गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Updated : मंगळवार, 2 जानेवारी 2024 (16:07 IST)

टोकियोत विमानानं घेतला पेट, धावपट्टीवर उतरताच आगीचा भडका, सगळे 379 प्रवासी सुरक्षित

जपानची राजधानी टोकियोमध्ये विमानतळावर एक प्रवासी विमानानं अचानक पेट घेतला आहे.
जपान एयरलाईन्सचं JAL 516 हे विमान मंगळवारी (2 जानेवारी 2023) संध्याकाळी टोकियोच्या हानेडा विमानतळावर उतरत होतं. रनवेवर उतरत असताना त्यानं पेट घेतल्याची माहिती मिळत आहे.
 
जपानच्या NHK वृत्तवाहिनीवरील फुटेजमध्ये विमानाखालून आणि विमानाच्या खिडक्यांमधून आग येताना दिसली आणि नंतर संपूर्ण विमानानंच पेट घेतला. रनवेच्या काही भागावरही आग पसरली.
 
टोकियोमध्ये बीबीसीच्या प्रतिनिधींना मिळालेल्या माहितीनुसार या विमानात किमान 367 प्रवासी होते आणि ते सर्व सुखरुपपणे बाहेर पडल्याचं समजतंय.
 
अधिकाऱ्यांनी NHKला दिलेल्या माहितीनुसार रनवेवर उतरताना या विमानाची कोस्ट गार्डच्या एका विमानाशी टक्कर झाली.
 
अग्निशमन दलाचे कर्मचारी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. आगीमुळे विमानाच्या शेपटीकडचा भाग नष्ट झाला आहे.
 
विमानाला आग कशानं लागली याचा तपास सुरू आहे.
 
या विमानानं 516, न्यू चितोसे विमानतळावरून उड्डाण केलं होतं आणि स्थानिक वेळेनुसार 17:40 वाजता (भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजून 10 वाजता) हानेडा विमानतळावर ते उतरणार होतं.
 
या दुर्घटनेनंतर हानेडा विमानतळावरचे सगळे रनवे बंद करण्यात आले आहेत.
 
हानेडा विमानतळ टोकियोतल्या दोन मुख्य विमानतळांपैकी एक आहे. तसंच जपान एयरलाईन्स आणि निप्पॉन एयरलाईन्स या जपानमधल्या मुख्य एयरलाईन्सचा मुख्य तळ इथेच आहे.
 
फक्त जपानमधली देशांतर्गत हवाई वाहतूकच नाही तर आंतरराष्ट्रीय वाहतुकीच्या दृष्टीनंही हा विमानतळ महत्त्वाचा आहे. पूर्व आणि आग्नेय आशियातील महत्त्वाच्या शहरांना हाच विमानतळ जपानशी जोडतो.
 
साहजिकच इथे झालेल्या अपघाताचा परिणाम आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीवरही होईल.
 
आदल्या दिवशीच जपानला भूकंपाचा मोठा धक्का बसला होता आणि त्यानंतर 24 तासांनी हा अपघात घडला आहे.
 
 
Published By- Priya Dixit