गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 8 ऑगस्ट 2023 (16:03 IST)

दगड मातीच्या ढिगाऱ्यात जन्म, अपहरणाची भीती... एका ‘चमत्कार’ ठरलेल्या बाळाची कहाणी

Afra
फेथी बेनीसा
आफ्रा दगड मातीच्या ढिगाऱ्यात सापडली होती. सीरियातल्या झालेल्या भूकंपात कोसळलेल्या एका इमारतीत सापडली ती. तिची नाळही कापली गेली नव्हती, आईच्या पोटाशी जोडलेली होती. तिच्या आईचा मृत्यू झाला होता. फेब्रुवारी महिन्यात या नवजात बाळाला दगड मातीच्या ढिगाऱ्यातून जिवंत बाहेर काढण्याचा व्हीडिओ व्हायरल झाला होता.
 
तेव्हापासून तिच्यावर उपचार चालू होते आणि आता आफ्राची तब्येत सुधारली आहे आणि ती सहा महिन्यांची गुटगटीत बाळ झालीये.
 
तिची आत्या आणि आत्याचा नवरा तिला वाढवत आहेत. या दांपत्याला स्वतःची सात मुलं आहेत. सीरियाच्या जिंदारीस गावात ती लहानची मोठी होतेय.
 
“ती अजून छोटुशी आहे, पण तिला बघितलं की मला माझ्या भावाची आणि तिच्या बहिणीची नावाराची आठवण होते. विशेषतः तिचं हास्य तर अगदी नावारासारखं आहे,” तिच्या आत्याचे पती खलील-अल-सावादी म्हणतात. ते झोका देत असतात.
 
आफ्राच्या बहिणीचाही या भूकंपात मृत्यू झाला होता.
 
“आफ्राचे आईवडील आणि बहीण आमच्याकडे अनेकदा यायचे, आमच्यासोबत वेळ घालवायचे.”
 
6 फेब्रुवारी 2023 ला दक्षिण-पूर्व टर्की आणि उत्तर सीरियात शक्तीशाली भूकंप झाला. या विध्वंसकारी भूकंपात जवळपास 44 हजार लोकांचे प्राण गेले होते. याच भूकंपाचे झटके बसत असताना आफ्राच्या आईला प्रसुती कळा सुरू झाल्या आणि तिने दगड मातीच्या ढिगाऱ्याखाली आफ्राला जन्म दिला.
 
बचावपथक त्यांच्यापर्यंत पोहचायच्या आत आफ्राच्या आईचा मृत्यू झाला. पण आफ्रा नवजात बाळ असूनही वाचली. या भूकंपात आफ्राचे आईवडील, तिची चार भावंडं सगळ्यांचा मृत्यू झाला, एकटी आफ्रा वाचली.
 
खलील सांगतात, “आमच्या डोळ्यादेखत अबू रुदैनाचं (आफ्राच्या वडिलांचं) घर कोसळलं. माझी बायको ते बघून किंचाळायला लागली – माझा भाऊ... माझा भाऊ…”
 
आफ्राला वाचवलं तो दिवस खलील यांना स्पष्ट आठवतो. ते सांगतात, “घराचं छत कोसळलं होतं. कोणीतरी मला बोलावलं आणि सांगितलं की त्यांना ढिगाऱ्याखाली एका महिलेचा मृतदेह सापडला आहे. मी तातडीने तिथे गेलो आणि दगड मातीच्या ढिगाऱ्यात खणायला सुरुवात केली. मला एक हलकासा आवाज ऐकू आला. आफ्राचा आवाज होता तो. तिची नाळ अजूनही तिच्या आईशी जोडलेली होती.”
 
“तिला काहीही करून वाचवायचा निश्चय आम्ही केला कारण तिच्या संपूर्ण कुटुंबाची ती एकमेव आठवण उरली होती,” खलील पुढे म्हणतात.
 
आफ्राला वाचवण्याचा थरारक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ढिगाऱ्यातून वाचवलेल्या या बाळाला आधी आया असं नाव दिलं होतं ज्याचा अरेबिक भाषेत अर्थ होतो – चमत्कार.
 
तिला दवाखान्यात नेल्यावर डॉक्टरांना तिच्या शरीरावर जखमा आढळून आल्या. तिचा श्वास जवळपास बंद झाल्यात जमा होता. पण आता सहा महिने उलटून गेल्यावर तिच्या शरीरावरच्या जखमा बऱ्या झाल्या आहेत आणि त्याचे व्रणही पुसट झालेत.
 
खलील म्हणतात, “भूकंप झाल्यानंतर तिच्या फुफ्फुसाला त्रास होत होता कारण तिच्या शरीरात खूप धूळ गेली होती पण आता तिची प्रकृती सुधारली आहे आणि ती 100 टक्के बरी झालीये.”
 
पण गेले सहा महिने या कुटुंबासाठी कठीण होते. जेव्हा आफ्रा हॉस्पिटलमध्ये होती तेव्हा जगभरातल्या हजारो लोकांनी तिला दत्तक घेण्याची इच्छा दर्शवली. त्यामुळे खलील आणि त्यांची पत्नी हाला यांना सिद्ध करावं लागलं की ते आफ्राचे नातेवाईक आहेत.
 
