनिवारी रात्री साडेआठ वाजता मोरक्को आणि पोर्तुगाल यांच्यात क्वार्टर फायनल फेरीतील तिसरा सामना होणार आहे. त्यानंतर रात्री उशीरा साडेबारा वाजता इंग्लंड आणि फ्रान्स या संघांमध्ये क्वार्टर फायनलची लढत हील.
 
या दोन्ही सामन्यांनंतर कळेल की 14 डिसेंबरच्या सेमीफायनल लढतीत कोणते दोन संघ आमनेसामने येणार आहेत.