गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 6 मे 2023 (19:28 IST)

ब्रिटनचे राजे चार्ल्स तृतीय यांचा राज्याभिषेक संपन्न, 'मी इथे सेवा करायला आलोय'

ब्रिटनचे नवे राजे चार्ल्स (तृतीय)यांचा राज्याभिषेक पूर्ण झाला आहे.
आर्चबिशपनी झुकून चार्ल्स तृतीय यांच्या प्रति आपला आदर व्यक्त केला. त्यांनी राजे चार्ल्स यांच्याप्रति निष्ठेची शपथ घेतली. क्वीन कॉन्सर्ट कॅमिला यांनाही यावेळी राज्याभिषेक करण्यात आला. त्यांना कोणती शपथ घेण्यास सांगितले गेले नाही. ब्रिटनच्या राजघराण्यात 1953 नंतर पहिल्यांदा राज्यारोहण सोहळा संपन्न झाला.
 
जगातल्या सर्वांत लक्षवेधी राजेशाहीचा थाट आणि त्याची तयारी काटेकोरपणे झाली होती.
 
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, युक्रेनचे पंतप्रधानांसह जगभरातून दिग्गज व्यक्ती या राज्यारोहण सोहळ्यासाठी उपस्थित होत्या.
 
राज्याभिषेक सोहळा कसा झाला संपन्न?
‘मी सेवा घ्यायला नाही, करायला आलो आहे’
राजे चार्ल्स (तृतीय) यांनी वेस्टमिन्स्टर अॅबेमध्ये बोलताना म्हटलं की, मी इथे सेवा घ्यायला नाही, तर सेवा करायला आलोय.
 
राज्याभिषेकादरम्यान राजे चार्ल्स यांना शपथ देण्यात आली. त्यांना विचारण्यात आलं की, तुमच्या कार्यकालात तुम्ही कायदा आणि चर्च ऑफ इंग्लंडची व्यवस्था राखणार का. यानंतर राजे चार्ल्स यांनी पवित्र गॉस्पेलवर हात ठेवून शपथ घेतली.
 
फक्त ब्रिटनमधले नागरिकच नव्हे तर जगभरातल्या अनेकांचं लक्ष ब्रिटनचे नवे राजे चार्ल्स (तृतीय)यांच्या राज्यारोहण सोहळ्याकडे लागलं होतं.
 
हा सोहळा अर्थातच प्रतिकात्मक असतो आणि यात धार्मिक विधींबरोबरच राजेशाही थाटाचा दिमाख पाहायला मिळतो.
 
किंग चार्ल्स यांचा हा औपचारिक राज्याभिषेक सोहळा येत्या 6 मे रोजी लंडनमधल्या वेस्टमिन्स्टर अॅबी इथे झाला.
 
इ.स. 1066 पासून चालत आलेल्या ब्रिटनच्या राजेशाहीतील चाळीसावे राजे म्हणून चार्ल्स विराजमान होतील.
 
या परंपरागत सोहळ्यात सगळ्या पूर्वापार चालत आलेल्या प्रथा परंपरा पाळल्या गेल्या. यातल्या काही प्रथांना तर हजार वर्षांचा इतिहास आहे.
 
सकाळी 6 वाजता
6 मे रोजी ब्रिटीश स्टँडर्ड टाइमनुसार सकाळी 6 वाजता (भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता) सोहळा सुरू होईल.
 
बकिंगहम पॅलेस म्हणजे राजांचे निवासस्थान ते वेस्टमिन्स्टर अॅबीपर्यंत मिरवणुकीने या सोहळ्याची सुरुवात होईल आणि हा संपूर्ण मिरवणूक मार्ग नागरिकांना सोहळा पाहण्यासाठी खुला असेल.
 
