शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 18 डिसेंबर 2023 (17:02 IST)

एक विमान अपघात, बर्फाळ प्रदेशात 72 दिवस आणि मृत साथीदारांचं मांस खाऊन जगवलेला जीव

helicopter crash
‘आमच्याकडे कुठलाच पर्याय शिल्लक राहिला नव्हता, तेव्हा आम्ही मृत व्यक्तींना कापून त्यांचं मांस खायला सुरूवात केली.’
जगातील एका भयानक अपघाताचं वर्णन करताना एका रग्बी खेळाडूने त्याच्या पत्रात लिहिलेलं हे वाक्य आहे.
 
उरुग्वेच्या मॉन्टेव्हिडियो ओल्ड ख्रिश्चन क्लबचे रग्बी खेळाडू विविध देशांतील संघांमधील स्पर्धेत भाग घेण्यासाठी 13 ऑक्टोबर 1972 रोजी त्यांचे मित्र आणि कुटुंबियांसह चिलीची राजधानी सॅंटियागोहून निघाले.
 
गुस्तावो कोको निकोलिच हा त्यापैकी एक होता. त्यावेळी तो 20 वर्षांचा होता. तो ज्या उरुग्वेयन हवाई दलाच्या विमानाने प्रवास करत होता ते अँडीज पर्वतरांगेत कोसळलं.
 
विमान वाहतुकीच्या इतिहासात हा अपघात कायमचा नोंदवला गेला आणि अपघाताची बातमी समोर आल्यानंतर जग हादरून गेलं.
 
या अपघातात विमानाचे दोन तुकडे झाले. समुद्रसपाटीपासून 3500 मीटर उंचीवर असलेल्या अँडीज पर्वतरागांना आदळून विमान कोसळलं.
 
याप्रसंगी काहींना आपले प्राण गमवावे लागले तर अनेकांनी अत्यंत कठीण प्रसंगातून आपला जीव वाचवला.
 
माणसांच्या जगापासून दूर कुठेतरी, दिवसा अत्यंत कमी तापमान आणि रात्रीच्या वेळी असह्य थंडी आणि बर्फामध्ये काही लोक 72 दिवस जीवन-मरणाची लढाई लढत होते.
 
विमानामधील 40 प्रवाशांपैकी बहुतेकजण रग्बी खेळाडू, त्यांचे कुटुंबीय आणि मित्र होते. त्यांच्याव्यतिरिक्त पाच विमान कर्मचारी होते.
 
कोको निकोलिच याने दोन पत्रांमध्येही अपघाताचं वर्णन केलंय, ज्यामध्येही स्वजातिभक्षणचा उल्लेख आहे. स्वजातिभक्षक म्हणजे स्वत:चा जीव वाचवण्यासाठी मेलेल्या माणसांचं मांस खाणे.
 
बर्फाळ प्रदेशात स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी आपल्या मृत साथीदारांचं मांस खाल्लं. निकोलिचच्या पत्रांमधून हा तपशील प्रकाशझोतात आला.
‘एखाद्याचा जीव वाचवायचा असेल तर…
 
निकोलिच पत्रात लिहितो: ‘अशी वेळ आमच्यावर येऊ नये म्हणून मी देवाकडे प्रार्थना केली. पण ती वेळ आली. आता त्याला धैर्याने आणि विश्वासाने सामोरं जायचं होतं. आम्ही विश्वास का म्हणालो? तर आमच्यासमोर मृतदेह आहेत, देवानेच ते तिथे ठेवले आहेत, असा आमचा विश्वास आहे. पण जेव्हा आत्म्याचा प्रश्न येतो तेव्हा माझा त्यावर विश्वास बसत नाही आणि त्यामुळे पश्चात्ताप करण्याची गरज नसते.’
 
त्याने लिहिलं: 'जर एखादा असा दिवस आला की दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी मला माझ्या शरीराचा वापर करावा लागणार आहे, तर मी तो आनंदाने करेन.
 
