सोमवार, 8 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 7 ऑक्टोबर 2023 (12:23 IST)

'इस्रायलवर 20 मिनिटांत 5 हजार रॉकेट्सचा मारा', डझनभर कट्टरतावादी देशात घुसले

5000 rockets hit Israel in 20 minutes
इस्लामी कट्टरवादी गट 'हमास'ने इस्रायलवर अचानक हल्ला करून देशात प्रवेश केला आहे.
 
शनिवारी सकाळी गाझा पट्टीतून इस्रायलच्या दिशेने तब्बल 5 हजार रॉकेट्स डागण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
 
या रॉकेट हल्ल्यांनंतर इस्रायलमध्ये हवाई हल्ल्याच्या धोक्याचे सायरन वाजले.
 
तेल अवीव आणि दक्षिण गाझाच्या आसपासच्या भागात स्फोट झाल्याचंही वृत्त आहे.
 
या हल्ल्यात इस्रायलमध्ये आतापर्यतं एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, तर 15 जण जखमी झाले आहेत.
 
इस्रायली लष्कराने दिलेल्या माहितीनुसार अनेक पॅलेस्टिनी कट्टरतावादी गाझामधून दक्षिण इस्रायलमध्ये घुसले आहेत.
 
दरम्यान, परिस्थितीचं मुल्यांकन करून आम्ही प्रतिहल्ला करू असा इस्रायलने इशारा दिला आहे.
 
इस्त्रायली लष्कराने सीमेजवळ राहणाऱ्या लोकांना घरातच राहण्यास सांगितले आहे.
 
पॅलेस्टिनी कट्टरतावादी गट हमासने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. सध्या हमास गटाची गाझावर सत्ता आहे.
 
या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंनी लष्करी अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक बोलावली आहे.
 
इस्रायलचे भारतातील राजदूत नाओर गिलॉन यांनी इस्रायलमध्ये सध्या सामान्य परिस्थिती नसल्याचं सांगितलं आहे.
 
“ज्यू लोकांच्या सुटीच्या दिवशी इस्रायलवर गाझाकडून एकत्रित हल्ला होतोय. हमासच्या दहशतवाद्यांची रॉकेट हल्ला केला आणि जमिनीवरून घुसखोरी केलीय. ही सामान्य परिस्थिती नाहीये. पण यात इस्रायचाच विजय होईल,” असं गिलॉन यांनी म्हटलं आहे.