स्क्रीनवर ही मिरवणूक आणि सोहळा नागरिकांना पाहता यावा यासाठी लंडनची प्रसिद्ध उद्यानं- हाइड पार्क, ग्रीन पार्क आणि सेंट जेम्स पार्क इथे स्क्रीन लावण्यात आले आहेत.
 
बकिंगहम पॅलेसच्या बाहेर काही निमंत्रित पाहुण्यांसाठी स्टँड उभारण्यात आले आहेत. यामध्ये सैन्यातले पदाधिकारी, ब्रिटनच्या आरोग्य सेवेतले (NHS)मान्यवर आणि सामाजिक क्षेत्रातले इतर काही पाहुणे यांना जागा मिळेल.
 
हाउसहोल्ड कॅवेलरी या ब्रिटीश आर्मीतल्या प्रतिष्ठेच्या रेजिमेंटचे सोवरिन्स एस्कॉर्ट म्हणजे राजघराण्याच्या व्यक्तींच्या दिमतीला असलेले सुमारे 200 सदस्य या मिरवणुकीत सहभागी होतील. त्यांची शनिवारी सकाळपासूनच राजवाडा परिसरात हजेरी असेल.
 
याशिवाय सुमारे हजारभर सैनिक मिरवणूक मार्गावर तैनात असतील. पण तरीही 1953 च्या तुलनेत या वेळची मिरवणूक छोटेखानीच म्हणावी लागेल.
 
दिवंगत राणी एलिझाबेथ यांच्या राज्यारोहण सोहळ्याला कॉमनवेल्थ देशांतले पंतप्रधान आणि इतर अनेक राजघराण्यातले सदस्यही उपस्थित होते.
 
मिरवणूक
बकिंगहम पॅलेसपासून निघून मिरवणूक द मॉल नावाच्या प्रसिद्ध बाजारपेठेच्या बाजूने ट्रॅफलगार स्क्वेअरच्या दिशेने निघेल.
 
मग व्हाइटहॉल, पार्लमेट स्ट्रीट, पार्लमेंट स्क्वेअर आणि ब्रॉड सँक्च्युरी या मार्गाने थेम्स नदीकिनारी असलेल्या वेस्टमिन्स्टर अॅबीच्या पश्चिम द्वारापाशी मिरवणूक पोहोचेल.
 
आता परंपरेला धरून चालणाऱ्या या सोहळ्यात एक बदल मात्र यंदा होईल. राजे चार्ल्स आणि राणी कॅमिला गोल्ड स्टेट कोच या पारंपरिक बग्गीत (किंवा रथात म्हणू या)बसणार नाहीत तर डायमंड ज्युबिली स्टेट कोच या तुलनेने नव्या रथात विराजमान होतील. असं म्हणतात की, जुना रथ तेवढा आरामदायी नव्हता.
वेस्टमिन्स्टर अॅबीत आगमन
साधारण 11च्या सुमारास मिरवणूक वेस्टमिन्स्टर अॅबीमध्ये पोहोचण्याची अपेक्षा आहे. राजे चार्ल्स यांच्या पेहरावातही परंपरेला छेद देत थोडा बदल अपेक्षित आहे.
 
ते नेहमीच्या पारंपरिक रा़जांच्या सिल्क स्टॉकिंग आणि (झूल, झालर असलेल्या) ब्रीचेसच्या पेहरावाऐवजी मिलिटरी युनिफॉर्म परिधान करणार आहेत.
 
11 वाजता
किंग चार्ल्स अॅबीच्या पश्चिम द्वारातून प्रवेश करून चर्चच्या नेव्हजवळून थेट सेंट्रल स्पेसपर्यंत पोहोचतील.
 
अॅबीमधला धार्मिक सोहळा सकाळी 11 वाजता सुरू होईल. चर्च संगीताच्या नादात कार्यक्रम सुरू होतील.
 