अपघातावर आधारित 'सोसायटी ऑफ द स्नो' हा स्पॅनिश भाषेतील चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन स्पॅनिश दिग्दर्शक जे. ए. बायोना यांनी केलंय.
 
या अपघातात वाचलेल्यांपैकी एका व्यक्तीचा मित्र असलेल्या पत्रकार पाब्लो वर्सी यांनी 2008 साली याच नावाने लिहिलेल्या पुस्तकावर आधारित हा चित्रपट बनवण्यात आलाय. वर्सी या चित्रपटाचा सहनिर्माता देखील आहे.
 
लॅटिन अमेरिका आणि स्पेनमध्ये प्रदर्शित होणारा हा चित्रपट 4 जानेवारीला नेटफ्लिक्सवर दाखवण्यात येणार आहे.
'सोसायटी ऑफ द स्नो' चित्रपटाला ‘गोल्डन ग्लोब 2024’ मध्ये सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपटासाठी नामांकन मिळालंय. या चित्रपटाला स्पेनमधून ऑस्करसाठीही नामांकन मिळालंय.
 
हा चित्रपट बनवण्यासाठी जे. ए. बायोना यांनी 2011 पासून अपघातातून वाचलेल्या लोकांशी अनेकदा संवाद साधला आहे. या चित्रपटातील बहुतांश कलाकार अर्जेंटिना आणि उरुग्वे येथील आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर ते फारसे लोकप्रिय नाहीत.
निकोलिचने त्याच्या पालकांना आणि मैत्रिणीला दोन पत्र लिहिली.
 
निकोलिच हा ओल्ड ख्रिश्चन क्लबच्या रग्बी खेळाडूंपैकी एक होता. तर स्टेला मार्स ही खाजगी कॅथलिक शाळेच्या माजी विद्यार्थ्यांपैकी एक होती. तो चिलीच्या मोठ्या मुलांसोबत खेळायला गेला होता.
 
गुस्तावो निकोलिचला लिहायला आवडायचं. त्यामुळे त्या अपघाताबाबतच्या नोंदी तो पत्रांद्वारे करत राहिला.
 
दोन पत्रांपैकी एक पत्र त्याच्या पालकांना आणि तीन भावांना लिहिलेलं, तर दुसरं पत्र खास प्रेससीला लिहिलं होतं. या पत्रांमध्ये काही मुद्दे त्याने अतिशय संवेदनशीलपणे पद्धतीने समजावून सांगितलेले. विशेष म्हणजे पत्राच्या सुरुवातीला हिमस्खलनाचं अतिशय सुंदर वर्णन करण्यात आलं आहे.
 
तो लिहितो की, ‘आजूबाजूला फक्त बर्फच बर्फ आहे आणि या सुंदर वातावरणाचं वर्णन शब्दात करता येणार नाही. आपल्या सर्वांना माहिती आहे की जर तो बर्फ वितळू लागला तर त्याचं सरोवरात रुपांतर होईल.
 
फ्लाइट 571 मध्ये 45 प्रवासी होते. अपघाताच्या दिवशी 18 जण मृत्यूमुखी पडले.
 
21 ऑक्टोबर 1972 हा तो दिवस होता. त्यांनी अजून प्रेतं खायला सुरुवात केली नव्हती. मात्र त्यानंतर विमानातील अन्नपदार्थ संपल्यानंतर काहींनी मृत व्यक्तींचं मांस खाऊन स्वत:चा जीव वाचवला.
 
मार्ग बदलण्याबाबत पत्रात काय लिहिलंय?
निकोलिचने पत्रात विमान वळवण्याबाबत नमूद केलंय. त्या दिवशी हवामान चांगलं नव्हतं, असं त्याने लिहिलंय. त्यामुळे पायलट आणि सहवैमानिकांनी थेट सॅंटियागोला न जाण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्यांना सर्वांत कठीण मार्गाने दक्षिणेला प्रवास करायचा होता. जिथे पर्वतरांगा ओलांडायच्या होत्या.
 
