चीनच्या शांघाय शहरात कोरोनाचा हाहाकार, मुलांना पालकांपासून दूर नेले जात आहे
कोरोनामुळे चीनमध्ये हाहाकार माजला आहे. विशेषत: चीनच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शांघाय शहरात कोरोनामुळे परिस्थिती अनियंत्रित झाली आहे. अशा परिस्थितीत चीन सरकारने कोरोनाला रोखण्यासाठी दुहेरी निर्बंध लागू केले आहेत. हे निर्बंध मानवतेला हादरवून सोडणारे आहेत. मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, कोरोनामुळे मुलांना त्यांच्या पालकांपासून वेगळे केले जात आहे आणि त्यांना क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले जात आहे. चीन सरकारच्या कठोर निर्बंधांमुळे चिनी नागरिक घाबरले आहेत.
कोरोना महामारीच्या नव्या लाटेत चीन सरकारने अशी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे की, सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नवीन आदेशानुसार मुलांना त्यांच्या पालकांपासून वेगळे केले जात आहे. पालकांना त्यांच्या मुलांचे स्थानही दिले जात नाही. ताज्या घडामोडींनुसार, अनेकजण आपल्या मुलांची बातमी जाणून घेण्यासाठी प्रशासनाकडे विनवणी करत आहेत, मात्र तरीही त्यांना मुलांची माहिती दिली जात नाही.
वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एस्थर झाओ या महिलेने तिच्या अडीच वर्षांच्या मुलीला ताप आल्याने रुग्णालयात नेले. ही घटना 26 मार्चची आहे. तपासणीत त्यांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. तीन दिवसांनी त्याच्या आईलाही कोरोनाची लागण झाली. अशा परिस्थितीत रुग्णालय प्रशासनाने दोघांनाही (आई आणि मुलगी) वेगवेगळ्या क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठवले. वृत्तानुसार, आई ओरडत राहिली पण प्रशासनाने ऐकले नाही आणि मुलीला आईपासून वेगळे केले.
शांघाय शहरात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 6311 नवीन रुग्ण आढळले आहेत. ज्यामध्ये लक्षणे नसलेले 6051 रुग्ण आहेत तर 260 जणांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली आहेत. यापूर्वी शुक्रवार आणि गुरुवारी शांघायमध्ये कोरोनाचे 4144 आणि 358 रुग्ण आढळले होते. तर 1 एप्रिल रोजी चीनमध्ये 2129 पुष्टी झालेले कोरोनाचे रुग्ण आढळले. जरी संख्येच्या बाबतीत हे खूप कमी आहेत, परंतु चीन सरकार कोरोना प्रकरणांबाबत खूप गंभीर आहे आणि लोकांवर सर्व निर्बंध लादत आहे.