मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 4 एप्रिल 2022 (08:33 IST)

श्रीलंकेत जाळपोळीनंतर आणीबाणी, मंत्रिमंडळातील सर्वांनी दिला राजीनामा

रविवारी रात्री श्रीलंकेच्या सर्व 26 मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. सभागृहाचे नेते आणि शिक्षण मंत्री दिनेश गुणावर्धने यांनी सांगितले की सर्व मंत्र्यांना राजीनामा दिला. त्यांनी आपल्या राजीनाम्याचे कारण सांगितले नाही.
 
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेत आणीबाणी लागू करण्यात आली आहे. देशामध्ये 36 तासांचा कर्फ्यू लावण्यात आलाय. श्रीलंकेतील नागरिकांनी गुरुवारी, 31 मार्चला रात्रभर निदर्शनं केली. पोलीस आणि नागरिकांमध्ये झटापटही झाली. राजधानी कोलंबोत पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
 
कोलंबोमध्ये रात्री 5 हजाराहून अधिक लोक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी राष्ट्राध्यक्ष गोटाभाया राजपक्षेंच्या घराच्या दिशेनं मोर्चा काढला. राष्ट्राध्यक्षांच्या घरावरच्या दिशेनं जाणाऱ्या आंदोलकांना थांबवताना पोलिसांसोबत झटापटही झाली. या निदर्शनातील 45 जणांना अटक करण्यात आली असून, या दरम्यान एक व्यक्ती गंभीर जखमी झालीय.
 
या सर्व गोंधळामुळे कर्फ्यू लावण्यात आला होता, मात्र नंतर तो हटवण्यात आला. शहरात पोलीस आणि सैनिकांची संख्या वाढवण्यात आली आहे. राष्ट्राध्यक्ष गोटाभाया राजपक्षेंच्या घराच्या दिशेनं जाणाऱ्या रस्त्यांवर जाळ्या लावण्यात आल्या आहेत. श्रीलंका कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेलाय. 2.2 कोटी लोकसंख्येचा हा देश आर्थिक संकटाचा सामना करत आहे. अन्नधान्याचा तुटवडा आणि परिणामी त्यांच्या वाढत्या किंमतींमुळे श्रीलंकेतील नागरिक त्रस्त आहेत.