निकोलिचने लिहिलंय: 'आम्ही कसे वाचलो याची तुम्ही कल्पना करू शकता का? होय, विमान कोसळेपर्यंत सर्व काही ठीक होतं. त्यावेळी आमचं विमान फार मोठं नव्हतं, पण सुखरूप राहण्यासाठी ती एक चांगली जागा होती.
 
आमच्याकडे पाणी होतं. सुदैवाने कोस्टामारचा एक कॅन, दोन कॅन कँडी, तीन कॅन मासे, काही चॉकलेट आणि व्हिस्कीच्या दोन बाटल्या होत्या. होय, ते अन्न आमच्यासाठी पोषक नव्हतं, परंतु ते जगण्यासाठी पुरेसं होतं.’
 
एका प्रवाशाकडे काहीच खायला नव्हतं, त्याने तीन दिवस फक्त एका शेंगदाण्याच्या चॉकलेटवर आपली भूक भागवली. पहिल्या दिवशी त्याने आतल्या शेंगदाण्याच्या वरचं चॉकलेट खाल्लं आणि शेंगदाणा खिशात लपवला. दुसऱ्या दिवशी त्याने शेंगदाण्याचे दोन तुकडे केले आणि एक अर्धा भाग दुसऱ्या दिवशी आणि उरलेला भाग तिसऱ्या दिवशी खाल्ला.
 
वेदना आणि दुःखातही दृढनिश्चय
निकोलिचने आपल्या पत्रांमध्ये विमान अपघातानंतर पहिल्या दिवशी झालेल्या वेदनांचं वर्णन केलंय.
 
तो लिहितो: 'मी या थंडीत मरतोय. मला ती सहन होत नाहीए. माझा खेळाडू मित्र रोमन मोन्चो सिबेलाला मी सांगितले की मी अनंतात विलिन होतोय. आमच्या शेजारी एक मृतदेह पडलेला आहे. ते शरीर कोणाचं आहे हे आम्हाला माहीत नाही. सीट आणि लोखंडाच्या मध्ये एक माणूस मरून पडलाय.'
 
मोन्चो निकोलिचला ओरडतो आणि त्याला जोरात लाथ मारतो, ज्यामुळे निकोलिचच्या शरीराचं तापमान किंचित वाढतं. पुढील काही दिवस शरीराला उबदार ठेवण्यासाठी ते एकमेकांना अशाच लाथा मारत राहतात.
 
शरीराला उबदार ठेवण्यासाठी ते एकमेकांचे हात घट्ट पकडायचे, तर कधी हात खिशात टाकून बसायचे आणि जोरजोरात श्वास घ्यायचे.
या गोष्टी केल्याने हळूहळू थोडसं बरं वाटायला लागल्याचं त्याने सांगितलंय.
 
या पत्रात त्याने आपल्या कुटुंबावर किती प्रेम आहे हे सांगितलंय. त्याने लिहिलंय की जर त्याला मॉन्टेव्हिडिओला परत येण्याचं भाग्य लाभलं तर तो त्याच्या प्रेयसीसोबत लग्न करेल, अर्थात तिची परवानगी असेल तरंच.
 
तो लिहितो: 'मी त्यापलिकडे विचार करू शकत नाही. कारण कुणाचंतरी रडणं ऐकू येतंय. तो म्हणाला "रडू नकोस, त्याने तुझ्या शरीरातलं पाणी कमी होईल." आश्चर्यच आहे, नाही का.
 
निकोलिचच्या दुसऱ्या पत्रात काय आहे?
निकोलिचने दुसरं पत्र मुख्यत: त्याची प्रेयसी रोझिना मकाइटलीला लिहिलेलं. त्याने या पत्रात लिहिलेलं की, आजचा दिवस खूप छान होता. सूर्य उगवला आहे आणि त्याची किरणं आमच्यावर पडत आहेत.'
 