त्यासाठी चार्ल्स यांनी 12 नव्या संगीत सुरावटी तयार करायला दिल्या होत्या. अँड्र्यू लॉइड वेबर यांची एक रचना त्यात आहे. शिवाय चार्ल्स यांचे वडील प्रिन्स फिलीप यांच्या स्मरणार्थ ग्रीक ऑर्थोडॉक्स म्युझिकची एक रचनाही असेल.
 
या सोहळ्यात किंग चार्ल्स यांचा नातू प्रिन्स जॉर्ज 'पेज ऑफ ऑनर' म्हणजे मानाच्या सुभेदारांपैकी एकाची भूमिका निभावणार आहे.
 
याशिवाय कॅमिला यांची नातवंडं - लोला, एलिझा, गुस, लुईस आणि फ्रेडी हेसुद्धा 'पेज ऑफ ऑनर' म्हणून मिरवणार आहेत.
 
अॅबीच्या आत किंग चार्ल्स यांच्या मागोमाग मिरवणुकीतून पोहोचणाऱ्या व्यक्ती राजघराण्याची शाही चिन्ह किंवा रिगेलिया आपल्याबरोबर आणतील.
 
या शाही वस्तू (रिगेलिया) चर्चच्या वेदीवर म्हणजे आल्टरवर ठेवल्या जातील. धार्मिक विधींच्या गरजेनुसार त्या वेदीवरूनच उचलल्या जातील.
 
रिगेलिया म्हणजे काय?
रॉयल फॅमिली वेबसाइटच्या मते, रिगेलियाचा अजूनही वापर करणारे यूके हे युरोपातलं एकमेव राष्ट्र उरलं आहे. रिगेलिया म्हणजे शाही दंडक, मुकुट, राजदंड, ऑर्ब अशा प्रतिकात्मक वस्तू ज्यांचा वापर ब्रिटीश राजघराणं अजूनही राज्याभिषेकासारख्या सोहळ्यात करतं.
 
राजाची वेगवेगळी इतिकर्तव्यं सांगणाऱ्या या वस्तू प्रतिकात्मकरीत्या राजेशाहीत वापरण्यात येतात.
 
सॉव्हरिन रॉब, क्रॉस चिन्हांकित राजदंड आणि कबुतराचं चिन्ह असलेला राजदंड चार्ल्स यांना प्रदान करण्यात येईल. इतरही काही रिगेलिया धार्मिक विधींनुसार त्या त्यावेळी नव्या राजांकडे सुपूर्द करण्यात येईल.
 
हा सगळा धार्मिक आणि पारंपरिक विधी साधारण दोन तास चालणं अपेक्षित आहे. त्याचे विविध टप्पे आहेत.
 
पहिला टप्पा- द रेकग्निशन
मध्ययुगीन काळात सुरुवातीपासून (अँग्लो सॅक्सन काळ- इ.स. 410 ते इ.स. 1066) सुरू असलेल्या परंपरेनुसार किंग चार्ल्स यांना 'जनते'समोर सादर करण्यात येईल.
 
कोरोनेशन चेअर ज्याला आपण सिंहासन म्हणू शकतो त्याच्या बाजूला उभं राहून कॅटेनबरीचे आर्चबिशप जस्टिन वेल्बाय अॅबीच्या प्रत्येक बाजूला तोंड वळवून चार्ल्स यांचं नाव उच्चारत "अनभिषिक्त सम्राट" असं म्हणतील आणि त्यानंतर धार्मिक विधींना सुरुवात होईल. हे सिंहासन 700 वर्षं जुनं आहे.
 
या सिंहासनाला (कोरोनेशन चेअरमध्ये सिंह नंतर जोडले गेले)सेंट एडवर्ड चेअर किंवा किंग एडवर्ड चेअर असंही म्हणतात.
 
यूकेमधलं सर्वात जुनं वापरात असलेलं फर्निचर जे अजूनही त्याच्या मूळ कामाकरताच वापरलं जातं अशी या खुर्चीची ख्याती आहे. याच राजखुर्चीवर किंवा सिंहासनावर बसवून आतापर्यंत 26 राजा-राण्यांचा राज्याभिषेक झाला आहे.
 
