शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

चीनच्या लसणाचा अमेरिकेच्या सुरक्षेला धोका? अमेरिकन सिनेटरनं म्हटलं...

अमेरिकेत आयात होणाऱ्या चिनी लसणाबद्दल दावा करण्यात आला आहे की, देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने तो चांगला नाही.
 
चीनमधून लसूण आयात केल्यानं राष्ट्रीय सुरक्षेवर काय परिणाम झाला, याची चौकशी करण्याची मागणी अमेरिकन सिनेटरने त्यांच्या सरकारकडे केली आहे.
 
रिपब्लिकन सिनेटर रिक स्कॉट यांनी वाणिज्यमंत्र्यांना पत्र लिहून चीनमधून आयात केलेला लसूण असुरक्षित असल्याचा दावा केला आहे. हा लसूण घाणेरड्या पद्धतीनं पिकवला जात असल्याचा त्यांचा दावा आहे.
 
चीन हा लसणाचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार आहे आणि अमेरिका त्यांचा सर्वात मोठा ग्राहक आहे.
 
मात्र, हा व्यापार अनेक वर्षांपासून वादात आहे.
 
चीन आपल्या देशात अत्यंत कमी दरात लसूण विकत असल्याचा आरोप अमेरिका करत आहे.
 
1990 च्या दशकाच्या मध्यापासून अमेरिकन उत्पादकांना बाजारातील किमती घसरण्यापासून वाचवण्यासाठी अमेरिकन प्रशासनाने अनेक चिनी वस्तूंवर अधिक शुल्क किंवा कर लादले आहेत.
 
ट्रम्प प्रशासनाच्या कार्यकाळात 2019 मध्ये हे शुल्क आणखी वाढवण्यात आले.
 
सिनेटरचा दावा काय आहे?
अमेरिकन सिनेटरने आपल्या पत्रात चिंता व्यक्त केली आहे.त्यांनी आपल्या पत्रात असं लिहिलं आहे की, "परदेशात लागवड केल्या जाणार्‍या लसणाचा दर्जा आणि गुणवत्तेमुळे लोकांच्या सार्वजनिक आरोग्याबाबत गंभीर चिंता आहे, विशेषत: कम्युनिस्ट चीनमध्ये पिकवलेला लसूण."
 
लसणाची ज्या पद्धतींद्वारे लागवड केली जाते त्या प्रकाराचा त्यांनी पत्रात दावा केला आहे.
 
ते म्हणतात की, लसूण पीक घेण्याच्या पद्धतीची नोंद आहे, ज्यात ऑनलाइन व्हीडिओ, कुकिंग ब्लॉग आणि डॉक्युमेंटरी यांचा उपयोग केला जातोय.
 
तसंच अमेरिकन सिनेटरने असा दावा केला आहे की, मलयुक्त पाण्याचा वापर करुन लसूण शेती केली जात आहे.
 
यावर त्यांनी वाणिज्य मंत्रालयाकडे कारवाई करण्याची मागणी केली आहे. एखाद्या विशिष्ट वस्तूच्या आयातीमुळे अमेरिकन सुरक्षेवर परिणाम होतो, त्या कायद्यांतर्गत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
 
याशिवाय सिनेटर स्कॉट यांनी लसणाच्या विविध प्रकारांबद्दल तपशीलवार माहिती दिली आहे आणि ते देखील पाहिलं पाहिजे असं म्हटलं आहे.
 
त्यांनी पत्रात लिहिलं आहे की, " सर्व प्रकारचे लसूण, ज्यात अख्खा लसूण किंवा त्याच्या पाकळ्या, सोललेला लसूण, ताजा, फ्रोजन, पाण्यात किंवा दुसऱ्या पदार्थांमध्ये पॅक केलेला लसूण, हे सर्व प्रकार पहावेत."
 
शास्त्रज्ञ काय म्हणतात?
अमेरिकन सिनेटरचा असा युक्तिवाद आहे की, "फूड सेफ्टी आणि सुरक्षेशी संदर्भात ही आणीबाणी आहे,जी आमच्या राष्ट्रीय सुरक्षा, सार्वजनिक आरोग्य आणि आर्थिक समृद्धीला गंभीर धोका निर्माण करते."
 
शास्त्रीय मुद्द्यांना तपशीलवार स्पष्ट करणाऱ्या क्यूबेकमधील मॅकगिल युनिव्हर्सिटीमधील ऑफिस फॉर सायन्स अँड सोसायटीचं म्हणणं आहे की,चीनमध्ये लसणाची लागवड करण्यासाठी मलयुक्त पाणी खत म्हणून वापरलं जातं याचा कोणताही पुरावा नाही.
 
सन 2017 मध्ये विद्यापीठानं एक लेख प्रसिद्ध करुन म्हटलं होतं की, या प्रकरणात कोणतीही समस्या नाही.
 
"प्राण्यांच्या विष्ठेप्रमाणेच मानवी मल एक प्रभावी खत म्हणून कार्य करते. शेतात मानवी मल टाकून पीकं वाढवणं हे ऐकायला चांगलं वाटणार नाही, पण ते तुम्हाला वाटतं त्यापेक्षा ते अधिक सुरक्षित आहे."