सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 31 जानेवारी 2023 (11:08 IST)

पाकिस्तानात मशिदीत स्फोटातील मृतांचा आकडा 83 वर, अनेक जण जखमी

Weshawar Blast
पाकिस्तानामधील खैबर पख्तूनख्वा प्रांताची राजधानी पेशावर येथे 30 जानेवारी रोजी पोलीस लाइनच्या मशिदीत झालेल्या जोरदार स्फोटातील मृतांचा आकडा 83 वर गेला आहे. मशिदीच्या इमारतीला देखील यामुळे नुकसान झाले आहे. या स्फोटात 150 हून अधिक जखमी झाले होते त्यामुळे मृतांचा आकडा वाढू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. मृतातील बहुतांश जण हे पोलीस कर्मचारी किंवा अधिकारी होते जे मशिदीत दुपारच्या नमाज पठणासाठी आले होते. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी म्हटलं आहे की पाकिस्तानी जनतेचं रक्षण करणाऱ्यांनाच कट्टरवाद्यांनी आपले लक्ष्य बनवून दहशतीचे वातावरण तयार केले आहे. सुरुवातीला तालिबानच्या एका कमांडरने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती पण नंतर तालिबानने ही जबाबदारी झटकली.
 
काल स्फोट झाल्यानंतर अनेकांना पेशावरच्या लेडी रीडिंग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेव्हा या रुग्णालयाचे प्रवक्ते डॉ. आझम यांनी सांगितले होते की मृतांमध्ये पोलिसांचाही समावेश आहे.
लेडी रीडिंग रुग्णालयाची अवस्था पाहता आणीबाणी लागू करण्यात आल्याचं डॉ.आझम यांनी सांगितलं.
पेशावर बॉम्बस्फोटावर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटलं की, "पेशावर पोलिस लाईन्सच्या मशिदीत झालेल्या स्फोटाचा मी तीव्र निषेध करतो. पीडितांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त करतो.
 
"आम्ही आमची गुप्तहेर यंत्रणा सुधारणं आणि दहशतवादाच्या धोक्याचा सामना करण्यासाठी आमच्या पोलिसांना पुरेशा शस्त्रांनी सुसज्ज करणे अत्यावश्यक आहे."
 
पेशावरमधील स्फोटानंतर इस्लामाबादच्या आयजींनी हाय अलर्ट जारी केला होता.
महत्त्वाच्या इमारती आणि महत्त्वाच्या ठिकाणांवर स्नायपर तैनात करण्यात आले
नागरिकांनी घराबाहेर पडताना आपली महत्त्वाची कागदपत्रं सोबत ठेवावीत, असं आवाहन करण्यात आलं आहे.
 
पाकिस्तानच्या टीव्ही चॅनेलवर येणाऱ्या फोटोंमध्ये अनेक रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचताना दिसत आहेत.
तसंच घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त दिसत आहे.
 
Published By- Priya Dixit