गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 31 मार्च 2023 (18:28 IST)

हिंदू देवतांचं घर असलेल्या पर्वतावर नग्न फोटो, बालीतून पर्यटकाला हाकललं

bali Indonesian
इंडोनेशियातील बाली येथे एका पर्वतावर नग्नावस्थेत फोटो काढले म्हणून एका रशियन व्यक्तीला तातडीने परत पाठवण्यात येणार आहे.
 
माऊंट अगुन्ग या पर्वतावर या व्यक्तीने एक फोटो पोस्ट केला. त्यात त्याने त्याची पँट घोट्यापर्यंत खाली घेतली होती. हा फोटो लगेच व्हायरल झाला.
 
युरी असं या व्यक्तीचं नाव आहे. त्याने त्याच्या कृत्याबद्दल माफी मागितली आहे. इंडोनेशियात येण्यापासून त्याला सहा महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे.
 
असं विचित्र वागणाऱ्या परदेशी पर्यटकांना गेल्या काही काळापासून चाप लावण्याचा प्रयत्न बालीमध्ये करण्यात येत आहे.
 
माऊंट अगुन्ग हा या बेटावरचा सर्वोच्च बिंदू आहे. ते हिंदू देवांचं घर असल्याचं मानण्यात येतं.
 
“ही वागणूक अजिबात स्वीकारार्ह नाही,” असं इथल्या स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्याने सांगितलं.
 
“त्याने नियमांचा भंग केला आणि त्याला आमच्या संस्कृतीबद्दल काहीही आदर नाही,” असं बालीच्या कायदा आणि मानवाधिकार विभागाचे प्रमुखे अनगियात नापिटुपूलू यांनी 'जकार्ता पोस्ट'ला सांगितलं
 
इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या एका व्हीडिओमध्ये युरी म्हणतो, “माझं कृत्य अजिबात माफीच्या लायकीचं नाही. माझ्या निष्काळजीपणामुळे असं झालं आहे.”
 
नंतर त्याने या पर्वताच्या शुद्धीकरण कार्यक्रमातही भाग घेतला. अशा घटना झाल्या की स्थानिक लोक ही प्रक्रिया करतात.
 
विजिया हे बाली येथील मानद वाणिज्यदूत आहेत. त्यांनी सीनएनएनला सांगितलं की, तो प्रवासी वेडसरच होता. त्याला परत पाठवणं हा योग्य निर्णय आहे. सोशल मीडियावर अनेक स्थानिकांनी सुद्धा या निर्णयाला पाठिंबा दिला.
 
यापूर्वीही अशा घटना झाल्या आहेत. गेल्या वर्षी कॅनडियन अभिनेता जेफ्री क्रॅगेन यांना इंडोनेशियातून कॅनडाला परत पाठवण्यात आलं. कारण त्यांनी माऊंट बातूर येथे नग्नावस्थेत नृत्य करतानाचा व्हीडिओ व्हायरल झाला होता.
 
2021 पासून माऊंट बातूर येथे एक जोडपं सेक्स करतानाचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. हा पर्वत बालीमधलं एक पवित्र ठिकाण मानण्यात येतं.
 
जकार्ता पोस्टने दिलेल्या बातमीनुसार परदेशी पर्यटकांशी निगडीत असलेल्या प्रकरणात कोणतीही हयगय केली जाणार नाही असं इथल्या एका अधिकाऱ्याने सांगितलं.
 
या महिन्याच्या सुरुवातीला प्रशासनाचं म्हटलं होतं की ते पर्यटकांना मोटरबाईक वापरण्यावर बंदी घालणार आहेत. कारण कायदा मोडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
 
बालीचे गव्हर्नर वेय्न कोस्टेर यांनी घोषणा केली की, रशिया आणि युक्रेनमधून येणाऱ्या पर्यटकांना On Arrival Visa बंद करणार आहेत. कारण युद्धामुळे अनेक लोक इथे येत आहेत मात्र कायदा पाळत नाहीत.
 
अतिरेकी पर्यटनामुळे या पर्वतावर मर्यादित पर्यटकांना पाठवण्यात येणार असल्याचं तिथल्या प्रशासनाचं म्हणणं आहे.
 
मात्र नियम जास्त कडक केलं तर पर्यटनावर परिणाम होईल अशी भीतीही इथल्या स्थानिकांना वाटत आहे. कारण बालीचा 60 टक्के व्यापार हा पर्यटनावर अवलंबून आहे.
 
बालीमध्ये सगळ्यात जास्त पर्यटक ऑस्ट्रेलियामधून येतात. जानेवारी 2023 मध्ये फक्त ऑस्ट्रेलियामधून 91000 ऑस्ट्रेलियन लोक बालीत आले होते. त्याखालोखाल रशियाच्या पर्यटकांचा समावेश आहे. एकूण 22000 रशियन पर्यटक मागच्या महिन्यात आले होते.
Published By -Smita Joshi