मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
Written By wd|
Last Modified: मुंबई , शनिवार, 24 मे 2014 (10:30 IST)

जागा वाढून मिळाल्या म्हणून राष्ट्रवादीचा काँग्रेसवर दबाव

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेससह राष्ट्रवादीला दारूण पराभवाचा सामना करावा लागला. पराभव पचवावा लागल्यानंतरही आघाडीचे नेते एकमेकांच्या डोक्यावर पराभवाचे खापर फोडण्यातच धन्यता मानत असल्याचे चित्र राष्ट्रवादी कॉंगेसच्या शुक्रवारी चिंतन बैठकीत दिसून आले. 

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीत जागा वाढून मिळवण्यासाठी राष्‍ट्रवादीकडून कॉंग्रेसवर दबावतंत्राचा वापर केला जात असल्याचे चित्र आहे. काँग्रेसने 2004 व 2009 च्या लोकसभा निवडणुकीत राज्यात अधिक जागा मिळाल्याचा निकष लावून विधानसभा निवडणुकांसाठी जास्त जागांवर दावा सांगितला आणि त्या पदरात पाडून घेतल्या. मात्र, आता काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीचे खासदार जास्त निवडून आल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत जागावाटपाचे सूत्र नव्याने ठरवायला हवे, असा दबाव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसवर आणला आहे.

लोकसभेत काँग्रेसचे दोन, तर राष्ट्रवादीचे चार खासदार निवडून आले आहेत. यशवंतराव चव्हाण सभागृहात राष्ट्रवादीची चिंतन बैठक पार पडली. त्यात पवारांनी लोकसभा निवडणुकीच्या अपयशाचे खापर काँग्रेसवर फोडताना विधानसभेत जास्त जागांची मागणी केली.

काँग्रेस व मित्रपक्षांवर लोक नाराज असल्याचे दिसून आले आहे. विधानसभेला चारच महिने हातात  आहेत. पराभवाने खचून न जाता मार्ग काढण्याचा मी माझ्या परीने निर्णय घेतला आहे. दररोज 18 तास काम करणार आहे, असे पवारांनी सांगितले. तसेच राज्यांत एलबीटीच्या निर्णय प्रलंबित असल्याने व्यापारीवर्ग नाराज आहेत. मराठा, मुस्लिम आरक्षणाच्या निर्णयातही आता चालढकल होऊ नये. उशीर लावला तर काय होते, हे दिसले. झटपट निर्णय घेतले नाही, तर विधानसभेत खरे नाही, असा टोला पवारांनी लगावला.

महिला, व्यावसायिक, सरकारी कर्मचारी यांचाही विश्वास संपादन करण्यात आघाडी सरकार म्हणून अपयशी ठरल्याचेही पवार यांनी कबूल केले.