त्याने लिहिलंय की अनेक लोक निराश झाली असली तरी ती निराश नाहीत. त्याने सांगितलं की तो जे पाहतोय, जर तो त्याबद्दल विचार जरी करत असेल तर त्याचा अर्थ असा होतो की त्याच्याकडे काहीतरी अद्भूत शक्ती आहे.
 
तो लिहितो: 'आमच्याकडे असलेलं अन्न संपलंय. त्यामुळेही सर्वांची निराशा झालेय. आमच्याकडे सीफूडचे फक्त दोन कॅन, व्हाईट वाइनची बाटली आणि काही ग्रेनेडाइन (बकरीचं मांस आणि तांदूळ) आहेत. 26 लोकांना त्यावर आपली भूक भागवायची आहे, आमच्याकडे दुसरं काहीही नाही.'
 
निकोलिकने त्याच्या मैत्रिणीला देखील लिहिलं की त्याने अन्नासाठी काय काय केलं.
 
‘एका गोष्टीचं तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल की आज आम्ही माणसांचे मृतदेह खायला सुरुवात केली आहे. कारण आमच्याकडे दुसरा पर्याय नाहीए.
त्याने स्पष्ट केलं की, 'जर मी मेलो आणि काही लोक मला खाऊन जगले, तर इतरांना जगता यावं यासाठी माझी तयारी आहे.'
 
त्याने पुढे लिहिलं: 'मला पाहिल्यावर तुम्ही घाबराल. मी कसातरी दिसतोय, माझी दाढी वाढवलेली आहे, मी कुठेतरी अडकलोय, माझ्या डोक्याला मोठी दुखापत झाली आहे, माझ्या कपाळावर जखम आहे, माझ्या पायांवर, मानेवर, खांद्यावर किरकोळ जखमा आहेत, पण मी ठीक आहे.'
 
या शोकांतिकेबद्दल बोलताना त्याने घाबरून न जाता काही सकारात्मक बाबींचाही उल्लेख केला.
 
याच इच्छाशक्तीनेच त्याला जिवंत ठेवलं
 
शेवटी त्याने जगण्यासाठीच्या आशेचा उल्लेख केला. रॉबर्टो कॅनेसा आणि फर्नांडो पॅराडो हे रग्बी खेळाडू मदतीच्या आशेने दहा दिवस चालले. विमान दुर्घटनेनंतर 72 दिवसांनी डोंगरात अडकलेल्या 16 जणांना बचाव कर्मचाऱ्यांनी बाहेर काढलं.
 
विमान कुठे कोसळलं हे माहित नसलं तरी, बचाव पथक बरेच दिवस बर्फाळ पर्वतरांगांमध्ये बर्फाच्या ढिगाऱ्याखाली बेपत्ता प्रवाशांचा शोध घेत होते. कुठेही त्यांचा पत्ता लागत नसल्यामुळे, चिलीच्या हवाई बचाव पथकाच्या अधिकाऱ्यांनी बचाव कार्य स्थगित करत असल्याची घोषणा केली.
 
या दुर्घटनेत सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला, असं सर्वांना वाटत होतं.
 
तरिही, स्वत:चा जीव वाचवण्याचा निर्धार करून, रग्बी खेळाडूंनी रेडिओ प्रसारण ऐकता यावं यासाठी धातूच्या छोट्या तुकड्यापासून एक उपकरण विकसित केलं. रेडिओवरील प्रसारण निकोलिचने ऐकलं. तो धावतपळत गेला आणि त्याने आपल्या मित्रांना याबाबत सांगितलं.
 
तो म्हणाला: 'माझ्याकडे तुमच्यासाठी दोन बातम्या आहेत. एक चांगली बातमी, दुसरी वाईट बातमी. खेदाची गोष्ट म्हणजे त्यांनी आपला शोध घेणं थांबवलंय आणि आनंदाची बातमी अशी की आता जगायचं की मरायचं हे आपल्यावर अवलंबून आहे.'
 