“आफ्राला आमच्याकडे द्यावं अशी त्यांची इच्छा नव्हती बहुधा,” ते म्हणतात.
 
हाला यांना आफ्रा त्यांची भाची आहे हे सिद्ध करण्यासाठी डीएनए टेस्टही करावी लागली.
 
त्या टेस्टच्या रिझल्टसाठी त्यांनी 10 दिवस वाटही पाहिली.
 
आफ्रा जिवंत वाचली या चमत्कारामुळे आफ्रात अनेकांना खूप रस होता. त्यामुळे खलील आणि हाला यांना भीती होती की तिला दवाखान्यातून कोणी पळवून नेईल.
 
ते जितकं शक्य होईल तितका वेळ हॉस्पिटलमध्येच थांबायचे. “नागरी आणि सैन्य पोलिसांनी आफ्राचं संरक्षण करण्यात आमची मदत केली. तिच्या बंदोबस्तासाठी मोठी कुमक होती. ते तिच्या शेजारच्या खोलीत थांबायचे आणि दिवसरात्र पहारा द्यायचे,” खलील म्हणतात.
 
डीएनए टेस्टमधून सिद्ध झालं की हाला आफ्राच्या रक्ताच्या नातेवाईक आहेत, तिच्या आत्या आहेत. मग आफ्राला या दांपत्यांच्या ताब्यात देण्यात आलं.
 
तिला घरी आणल्यानंतर खलील आणि हाला यांनी पहिल्यांदा तिचं नाव बदललं. आया वरून आफ्रा केलं. आफ्रा तिच्या आईचं नाव होतं.
 
”ती मोठी झाली की मी तिला काय घडलं ते सांगेन. तिच्या आईवडिलांचे, भावंडांचे फोटो दाखवेन. भूकंपाच्या दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांना हज इस्कंदर नावाच्या गावातल्या एका सामुहिक दफनभूमीत दफन केलं,” ते म्हणतात.
 
आफ्राची आई गरोदर होती त्याच सुमारास हालाही गरोदर होत्या. आफ्राच्या जन्मानंतर तीन दिवसांनी त्यांनाही मुलगी झाली. त्यांनी तिचं नाव आता ठेवलं आहे. या भूकंपात हाला यांच्या आणखी एक बहिणीचा मृत्यू झाला, तिच्या नावावरून त्यांनी आपल्या मुलीचं नाव आता ठेवलं.
 
जिंदारीसमधलं या कुटुंबाचं घर नष्ट झालं आहे. तिथे आता हे लोक राहू शकत नाहीत. “त्या घराला मोठे मोठे तडे गेलेत आणि तिथे राहाणं सुरक्षित नाही. त्या भूकंपात माझं घर, कार, मालमत्ता सगळं गेलं. आता आम्ही रस्त्यावर आलो आहोत. मी माझ्या मुलांना शाळेतही पाठवू शकत नाही,” खलील म्हणतात.
 
हे कुटुंब एका पुनर्वसन शिबिरात दोन महिने राहात होतं. “आमचं आयुष्य अत्यंत कठीण होतं. प्रचंड उकाडा होता आणि दोन दोन लहान बाळांची आम्हाला काळजी घ्यायची होती,” ते म्हणतात.
 
पण शेवटी या कुटुंबाला भाड्याने एक घर राहायला मिळालं. पण तिथेही फारकाळ राहाता येणार नाही अशी या कुटुंबाला भीती आहे. “एकतर हे खूप महाग आहे, त्यात घरमालकाला ते परत हवंय, त्यामुळे आम्हाला इथेही फारकाळ राहाता येणार नाही,” खलील सांगतात.
 
लोकांनी त्यांना दुबईत किंवा यूकेत स्थायिक होण्यास सांगितलं, त्यासाठी मदतही देऊ केली पण जर त्या देशांमध्ये गेलो तर आफ्राला आपल्यापासून हिरावून घेतलं जाईल अशी या कुटुंबाला भीती आहे.
 
खलील म्हणतात की जिंदारीसमध्ये आमच्याहीपेक्षा वाईट अवस्थेत लोक राहात आहेत.
 
खलील आणि हालाच्या गावात भूकंपाचा भयानक फटका बसला. हजारो कुटुंब उघड्यावर आली.
 
उत्तर पश्चिम सीरियात 4500 लोक भूकंपात मारले गेले. यूएनच्या एका आकडेवारीनुसार इथे जवळपास 50 कुटुंब निर्वासित झाली.
 
सीरियाच्या या भागावर तिथल्या बंडखोरांचं वर्चस्व आहे. त्यामुळे इथल्या पीडित लोकांपर्यंत मदत पोहचवणं अतिशय अवघड झालेलं आहे. देशात 12 वर्षं चाललेल्या गृहयुद्धामुळे इथले हजारो लोक आधीच परागंदा झालेले आहेत.