सीरियावरून इस्रायल आणि तुर्की यांच्यात संघर्ष, इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी एर्दोगान यांना धमकी
इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी सीरियाच्या संदर्भात तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी इशारा दिला आहे की, इस्रायल आपल्या सुरक्षेला असलेला कोणताही संभाव्य धोका सहन करणार नाही. इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी 'एक्स' पोस्ट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले, "तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान तुर्कीला सीरियामध्ये धोकादायक पावले उचलण्यास प्रवृत्त करत आहेत. इस्रायल अशा कोणत्याही शक्तीला किंवा संघटनेला आपल्या सुरक्षेसाठी धोका बनू देणार नाही. एर्दोगान यांनी तुर्कीच्या संसदेत इस्रायलविरोधात वक्तव्ये करण्यापुरते स्वतःला मर्यादित ठेवावे आणि इस्रायलला आव्हान देण्याचा प्रयत्न करू नये, हे अधिक चांगले होईल."
यापूर्वी, नेतान्याहू यांनी त्यांच्या लिकुड पक्षाने 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये या विषयावर भाष्य केले होते. इस्रायलला धोका निर्माण करू शकणारी सीरियामधील तुर्कीची कोणतीही लष्करी जमवाजमव इस्रायल सहन करणार नाही, असे ते म्हणाले.
मंगळवारी सीरियाच्या अबू अल-दुहुर हवाई तळावर झालेल्या इस्रायली हल्ल्याचा संदर्भ देत नेतान्याहू म्हणाले, "आम्ही आमचा संदेश स्पष्ट केला. त्यांनी तो नीट ऐकला नाही हे उघड आहे, म्हणून आम्ही त्यांना तो अधिक चांगल्या प्रकारे समजावून सांगितला."
इस्रायलचे म्हणणे आहे की, दमास्कसने तेथे तुर्की सैन्य तैनात करण्यास परवानगी दिल्यामुळे हा हल्ला करण्यात आला. तुर्कस्तानने हा दावा फेटाळताना, इस्रायलवर सीरियाच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. मंगळवारी पहाटे, इस्रायली लढाऊ विमानांनी वायव्य सीरियातील इदलिब प्रांतात असलेल्या अबू अल-दुहुर लष्करी विमानतळाच्या धावपट्टीवर आठ हवाई हल्ले केले.
Edited By - Priya Dixit
I