स्टोन ऑफ डेस्टिनी असं म्हणतात ती दगडी खुर्ची स्कॉटलंडच्या स्कोनमधून आणली होती, तो दगड आत बसेल अशी लाकडी खुर्ची किंवा आसन किंग एडवर्ड (पहिले)यांनी त्या काळी बनवून घेतलं होतं. तेच हे आजही वापरात असलेलं राज्याभिषेकाचं सिंहासन.
 
हा खुर्चीच्या आकाराचा दगड म्हणजे स्टोन ऑफ डेस्टिनी स्कॉटलंडच्या राजेशाहीचं प्राचीन प्रतीक होतं. ते 1996 मध्ये स्कॉटलंडला परत करण्यात आलं. पण आता किंग चार्ल्स यांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी हा स्टोन पुन्हा लंडनला आणण्यात येणार आहे.
 
राज्याभिषेकाच्या वेळी ओकच्या लाकडाची खुर्ची ऐतिहासिक 'कॉसमॅटी पेव्हमेंट'वर ठेवण्यात येईल. या सोहळ्याचं धार्मिक महत्त्व अधोरेखित करण्यासाठीच चर्चच्या हाय आल्टरच्या समोर उच्चस्थानी ही खुर्ची ठेवण्यात येईल. अॅबीमधली कॉसमॅटी पेव्हमेंट ही नक्षीदार मोझेक टाइल्सनी सजवलेला मार्ग म्हणजे मध्ययुगीन इतिहासापासून चालत आलेली परंपरा आहे.
 
दुसरा टप्पा - द ओथ
 
कॅटेनबरीचे आर्चबिशप यांच्या अधिपत्याखाली हा राज्याभिषेक सोहळा होणार आहे. त्यामध्ये शपथविधी हा मुख्य भाग आहे.
 
आर्चबिशप किंग चार्ल्स यांना शपथ देतील. संपूर्ण कार्यकाळात कायदा आणि चर्च ऑफ इंग्लंड यांची रक्षा करण्याची ही शपथ पवित्र गॉस्पेलवर हात ठेवून घेण्यात येईल. त्यानंतर राजे कर्तव्यपूर्तीची ही प्रतिज्ञा शपथपूर्वक घेतील.
 
कदाचित किंग चार्ल्स आपल्या शपथपत्रात ब्रिटनमधल्या बहुधर्मीयत्वाची साक्ष देण्यासाठी काही शब्द घालतील. पण ते नेमकं काय त्यात जास्तीचं बोलतील हे अद्याप स्पष्ट नाही आणि तो भाग कदाचित शपथविधीच्या मुख्य सोहळ्यात नसेल.
 
तिसरा टप्पा - द अनॉइंटिंग
राजाचा शाही सोहळ्याचा अंगरखा काढून त्यांना सिंहासनावर बसवण्यात येईल. तिथे अनॉइंटिंग होईल. ब्रिटीनचा राजा हा चर्च ऑफ इंग्लंडचाही प्रमुख असतो. हे धार्मिक महत्त्व अधोरेखित करत राजाचं देवत्त्व सिद्ध करण्यासाठी हा अनॉइंटिंगचा सोहळा करण्यात येतो.
 
अनॉइंटिंग हा अध्यात्मिक सोहळा असून त्यामध्ये सुगंधी तेलाचे थेंब व्यक्तीच्या डोक्यावर सोडतात. इथे राज्याभिषेकाच्या वेळी आर्चबिश सोन्याच्या गडूतून (ज्याला अँप्युला म्हणतात) 'कोरोनेशन स्पून'वर सुगंधी तेलाचे काही थेंब घेतील. मग चमच्यातलं तेल राजाच्या डोक्यावरून, छातीवरून आणि हातांवरून क्रॉसच्या आकारात सोडण्यात येईल.
 
