1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 10 ऑगस्ट 2023 (22:45 IST)

चॉकलेटमध्ये दबलेलं माणसाचं बोटं, एका महिलेकडून ते खाल्लं गेलं आणि

सूचना- या बातमीतले तपशील विचलित करू शकतात.
 
श्रीलंकेतील एका महिलेच्या चॉकलेटमध्ये मानवी बोट आढळल्याच्या बातमीने मोठी खळबळ उडाली आहे.
 
ही घटना श्रीलंकेच्या उवा प्रांतातील महाआंगणी भागात घडली आहे.
 
यासंदर्भात बीबीसी तमिळने महाआंगणी रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी डॉ. सहान समरवीरा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की, रुग्णालयाच्या 'ईसीजी' विभागात काम करणाऱ्या एका महिलेने रुग्णालयाच्या कॅफेटेरियातून (कॅन्टीन) चॉकलेट विकत घेतले होते.
 
तपासणी करणाऱ्या आरोग्य निरीक्षकांपैकी एक असलेल्या सलमान यांनी बीबीसी तमिळशी बोलताना सांगितलं की, "तिने 3 तारखेला स्थानिक पातळीवर उत्पादित होणारं चॉकलेट विकत घेतलं होतं. यातला काही भाग तिने खाल्ला आणि उरलेलं चॉकलेट रेफ्रिजरेटरमध्ये ठेऊन दिलं. त्यानंतर शनिवारी (5 ऑगस्ट) तिने ते चॉकलेट पुन्हा खायला घेतलं."
 
"चॉकलेट चावत असताना तिच्या तोंडात काहीतरी कठीण भाग आला. तिला वाटलं चॉकलेटमध्ये एखादं ड्रायफ्रूट असावं म्हणून तिने तो जोराने चावला."
 
"पण त्यानंतर त्याची चव पाहून ते काहीतरी वेगळं असल्याचं तिला जाणवलं. तिने तोंडातून ते बाहेर काढून पाहिलं तर ते एक मानवी बोट होतं."
 
यानंतर तिने या संदर्भात महाआंगणी वैद्यकीय अधिकारी कार्यालयात जाऊन तक्रार केली.
 
त्यानंतर या संदर्भात कारवाई करणाऱ्या सार्वजनिक आरोग्य निरीक्षकांनी परिसरातील दुकानांमधून त्या प्रकारचे सर्व चॉकलेट्स जप्त केले. मानवी बोट सापडलेल्या चॉकलेटच्या कागदावर निर्मितीची जी तारीख होती, त्या तारखेला तयार झालेले सर्व चॉकलेट ताब्यात घेतले गेले आहेत.
 
यासंदर्भात सार्वजनिक आरोग्य निरीक्षकांनी सोमवारी (7 ऑगस्ट) महाआंगणी दंडाधिकारी न्यायालयात अहवाल सादर केला आहे.
 
या सगळ्या प्रकरणावर सार्वजनिक आरोग्य निरीक्षक सलमान पॅरिस म्हणाले की, चॉकलेटमध्ये आढळलेला पदार्थ मानवी बोटच आहे का? याची वैज्ञानिकदृष्ट्या पडताळणी करण्यासाठी तो पदार्थ कोलंबो प्रयोगशाळेत पाठवला जाईल.
 
सध्या तो जप्त केलेला पदार्थ महाआंगणी आरोग्य कार्यालयातील रेफ्रिजरेटरमध्ये सुरक्षित ठेवण्यात आला आहे.
 
प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर याप्रकरणी औपचारिक गुन्हा दाखल करण्यात येईल, असं सलमान यांनी सांगितलं.
 
याबाबत महाआंगणी येथील आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सहान समरवीरा यांनी बीबीसी तमिळशी बोलताना सांगितलं की, "एखाद्या खाद्यपदार्थात मानवी बोट सापडणं ही एक गंभीर बाब आहे. ही चॉकलेट उत्पादक कंपनीची चूक आहे यात काही शंका नाही. यासंदर्भात न्यायालयाला कळवलं असून तिथेच निर्णय घेतला जाईल."
 
या चॉकलेटमध्ये मानवी बोट सापडल्याची माहिती ज्या दिवशी प्रसिद्ध झाली त्या दिवशी त्या चॉकलेट कंपनीच्या विक्री प्रतिनिधींनी महाआंगणी आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात येऊन माहिती घेतली.
 
नंतर संबंधित चॉकलेट बनविणाऱ्या कारखान्यातील लोकांनीही माहिती घेऊन आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयात धाव घेतली.
 
सार्वजनिक आरोग्य निरीक्षक सलमान पॅरिस यांनी या प्रकरणाबाबत माहिती देताना सांगितलं की, "श्रीलंकेत अशी घटना पहिल्यांदाच घडली आहे. यापूर्वी अन्नपदार्थांमध्ये कीटक आढळून आले आहेत. पण अन्नपदार्थात मानवी अवयव सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे या संदर्भात कोणत्या उपाययोजना करता येतील यावर आम्ही सल्लामसलत करत आहोत."