अँडीज पर्वतातील एक आश्चर्य
दुसरीकडे चिलीमध्ये, गुस्तावो निकोलिचच्या वडिलांनी आपल्या मुलाचा कधीतरी शोध लागेल या आशेने शोध घेणं सुरूच ठेवलं.
 
डिसेंबर 1972 मधला तो दिवस होता. ख्रिसमस जवळ आला होता. त्या वेळी बातमी आली की काही उरुग्वेयन पर्वतरांगांच्या मध्यभागी दिसले आहेत. या बातमीने त्यांच्या कुटुंबियांना आशेचा किरण दिसला.
 
वाचलेल्या लोकांमध्ये गुस्ताव निकोलिच असल्याचं ऐकल्यानंतर, त्याची आई रॅकेल अरोसीना यांनी क्षणाचाही विलंब न करता सॅंटियागोला जाणारं पहिलं विमान पकडलं.
 
रॅकेल अरोसीना हॉस्पिटलमध्ये पोहोचताच लिफ्टचा दरवाजा उघडला आणि गुस्तावो झरबिनो दिसला. निकोलिचची आई मोठ्याने रडू लागली. यादीतील नाव आपल्या मुलाचं नाही हे त्यांच्या लक्षात आलं होतं.
 
गुस्ताव कोको निकोलिच आणि इतर सात जणांचा 29 ऑक्टोबर रोजी हिमस्खलनात मृत्यू झालेला.
 
गुस्तावो झरबिनोने त्यांचं सांत्वन केलं, त्याचं चुंबन घेतले आणि म्हणाला: 'तुमच्या मुलाने तुमच्यासाठी पत्र लिहिली आहेत.’
 
झरबिनोने मृतांच्या खिशातून गोळा केलेली पत्र आणि सामान त्यांच्या नातेवाईकांना दिलं.
 
'त्याला एवढंच करायचं होतं,’
 
झरबिनोला वाटलं की त्याला एवढंच करायचं आहे.
 
गुस्ताव निकोलिचने झरबिनोला सांगितलं की जर त्याचा मृत्यू झाला तर त्याने हे पत्र त्याच्या कुटुंबियांना द्यावं.
 
त्याचे पालक आणि कुटुंबातील सदस्यांनी ही पत्रे वाचली. त्याचा भाऊ अलेजांद्रोने बीबीसीला सांगितलं की, निकोलिचने काळजावर दगड ठेवून ही पत्र लिहिली होती.
 
'माझ्या भावाने जे काही केलं त्याचा मला अभिमान आहे. त्याने काय केलं हे मला माहीत आहे. त्याने स्वजातिभक्षणाबद्दल लिहिलंय आणि आम्हाला त्याची चांगलीच जाणीव आहे. म्हणून माझे वडील वाचलेल्या लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेल्यांपैकी एक आहेत.'
 
फेब्रुवारी 1973 मध्ये गुस्ताव निकोलिचचे वडिल दुसऱ्या मृत व्यक्तीच्या वडिलांसोबत पर्वतावर गेले. त्यांना आपल्या मुलाच्या अस्थी उरुग्वेमध्ये पुरायच्या होत्या.
 
माघारी आल्यानंतर त्यांच्यात काहीतरी बदल झाला होता. दुसऱ्या पत्रात लिहिलेला काही भाग त्यांनी लोकांसाठी सार्वजनिक केला.
 
वाचलेल्या काही लोकांपैकी काहीजण याबद्दल बोलले असले, तरी निकोलिचच्या पालकांनी स्वजातिभक्षण ही गोष्ट खाजगी ठेवली आहे.
 
निकोलिचच्या आईने ही दोन पत्र ड्रॉवरमध्ये सुरक्षितपणे लपवून ठेवली आहेत आणि त्या आता 96 वर्षांच्या आहेत.
 
Published By- Priya Dixit