अमेरिकेच्या टेक्सास राज्यात एका बेबंद ट्रकमध्ये 53 मृतदेह सापडले होते. ही घटना 27 जूनची आहे, त्या दिवशी हा ट्रक रस्त्याच्या कडेला उभा मिळाला. हा ट्रक टेक्सासच्या सीमाभागातील सॅन अँटोनियामध्ये सापडला.
अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ट्रकमध्ये जिवंत सापडलेले लोक उष्णतेने भाजून निघत होते आणि त्यांना उष्माघात झाला होता.
मृत्यू पावलेल्या लोकांबद्दल देखील हीच भीती व्यक्त केली गेली कि त्यांचा मृत्यू उष्माघाताने झाला.
आतापर्यंत मिळालेल्या माहितीच्या आधारे सांगितलं जात आहे की, ट्रक चालकाला एअर कंडिशनर काम करत नसल्याची माहिती नव्हती.
फेडरल कोर्टात सादर केलेल्या कागदपत्रांनुसार, होमरो झामोरानोला ट्रकचे एअर कंडिशनर काम करत आहे की नाही याची माहिती नव्हती. पोलिसांनी सांगितले की, ते ट्रकजवळ लपून बसले होते.
एअर कंडिशनर काम करत नसल्याचे माहित नव्हते
ट्रकमध्ये बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या अनेक लोकांवर आणि लहान मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जवळपास याच परिसरातून परप्रांतीयांना घेऊन जाणारा आणखी एक ट्रक सापडला आहे.
झामोरानो (45) आणि संशयकर्ता क्रिस्टियन मार्टिनेझ (28) यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी स्थलांतरितांच्या तस्करीबद्दल मेसेजवर एकमेकांशी संवाद साधला.
स्थलांतर आणि सीमा शुल्क प्रवर्तन तसेच टेक्सास पोलिसांसाठी काम करणार्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, मृत्यूची घटना घडल्यानंतरही त्या दोघांमध्ये बोलणे झाले होते.
कोर्टात सादर केलेल्या कागदपत्रांनुसार, मार्टिनेझने सांगितले की ड्रायव्हरला एअर कंडिशनरने काम करणे बंद केले आहे याबद्दल काहीच माहित नव्हते आणि याच चुकीमुळे लोकांचा मृत्यू झाला.
ट्रकचा चालक जवळच लपून बसला होता
ट्रक ड्रायव्हर झोमोरानो ट्रक जवळच झुडपात लपला होता. मेक्सिकन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, तो सुरुवातीला स्वतःही यामधून जीव वाचलेल्या पैकी एक असं दाखवण्याचा प्रयत्न करत होता.
पण सर्विलांसचे फोटो समोर आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. जेव्हा त्याचा ट्रक टेक्सासमधील लॉरेडो येथे अमेरिकेची सीमा ओलांडत होता, तेव्हा पेट्रोल चेकपॉईंटमधून जात असताना त्याचे छायाचित्र सर्विलांस कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाले होते.
टेक्सासच्या एका खासदाराचे म्हणणे आहे की तो पकडला गेला तेव्हा त्याने मेथॅम्फेटामाइनचा (नशा) उच्च डोस घेतला होता.
दोन्ही आरोपी दोषी ठरले तर तस्करी आणि कट रचल्याप्रकरणी त्यांना फाशीची शिक्षा होऊ शकते.
मेक्सिकन अधिकार्यांनी सांगितले की, ट्रक लॉरीमध्ये एकूण 67 स्थलांतरित होते, तर सॅन अँटोनियोमधील सरकारी वकिलांनी ही संख्या 64 सांगितली आहे.
पीडित लोकांमध्ये 27 मेक्सिकन, 14 होंडुरन्स आणि सात ग्वाटेमाला आणि दोन साल्वाडोर मधील नागरिकांचा समावेश आहे.
या घटनेनंतर सापडलेल्या आणखी एका ट्रकमध्ये 13 प्रवासी होते.
ट्रक बेवारस सापडला
सॅन अँटोनियोमधील अग्निशामक विभागाचे प्रमुख चार्ल्स हूड यांनी पत्रकारांना सांगितले की, मृतदेह सापडल्याचे वृत्त आल्यानंतर आपत्कालीन पथके घटनास्थळी दाखल झाली होती.
