1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Updated : शनिवार, 4 नोव्हेंबर 2023 (09:28 IST)

नेपाळमध्ये भूकंप, मृतांची संख्या 128 वर, युद्ध पातळीवर बचावकार्य सुरू

earthquake
नेपाळमध्ये शुक्रवारी (3 नोव्हेंबर) रात्री भूकंपाचे तीव्र धक्के बसले. 6.4 रिश्टर स्केल तीव्रतेच्या या भूकंपानं नेपाळमधील जाजरकोट आणि रुकुम पश्चिम या भागात मोठी जीवितहानी झालीय.
 
या भूकंपातील मृतांचा आकडा 128 वर पोहोचला असून, 140 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
 
जाजरकोट आणि रुकुम पश्चिम या दोन जिल्ह्यांमध्ये भूकांपामुळे सर्वात जास्त नुकसान झाले आहे. तिथे बचाव कार्य आणि शोध मोहीम वेगाने सुरू आहे, असं नेपाळ पोलिसांचे प्रवक्ते कुबेर कडायत यांनी बीबीसी नेपाळी सेवेला सांगितले.
 
भूकंपानंतर नागरिकांनी अनेक ठिकाणी संपूर्ण रात्र घराबाहेर काढली.
 
बचाव कार्यासाठी पोलीस, लष्कर आणि सशस्त्र दल तैनात केले असून, बचावकार्यासाठी हेलिकॉप्टरचाही वापर केला जातोय.
 
नेपाळमधील या भूकंपाचे धक्के भारतातही जाणवले. मात्र, भारतात कुठेही नुकसान झालं नाहीय.
 
शुक्रवारी (3 नोव्हेंबर) रात्री 11.77 वाजता आलेला भूकंप हा 2015 मध्ये नेपाळमध्ये झालेल्या भूकंपानंतरचा सर्वात प्राणघातक भूकंप मानला जात आहे.
 
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूकंपात झालेल्या जीवीतहानीबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.
 
“नेपाळमधील भूकंपात झालेल्या जीवितहानीमुळे दुःख झालं. भारत नेपाळच्या लोकांसोबत एकजुटीने उभा आहे आणि शक्य ती सर्व मदत करण्यास तयार आहे. आमचे विचार शोकाकुल कुटुंबांसोबत आहेत. जखमी लोक लवकर बरे व्हावेत, अशी आम्ही आशा करतो,” असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
 
2015 मध्ये 9 हजार लोकांचा बळी घेणारा भूकंप
25 एप्रिल 2015 रोजी नेपाळमध्ये 7.8 रिश्टर स्केलचा मोठा भूकंप झाला.
 
युनायटेड नेशन्सच्या आकडेवारीनुसार, तेव्हा सुमारे 9000 लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते.
 
तर 10 लाख घरांचे नुकसान झाले आणि सुमारे 28 लाख लोक विस्थापित झाले होते.
 
या विनाशकारी भूकंपात नेपाळची राजधानी काठमांडू येथील अनेक ऐतिहासिक वास्तू उद्ध्वस्त झाल्या असून शेकडो परदेशी पर्यटकांनाही याचा फटका बसला होता.