शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 31 डिसेंबर 2022 (16:28 IST)

माजी पोप बेनेडिक्ट सोळावे यांचे निधन

माजी पोप बेनेडिक्ट सोळावे यांचं निधन झालं आहे. ते 95 वर्षांचे होते. बेनेडिक्ट यांचं शेवटचं वास्तव्य व्हॅटिकनमधल्याच माटर इक्लेसिअन इथंच होतं. बेनेडिक्ट यांचे वारसदार पोप फ्रान्सिस यांनी त्यांची अनेकदा भेट घेतली होती.
 
बेनेडिक्ट यांची प्रकृती गेले काही वर्ष बरी नव्हती. पण वाढत्या वयामुळे त्यांची प्रकृती ढासळली. बुधवारी पोप फ्रान्सिस यांनी बेनेडिक्ट यांची प्रकृती सुधारावी यासाठी प्रार्थना करण्याचं आवाहन केलं होतं.
 
जोसेफ रॅटझिंगर यांचा जन्म जर्मनीत झाला होता. 2005 मध्ये वयाच्या 78व्या वर्षी त्यांची पोप म्हणून निवड झाली. पोपपदी निवड होणारे ते सगळ्यात वयस्क धर्मगुरु होते. त्यांच्या कार्यकाळात कॅथलिक चर्चविरुद्ध अनेक विभिन्न स्वरुपाचे आरोप झाले. धर्मगुरुंकडून सुमारे दशकभर लहान मुलांचं लैंगिक शोषण झाल्याचे आरोपही झाले.
 
1977 ते 1982 या कालावधीत म्युनिकचे आर्चबिशप असताना लहान मुलांच्या लैंगिक शोषणाची प्रकरणं हाताळताना चुका झाल्याचं बेनेडिक्ट यांनी यावर्षीच मान्य केलं होतं.
 
2013 मध्ये प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणास्तव 85 वर्षीय पोप बेनेडिक्ट सोळावे यांनी पोपपदाचा राजीनामा दिला होता. वाढते वय आणि प्रकृतीच्या कुरबुरी यामुळे राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. पदावर असताना राजीनामा देणारे बेनेडिक्ट हे ६०० वर्षांच्या पोपपदाच्या इतिहासातील पहिलेच पोप ठरले होते.
 
चर्चच्या हितासाठीच आपण राजीनामा देत असल्याचेही त्यांनी नमूद केलं होतं. पोप जॉन पॉल यांच्या मृत्यूनंतर २००५ मध्ये बेनेडिक्ट यांची पोपपदी निवड झाली होती. साधारणपणे पोपच्या मृत्यूनंतर नव्या पोपची निवड करण्याचा रिवाज आहे. मात्र, बेनेडिक्ट यांच्या अनपेक्षित घोषणेमुळे नवे पोप निवडले गेले.
 
व्हॅटिकन प्रासादाच्या सज्जातून लोकांना उद्देशून अखेरचे जाहीर भाषण करताना बेनेडिक्ट उद्गारले की, ‘आता मी एक साधा यात्रेकरू असून पृथ्वीवरील माझ्या यात्रेचा अखेरचा प्रवास सुरू झाला आहे!’
 
घंटांचा गंभीरध्वनी प्रतिध्वनित होत असताना पिवळ्या व निळ्या पट्टय़ांच्या गणवेशातील स्विस सैनिकांनी पोप बेनेडिक्ट यांच्या संरक्षणाची सूत्रे व्हॅटिकन पोलिसांकडे हस्तांतरित केली त्यावेळी ‘लाँग लिव्ह द पोप’ अशा घोषणा दिल्या जात होत्या.
 
अपोस्टोलिक पॅलेसच्या संगमरवरी दालनांतून जगभरातील एक अब्ज कॅथलिक समाजाचे २६५ वे सर्वोच्च धर्मगुरू म्हणून गेली आठ वर्षे वावरलेल्या बेनेडिक्ट सोळावे यांचा निवृत्तीचा प्रवास सुरू झाला तेव्हा त्यांच्या सहकाऱ्यांना अश्रू आवरले नाहीत.
 
बेनेडिक्ट यांनी अपोस्टोलिक पॅलेसच्या दरबारात जमलेल्या व्हॅटिकनच्या सर्व अधिकाऱ्यांची अखेरची भेट घेतली. सर्व कार्डिनलही त्यांच्या भेटीला आले होते. आपल्या वारसदारांनाही भरीव सहकार्य करावे, अशी इच्छावजा सूचना बेनेडिक्ट यांनी त्यांना केली.
 
पोपपदावरील धर्मगुरू निवर्तल्यानंतर कार्डिनल नव्या पोपची निवड करतात, अशी प्रथा असताना प्रथमच पोप पदावरील धर्मगुरूने पदत्याग केला आहे. त्या पार्श्वभूमीवर कार्डिनलांना उद्देशून बेनेडिक्ट म्हणाले की, तुमच्यापैकीच एकजणदेखील पोप होईल. तेव्हा मी त्याला आत्ताच आश्वस्त करू इच्छितो की माझे संपूर्ण सहकार्य आणि सद्भावना त्याच्या पाठिशी असेल.
 
पोप पद सोडताना बेनेडिक्ट यांनी ट्विटरवरूनही जगभरातील जनतेशी संवाद साधला होता. आपल्या अखेरच्या संदेशात ते लिहितात, ‘‘तुमच्या प्रेम व पाठिंब्यासाठी धन्यवाद. ख्रिस्ताला जीवनाचा मुख्य आधार मानून जगताना अपार आनंदाचा अनुभव तुम्ही नेहमीच अनुभवाल.’’