मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 30 जानेवारी 2024 (15:07 IST)

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना सायफर प्रकरणात 10 वर्षांची शिक्षा

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि माजी पररारष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांना सायफर प्रकरणात 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
इम्रान खान सत्तेत असताना डिप्लोमॅटिक केबल सार्वजनिक करून देशाच्या गोपनीयता कायद्याचे उल्लंघन केल्याच्या घटनेला सायफर प्रकरण म्हटलं जातं.
 
मंगळवारी (30 जानेवारी) विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अबुल हसनत जुलकरनैन यांनी या प्रकरणाची सुनावणी घेतली. त्यानंतर कोर्टाने हा निकाल दिला आहे.
 
शिक्षा सुनावण्यात आली तेव्हा इम्रान खान आणि शाह मेहमूद कुरेशी कोर्ट रूममध्ये उपस्थित होते.
 
ही शिक्षा घटनेविरोधात आणि बेकायदेशीर असल्याचं पीटीआयने सोशल मीडियावरील निवेदनात म्हटलं आहे.
 
राजकीय हेतूने करण्यात आल्याचा खान यांनी याआधी आरोप केला होता.
 
29 जानेवारीपासून विशेष न्यायालयात ही सुनावणी सुरू होती.
 
या दरम्यान, इम्रान खान आणि शाह मेहमूद कुरेशी यांच्याविरुद्ध 25 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले.
 
कोर्टरूममध्ये उपस्थित पत्रकार रिजवान काझी यांनी बीबीसीला सांगितले की, कोर्टाने इम्रान खान यांना जबाब नोंदवण्यासाठी बोलावलं.
 
तेव्हा कोर्टाने इम्रान खान यांना विचारले की, "तुमच्याकडे सायफर आहे का?"
 
त्यावर खान म्हणाले की, "सायफर माझ्याकडे नसून माझ्या कार्यालयात आहे आणि तिथली सुरक्षा माझी जबाबदारी नाही. तर लष्करी सचिव आणि प्रधान सचिव यांची असते."
 
सुनावणीच्यावेळी कोर्टाने दोघांचे केवळ जबाब नोंदवले. त्यानंतर कोणतीही उलटतपासणी झाली नाही.
 
तुरुंग प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, विशेष न्यायालयाचे न्यायाधीश यांनी निर्णय दिला आणि तिथून निघून गेले. त्यावर पक्षकारांनी अंतिम युक्तिवाद देखील केला नाही.
 
इम्रान खान यांना 2022 मध्ये सत्तेतून पायउतार व्हावं लागलं. ते सध्या एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणातील केसमध्ये तीन वर्षांची शिक्षा भोगत आहेत.
 
पाकिस्तानमध्ये लवकर सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्याआधीच हा निकाल देण्यात आला आहे. त्यामुळे खान यांना आता निवडणूक लढवता येणार नाहीये.
 
 
Published By- Priya Dixit