अँप्युलाचं महत्त्व
अनॉइंटिंग सेरेमनीचं तेल ज्या सोन्याच्या तांब्यातून किंवा गडूतून घेण्यात येतं त्याला द अँप्युला म्हणतात. हा गरुडाच्या आकाराचा अँप्युला दुसऱ्या चार्ल्सच्या राज्याभिषेकाच्या वेळी तयार करून घेतला होता.
 
त्याचा आकार हा पुरातन कल्पनेवर किंवा कथेवर आधारित आहे. 12 व्या शतकात व्हर्जिन मेरी सेंट थॉमस बेकेटसमोर (इंग्लंडमधील आर्चबिशप) प्रकट झाली आणि तिने त्याला सोन्याचा गरूड दिला. यामधूनच इंग्लंडच्या भावी राज्यांचा राज्याभिषेकाचं अनॉइंटिंग केलं जातं.
 
कोरोनेशन स्पून मात्र बराच प्राचीन आहे. इंग्लिश नागरी युद्धात ऑलिव्हर क्रॉमवेलच्या विद्ध्वंसातून जे काही रिगेलिया वाचलं त्यात हा चमचासुद्धा होता.
 
राज्याभिषेकासाठीचं तेल कुठलं यासंदर्भातसुद्धा स्पष्ट पारंपरिक निर्देशन आहे. ख्रिस्ती धर्मात पवित्र मानल्या गेलेल्या जेरुसलेमच्या माउंट ऑफ ऑलिव्ह्जमधल्या शेतात पिकलेल्या ऑलिव्हपासून तयार केलेलं तेल प्रथम लंडनच्या चर्चमध्ये धार्मिक उच्चारणांनी परम पवित्र केलं जातं आणि मग हे होली स्पिरिच्युअल ऑइल राज्याभिषेक सोहळ्यात वापरण्यात येतं.
 
या तैलमार्चन सोहळ्याच्या वेळी राजाच्या डोक्यावर छत्र धरलं जातं. हा सर्वांत पवित्र सोहळा मानला जात असल्याने तो होत असताना राजाकडे पाहू नये हा या छत्राचा उद्देश.
 
चौथा टप्पा- द इन्व्हेस्टिचर
इन्व्हेस्टिचर म्हणजे प्रत्यक्ष राज्याभिषेक सोहळा ज्यात राजाच्या डोक्यावर राजमुकुट चढवला जातो. सेंट एडवर्ड यांचा क्राउन आयुष्यात पहिल्यांदा आणि फक्त एकदाच या दिवशी राजाच्या डोक्यावर विराजमान होईल.
 
अँग्लो सॅक्सन काळातला राजा आणि संत एडवर्ड द कन्फेसरसाठी हा राजमुकुट तयार करण्यात आला होता असं म्हणतात. त्यावरूनच या मुकुटाचं नाव सेंट एडवर्ड क्राउन असं ठेवलं आहे.
 
इ.स. 1220 पर्यंत हाच मुकुट राज्याभिषेकाच्या वेळी वापरला जात होता. क्रॉमवेलने तो वितळवला आणि नवीन केला.
 
किंग चार्ल्स (द्वितीय)यांना एडवर्ड यांच्यासारखाच पण आणखी भव्यदिव्य मुकुट हवा होता म्हणून हा नवीन मुकुट करवून घेण्यात आला.
 
आताचे राजे किंग चार्ल्स (तृतीय)हा मुकुट चढवणारे सातवे राजे ठरणार आहेत. त्यांच्यापूर्वी दुसरा चार्ल्स, दुसरा जेम्स, तिसरा विल्यम्स, पाचवा जॉर्ज, सहावा जॉर्ज आणि राणी एलिझाबेथ(द्वितीय)यांनी हा मुकुट घातला होता. 1953 मध्ये राणीच्या राज्याभिषेकानंतर मुकुट प्रथमच बाहेर येत आहे.
 
