1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 ऑक्टोबर 2022 (21:44 IST)

चीन : बिजिंगमध्ये शी जिनपिंग यांच्याविरोधात घोषणाबाजी, पुन्हा राष्ट्राध्यक्ष व्हायला विरोध

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या विरोधात दुर्मिळ निदर्शनं पाहायला मिळत आहेत. आंदोलक बीजिंगच्या हैदियन भागात सिटोन्ग पुलावर चढले. चीनचं शून्य-कोविड धोरण संपुष्टात आणा आणि जिपनिंग यांना पदच्युत करा, असं आवाहन करणारे दोन मोठे बॅनर त्यांनी लावले होते.
 
देशातील माध्यमे शांत असली तरी गुरुवारच्या निदर्शनाचे फोटो आणि व्हीडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाले आहेत. त्यामुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आणि बहुतेक चिनी नागरिक वापरत असलेल्या WeChat अॅपवर सेन्सॉरद्वारे कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
 
जिपनिंग यांच्याकडे गुरुवारी संध्याकाळी कम्युनिस्ट पार्टी काँग्रेसच्या प्रमुखपदाची जबाबदारी सोपवली जाणार होती, यावेळी ही निदर्शनं करण्यात आली.
यावेळी निदर्शकांनी कारचे टायर्स पेटवले आणि लाऊडस्पीकरमध्ये घोषणाबाजी करताना तो दिसून आले. या आंदोलनाप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आल्याचं वृत्त आहे. या घटनेच्या व्हायरल फोटोंमध्ये पिवळी टोपी आणि केशरी कपडे घातलेल्या एका व्यक्तीला पोलीस अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं आहे.
 
बीबीसीनं स्थानिक पोलिसांची प्रतिक्रिया मिळवण्याचा प्रयत्न केला.
 
दरम्यान, अनेकांनी या एकट्या निदर्शकाच्या कृतीची प्रशंसा केली आहे. त्याला 'नायक' म्हणून संबोधलं आहे.
 
जिनपिंग तिसऱ्यांदा कार्यकाळ सुरू करण्याच्या तयारीत
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग 20 व्या कम्युनिस्ट पार्टी काँग्रेसमध्ये तिसऱ्यांदा अभूतपूर्व पद्धतीने आपला कार्यकाळ सुरू करण्याची तयारी करत आहेत.
 
यामुळे जिनपिंग यांचा आयुष्यभर या पदावर राहण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. चीनच्या नेत्यांनी 2018 मध्ये केवळ दोनदा पदावर राहण्याची मर्यादा संपुष्टात आणण्यासाठी मतदान केलं होतं. हा नियम 1990 पासून लागू होता.
 
शी जिनपिंग यांनी 2012 मध्ये सत्ता हाती घेतली आणि त्यांच्या राजवटीत चीन हुकूमशाही शासनाकडे वाटचाल करत आहे. विरोधक, टीकाकार आणि प्रभावशाली अब्जाधीश, उद्योगपती यांच्यावर कडक कारवाई केली जात आहे.
 
काही जण जिनपिंग यांना चीनमधील कम्युनिस्ट क्रांतीचे नेते आणि माजी सत्ताधारी माओ यांच्यापेक्षा अधिक हुकूमी वृत्तीचे मानतात.
 
Published By- Priya Dixit