शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली/ अटारी , शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017 (10:34 IST)

14 पाक नागरिकांना भारताने परत पाठवले

भारताने आज आपल्या ताब्यातील 14 नागरिकांना पुन्हा पाकिस्तानला पाठवले. यामध्ये 9 मच्छिमार, 4 नागरिक आणि एका बालकाचा समावेश आहे. तर पाकिस्ताननेही सद्‌भावना म्हणून गुरु नानक देवांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या समारंभाला उपस्थित राहण्यासाठी 2,600 शिखांना व्हिसा मंजूर केला आहे. हा समारंभ बुधवारपासून 11 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे, असे पाकिस्तानच्या दूतावासाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
भारताकडून मुक्‍तता करण्यात आलेले सर्व पाक नागरिक अटारी वाघा सीमारेषेवरून मायदेशी रवाना करण्यात आले. यापूर्वी 28 सप्टेंबर रोजी आणखी दोघा पाकिस्तानी नागरिकांनाही पाकिस्तानात सोडण्यात आले होते. त्यांच्यासाठी पाक दूतावासाकडून आपत्कालीन प्रवास प्रमाणपत्र देण्यात आले होते. पाकिस्तानकडून भारताच्या 370 भारतीय कैद्यांची मुक्‍तता करण्यात आली आहे. यामध्ये 363 मच्छिमारांचा समावेश आहे.
 
पाकिस्तानने ज्या 2,600 शिखांना दिलेला व्हिसा हा धार्मिक पर्यटनाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने देण्यात आला आहे. पाकिस्तानातील सर्व धार्मिक स्थळांचे संरक्षण आणि तेथे जाणाऱ्या सर्व भाविकांना आवश्‍यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पाकिस्तान सरकार कटिबद्ध असल्याचेही पाक दूतावासाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.