सर्वप्रथम राजांना सोव्हरिन रॉब, कोरोनेशन रिंग, क्रॉस चिन्हांकित राजदंड आणि कबुतराच्या प्रतिमेचा राजदंड या रिगेलिया किंवा शाही वस्तू भेट देण्यात येतील.
 
त्यानंतर आर्चबिशप यांच्या हस्ते सेंट एडवर्डचा मुकुट किंग चार्ल्स यांना चढवण्यात येईल. ट्रम्पेटचा गजर होईल आणि संपूर्ण देशभरातून बंदुकांची सलामी दिली जाईल.
 
जगप्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू असलेल्या टॉवर ऑफ लंडनमधून 62 तोफांची सलामी देण्यात येईल. घोडदळाची परेडही राजांच्या सलामीसाठी असेल.
 
यूकेमधील एडिंबरा, कार्डिफ आणि बेलफास्ट अशा आणखी 11 ठिकाणांहून 21 फैरी झाडून सलामी देण्यात येईल. रॉयल नेव्हीच्या जहाजांवरूनही अशा फैरी झाडण्यात येतील.
 
पाचवा टप्पा - द एन्थ्रोन्मेंट
सोहळ्याच्या अखेरच्या टप्प्यात राजा राजगादीवर स्थानापन्न होईल. आर्चबिशप आणि इतर बिशप्स मिळून कदाचित त्यांना उचलून राजसिंहासनापर्यंत नेतील. ही पारंपरिक प्रथा आहे.
 
प्रथेनुसार, शाही परिवारातील इतर सदस्य आणि राजगादीचे वंशज एकेक करून नव्या राजाला आदरांजली देण्यासाठी आपल्या सहकार्याची ग्वाही देण्यासाठी पुढे येतात आणि गुडघ्यावर बसून राजाच्या उजव्या हाताचं चुंबन घेतात.
 
या वेळी मात्र किंग जॉर्ज यांना या पद्धतीची आदरांजली फक्त प्रिन्स विल्यम देईल, असं सांगितलं जात आहे.
 
द क्वीन कन्सॉर्ट
 
आदरांजलीचा कार्यक्रम झाल्यानंतर राणी म्हणून कॅमिला यांनाही अनॉइंटिंग केलं जाईल. राजाप्रमाणेच राणीलाही मुकुट घालण्याचा आणि राजगादीवर बसवण्याचा सोहळा साधेपणाने पार पडेल. फक्त क्वीन कॅमिला यांचा शपथविधी होणार नाही.
 
क्वीन मेरीचा मुकुट कॅमिला यांना घालण्यात येणार आहे. पंचम जॉर्ज यांच्या राज्याभिषेकाच्या वेळी नव्या राणी म्हणून क्वीन मेरी यांनी हा मुकुट तयार करवून घेतला होता.
 
पण आता कॅमिला यांना घालण्यात येणाऱ्या त्यांच्या मुकुटामध्ये काही बदल केले आहेत. काही कमानी कमी करून हिऱ्यांची रचना आणि हिरेही बदलले आहेत.
 
द डिपार्चर
अॅबीमधला सोहळा संपल्यानंतर किंग चार्ल्स आणि क्वीन कन्सॉर्ट त्यांच्या राजगादीवरून उतरून सेंट एडवर्ड चॅपेलमध्ये जाण्याची शक्यता आहे.
 
इथे आल्यानंतर सेंट एडवर्डचा मुकुट उतरवून नेहमीचा इम्पेरियल स्टेट क्राउन चार्ल्स घालतील. इथून पुन्हा मिरवणुकीतून त्यांना अॅबीच्या बाहेर आणतील. त्या वेळी राष्ट्रगीत वाजवण्याची प्रथा आहे.
 
