मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. धोका चिनी ड्रॅगनचा
Written By अभिनय कुलकर्णी|

इतिहासात डोकावताना...

भारत आणि चीन यांच्यातील संबंध १९६२ च्या युद्धाने बिघडले असले तरी त्यापूर्वीही ते कधी फार चांगले होते, असे मात्र नाही. परस्परांच्या जवळ राहूनही या दोन्ही देशांनी एकमेकांत हस्तक्षेप कधी केला नाही. १९६२ पूर्वी परस्परांत कधी लष्करी आक्रमण झाले नाही, तसेच मानवी स्थलांतरही झाले नाही. या दोन्ही देशांतील काही साम्य आणि काही विरोधी स्थळे पहाण्याचा हा प्रयत्न.

भारत आणि चीन या प्राचीन संस्कृती मानल्या जातात. पण या संस्कृतीची वैशिष्ट्येही भिन्न आहेत. चीन हा कायम एकसंध राहिला, त्या तुलनेत भारत विघटित दिसत असूनही एक होता. चीनने स्वतःभोवती कोष बनवून घेतले होते. त्यातुलनेत भारत नेहमीच खुल्या विचारांचा राहिला.

चीनने कधीच कुणाला आपल्यात डोकावून देण्याची संधी दिली नाही. म्हणून भारतातून कुणी मंडळी चीनमध्ये जुन्या काळात कधी गेली नाही. पण चीनमधून काही लोक बाकीच्या जगात मात्र गेले. त्यांनी जग पाहिलं नि तिथे काय चाललंय याची माहिती चीनमध्ये नेली. त्या तुलनेत भारताने बाहेरच्यांना इथे येण्याची नेहमीच संधी दिली. त्यांनी इथले जीवनमान पाहिले. अभ्यासले. काही जण इथेच राहिले. मिसळून गेले.

भारत हा नेहमी वैयक्तिक करिष्मा करणार्‍यांचा देश राहिला. म्हणून इथल्या समजाची उभारणी व्यक्तीवादी आहे. राम, कृष्ण, राणा प्रताप, शिवाजी महाराज असे वैयक्तिक करिष्मा असणारे लोक इथे जन्माला आले. त्यांनी मोठा पराक्रमही गाजवला. पण समाज म्हणून एकत्रित प्रयत्नांचा मात्र इथे अभावच दिसला. त्या तुलनेत चीनमध्ये उत्तुंग व्यक्तिमत्वे फार कमी झाली. पण एकत्रित समाज मात्र होता. म्हणूनच उत्तुंग म्हणावीत अशी कामे तिकडे संघशक्तीने लीलया झाली. चीनची आफाट भिंत हे त्याचे उदाहरण. जागतिक दर्जाचे क्रीडापटूही तिथेच जन्माला येतात. थ्री गॉर्जेस सारखे जगातील मोठे धरण तिथे हु की चू न होता बांधले जाते. मार्क्सवादाचा पोलादी पडदा बाजूला सारून अजस्त्र उद्योग उभे राहिले.

पण भारत आणि चीनमध्ये काही साम्येही आहेत. ही साम्ये ऐतिहासिक काळातही होती. या दोन्ही देशातील काही केंद्रे तेव्हा जगातील प्रमुख उत्पादन केंद्रांपैकी एक होती. भारतातील ब्रह्मपुत्रा आणि कावेरी नदीचा त्रिभूज प्रदेश आणि चीनमधील पर्ल आणि यांगत्से नदीचा त्रिभूज प्रदेश जगातील सर्वांधिक उत्पादन देणारा प्रदेश होता. पुढे वसाहतवादाने या दोन्ही देशांचे हे स्थान हिरावले गेले. भारत एकेकाळी पोलाद उत्पादनात आणि त्यावरच्या प्रक्रियेतही जगात आघाडीवर होता. विशेष म्हणजे आपले हे स्थान भारत पुन्हा मिळवतोय, असे जागतिक आकडे सांगताहेत.

चीनही आता खेळणी, कपडे, पारंपरिक औषधे, इलेक्ट्रॉनिक्स या वस्तुंच्या उत्पादनात आघाडीवर आहे. भारत बीपीओ उद्योग, सॉफ्टवेअर, वैद्यकिय सेवा, दागिने आणि रत्ने, छोटी यंत्रे, शिक्षण सेवा आणि मनोरंजन, जाहिरात या क्षेत्रांत आघाडीवर आहे.

भारतात काम करवून घेण्याची किंमत तुलनेने कमी असल्याने येथे आऊटसोर्स होणारे काम कमी होण्याची शक्यता नाही. कारण हे काम करणारा कर्मचारी वर्गही इथेच रहाणार आहे. त्या तुलनेत चीनमध्ये सध्या उत्पादीत होणारा माल उत्पादन खर्च कमी येत असल्याने तेथे बनतो. पण तिथला खर्च वाढल्यास तो इतरत्र हलू शकतो.

भारतातल्या लोकांना चीनची लष्करी ताकदीचीही भीती वाटते. पण त्यावेळी ते १९६२ च्या चीन युद्धाच्या आठवणी त्यांच्यासमोर असतात. पण भारताची आताची वाटचाल बरीच पुढे झाली आहे, हे लक्षात घ्यायला हवे. १९७९ मध्ये चीनने व्हिएतनामवर आक्रमण केले होते. पण त्या पिटुकल्या देशाने चीनी सैन्याला माघार घ्यायला लावली होती. इतकेच काय पण भारतीय सैनिकांनीही ६२ च्या युद्धात मोठा पराक्रम गाजवला होता. कमी वेळात त्यांनी वेगाने हालचाल करून चिनी सैन्याला मागे परतावले होते. आता युद्द झाल्यास चीनसाठी ते सोपे असणार नाही, आणि भारतही तितका कमकुवत राहिलेला नाही.

दोन्ही देश स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अगदीच प्राथमिक अवस्थेत होते. पण त्यानंतर दोघांनीही विकासाचे एक मॉडेल स्वीकारले. चीनमध्ये कम्युनिस्ट एकाधिकारशाही आली. त्यांनी चीनला पोलादी पडद्याआडच ठेवले. पण ९० नंतर मात्र चीनचे दरवाजे बाकीच्यांसाठी खुले झाले. त्यानंतर चीनने घेतलेली उत्तुंग झेप आपण सारेच पहातो आहोत. भारताने आधी समाजवादी व्यवस्था स्वीकारत उद्योगांत बाहेरच्या मंडळींना येऊ दिले नाही. पण तोवर घरची व्यवस्था मजबूत करून घेतली. १९९० नंतर मात्र मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. पण हा निर्णय भारताच्या भल्याचाच ठरला. यानंतर भारतानेही प्रगतीचा मोठा टप्पा गाठला. आता सुपरपॉवर म्हणूनही भारताची चर्चा व्हायला लागलीय हे त्याचेच फलित. (संकलन-अभिनय कुलकर्णी)