त्यांनी सांगितले होते, "ट्रक उघडून पाहताच आतमध्ये मृतदेह दिसावेत, असे आमच्यासोबत व्हायला नको होते. असा विचार करून आमच्यापैकी कोणीही हे काम करायला गेले नव्हते."
हूड म्हणाले की, ट्रक चालकाने ट्रक वाऱ्यावर सोडला, ज्याची वातानुकूलिन यंत्रणा काम करत नव्हती आणि आतमध्ये पिण्याचे पाणीही नव्हते.
सॅन अँटोनियोमधील तापमान उन्हाळ्याच्या महिन्यांत खूप जास्त वाढते. सोमवार 27 जून रोजी तेथील तापमान 39.4 अंश सेल्सिअस होते.
हृदय पिळवटून टाकणारे दृश्य
अंधार पडला होता. काही मोजक्याच पोलिसांच्या गाड्या तिथे दिसत होत्या. घटनास्थळाला पोलिसांनी टेपने वेढले होते. यावरून येथे काही मोठी दुर्घटना घडल्याचे संकेत मिळत होते.
असे मानले जात होते की, बळी हे स्थलांतरित लोकांचे होते. त्यांचा उष्माघात आणि पाण्याअभावी मृत्यू झाला.
सॅन अँटोनियोमध्ये याआधीही अशा प्रकारचे अपघात झाले आहेत. परंतु इतके भयानक नाहीत. 2017 मध्ये अशाच एका ट्रेकर ट्रेलरमध्ये वॉलमार्ट स्टोअरच्या बाहेर 10 लोकांचे मृतदेह सापडले होते.
सॅन अँटोनियोच्या दक्षिणेस दोन महामार्ग आहेत जे टेक्सासच्या सीमाभातील शहरांकडे घेऊन जातात.
या परिसरात अनेक गावे आहेत. सॅन अँटोनियोच्या बाहेरील भागातही कचऱ्याचे ढीग आहेत. त्यामुळे या भागातून शांतपणे ट्रक घेऊन जाणे अवघड काम नाही.
या अपघाताची चौकशी करणारे यूएस सेक्रेटरी ऑफ होमलँड सिक्युरिटी अलेजांद्रो मेयोरकास म्हणाले, "मानवी तस्कर हे अतिशय निर्दयी आहेत. त्यांच्या मनात लोकांबद्दल आदर नाही. ते नफा कमावण्यासाठी स्थलांतरितांचा जीव धोक्यात घालतात."
स्थलांतरिताचा प्रश्न हा अमेरिकेत एक संवेदनशील विषय आहे. मे महिन्यात कोणत्याही कागदपत्रांशिवाय अमेरिकेत प्रवेश करताना सुमारे 2 लाख 39 हजार लोकांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यापैकी अनेकांनी अत्यंत जोखमीच्या मार्गाने अमेरिकेत प्रवेश केला आहे.
गेल्या वर्षी लाखो लोकांना बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश केल्याबद्दल ताब्यात घेण्यात आले होते. यातील बहुतेक लोक मध्य अमेरिकन देश - होंडुरास, ग्वाटेमाला आणि एल साल्वाडोर मधील होते.
मध्य अमेरिकेतील गरिबी आणि हिंसाचारातून पळ काढत हे लोक चांगल्या आयुष्याच्या शोधात अमेरिकेत येण्याचा प्रयत्न करत आहेत. यातील बहुतेक लोक अमेरिकेची सीमा ओलांडण्यासाठी मानवी तस्करांना मोठ्या प्रमाणात पैसे देतात. गेल्या काही वर्षांत अशा प्रकारांमध्ये अनेक लोक मरण पावले आहेत, परंतु आतापर्यंत कोणत्याही घटनेत इतके लोक मरण पावले नाहीत.
एका स्थानिक पत्रकाराने बीबीसीला सांगितले, "ही एक मानवी तस्करीची घटना असल्याचे दिसते. अमेरिकेच्या इतिहासातील ही सर्वात क्लेशकारक घटना आहे."