किंग आणि क्वीन कन्सॉर्ट पुन्हा त्याच रस्त्याने बकिंगहम पॅलेसला पोहोचतील. या वेळी ते 260 वर्षं जुनी गोल्ड स्टेट कोच ही बग्गी वापरतील.
 
ही बग्गी चौथ्या विल्यमपासूनच्या सर्व राजांनी राज्याभिषेकाच्या वेळी वापलेली आहे. 1831 साली तत्कालीन राजा विल्यमने ती पहिल्यांदा वापरली होती.
या गोल्ड स्टेट कोचच्या मागच्या बग्गीत प्रिन्स ऑफ वेल्स त्यांच्या तीन मुलांसह मिरवणुकीत सामील होतील असं सांगितलं जात आहे. प्रिन्स विल्यम आणि त्यांची मुलं - प्रिन्स जॉर्ज आणि लुइस आणि प्रिन्सेस शारलॉट असं कुटुंब त्यात असेल.
 
सैन्यदलाचे या जमान्यातले सर्वांत मोठे सेरिमोनिअल ऑपरेशन असं याचं वर्णन ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने केलं आहे. कारण या सोहळ्यात यूकेच्या सैन्यदलाचे 4000 सदस्य सामील होणार आहेत.
 
कॉमनवेल्थ कंट्रीज म्हणजे राष्ट्रकुलातील भारतासह इतर देशांचे प्रतिनिधी आणि ब्रिटीश ओव्हरसीज टेरिटरीचे प्रतिनिधी राजा-राणीला शुभेच्छा आणि सलामी देतील.
 
वेस्टमिन्स्टर अॅबी ते बकिंगहम पॅलेस हे जवळपास 2.29 किमी (1.42 मैल) अंतर आहे. राजा आणि राणीला सैन्यदलातले अधिकारी परेडमधून शाही सलामी देतील.
 
1953 मध्ये राणी एलिझाबेथ यांच्या राज्यारोहणाच्या वेळी हाच मिरवणुकीचा मार्ग चार मैल लांब होता आणि मिरवणूक एका ठिकाणाहून पूर्णपणे हलायला 45 मिनिटं लागतील एवढा लवाजमा त्या वेळी होता.
बकिंगहम पॅलेस फ्लाय पास्ट
 
इ.स. 1902 मध्ये राज्यारोहण झालेले किंग एडवर्ड (सातवे)यांच्यापासून बकिंगहम पॅलेसच्या बाल्कनीतून जनतेला दर्शन द्यायची प्रथा सुरू आहे. ती यावेळीही अबाधित राहील.
 
राणी एलिझाबेथ यांच्या राज्याभिषेकानंतर त्यांनी पॅलेसभोवती आणि द मॉल इथे जमलेल्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांना राजवाड्याच्या सज्जात येऊन हात हलवत अभिवादन केलं होतं. त्यावेळी अख्खं शाही कुटुंब त्यांच्याबरोबर सज्जात उपस्थित होतं.
 
एलिझाबेथ यांची आई म्हणजे क्वीन मदर, मुलं आणि बहीण इतर शाही कुटुंबाबरोबर उपस्थित होते. त्यावेळी शेकडो विमानांनी राजवाड्यावरून उडत सलामी दिली होती.
 
असं फ्लाय पास्ट यावेळीही होणार आहे. फक्त किंग चार्ल्स यांच्याबरोबर शाही कुटुंबातले कोणकोण बकिंगहम पॅलेसच्या सज्जात उपस्थित राहतील हे अद्याप निश्चित समजलेलं नाही.
 
या सोहळ्याची सांगता होते वेळी सहा मिनिटांचं फ्लाय पास्ट होईल. आर्मी, रॉयल नेव्ही आणि रॉयल एअर फोर्स यांचं मिळून आकाशात संचलन होईल आणि लाल बाणांच्या आकारात विमानं उडवून नवीन राजा-राणींना सलामी दिली जाईल.
 

Published By- Priya Dixit